भारतातील तसेच राज्यातील हवामानाचा विचार केल्यास येथील समशीतोष्ण हवामान हरितगृहातील फुलशेतीस तसेच भाजीपाला व इतर फळपिकांच्या उत्पादनास अतिशय उपयुक्त आहे. तसेच या हवामानात हरितगृह उभारण्यासाठी येणारा खर्च देखील युरोपियन देशांमध्ये येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत फार कमी आहे. जर आपण युरोपियन देशांचा विचार केला तर हिवाळ्यात अतिशय कमी तापमानामुळे तेथे पिके चांगली येत नाहीत व जर फुले किंवा भाजीपाला पिके घेण्याचा प्रयत्न केला तर उत्पादन खर्च भरमसाठ येतो परंतु आपल्या देशात नेमके याच्या उलट आहे. आपल्याकडील हवामानात हरितगृहाचे सर्व प्रकारची फळे, फुले व भाजीपाल्याचे उत्पादन उत्कृष्ट येते. या लेखात आपण हरितगृहासाठी जागेची निवड कशी करावी याबद्दल जाणून घेऊ.
हरितगृहाचे फायदे कोणते आहेत?
1-फळे,फुले व भाजीपाला यांचे उत्पादन वर्षभर घेता येते.
2- बिगर हंगामी फुलांचे अधिक उत्पादन घेता येते.
3- पारंपरिक पद्धतीपेक्षा चार ते पाच पटीने अधिक उत्पादन घेता येते.
4- हरितगृहामध्ये लांब दांड्याच्या फुलांचे निर्यातक्षम उत्पादन घेता येते.
5- कीड व रोगांचे नियंत्रण करणे सहज शक्य होते.
6-ठिबक सिंचनाद्वारे खते व्यवस्थापन करता येते व विद्राव्य खतांचा वापर सुलभतेने व व्यवस्थित करता येतो.
7- फुलांची संख्या व दर्जा यामध्ये गुणात्मक वाढ करता येते.
8- बाजारातील मालाची आवक जावक यांचा अंदाज घेऊन उत्पादन कमी अधिक करता येते.
9- निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण व्यवस्थित करता येते.
10- उतिसंवर्धन आधारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे व रोपवाटिका तयार करणे शक्य होते.
हरितगृह उभारणीसाठी जागेची निवड कशी करावी व त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबी
- शेतकऱ्यांनी हरितगृह उभारणीसाठी शेतावरील उंच सखल व सपाटीकरण केलेली जागा निवडावी.
- मोठ्या वृक्षांच्या सावलीतील किंवा इमारतीच्या सावलीतील किंवा इमारतीच्या आडोश्याची जागा हरित पुलासाठी निवडू नये.
- ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी जागेची निवड करावी.
- पाणीपुरवठा च्या सुविधा जवळपास असणे आवश्यक आहे. पाण्याचा सामू साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान व पाण्याच्या क्षारतेचे प्रमाण 0.2 ते 0.5 मिली असावे.
- हरितगृहासाठी निवड केलेल्या जमिनीचा सामू जर साडे सात पेक्षा जास्त असेल व क्षारतेचे प्रमाण 0.5 मिलीमोहज पेक्षा जास्त असेल व जमीन लाल रंगाची वालुकामय पाण्याचा निचरा होणारी नसेल व काळी चिकन, पाण्याचा निचरा न होणारी, क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याची निचरा होणारी वालुकामय माती वाफे करण्यासाठी आणणे आवश्यक आहे.
- काळी निचरा न होणारी जमीन असेल तर 45×45 सेंटीमीटर आकारमानाचा चर काढावा. तसेच पाच सेंटीमीटर जाडीचा जाड वाळू चा संपूर्ण हरितगृहाच्या जागेवर थर देऊन त्यावर वाफे तयार करावेत. जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल.
- हरितगृहासाठी विद्युत पुरवठा च्या आवश्यक त्या सोयी कराव्यात.
- हरितगृहासाठी पाणथळ जागेचा वापर करू नये.
- हरितगृहात पासून तीस मीटर अंतरावर पश्चिम व दक्षिण बाजूस वारा रोधक झाडे लावावीत. त्यामध्ये शक्यतो सुरू, सिल्वर ओक, अशोक इत्यादी झाडांचा समावेश करावा. निलगिरी, साग, सुबाभूळ लावू नये. कारण या झाडांवर बऱ्याच किडींचा व रोगांचा अवस्था पूर्ण होतात.
Share your comments