कांदा प्रतवारीसाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केले यंत्र

29 August 2018 03:39 PM
प्रमुख अभियंता डॉ. प्रदीप बोरकर शेतकऱ्यांना कांदा प्रतवारी यंत्राविषयी माहिती देताना

प्रमुख अभियंता डॉ. प्रदीप बोरकर शेतकऱ्यांना कांदा प्रतवारी यंत्राविषयी माहिती देताना

भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शाकाहारी व मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो. कोशिंबीर, चटणी आणि मसाला तसेच केचप आणि सॉस यामध्ये कांद्याचा नेहमी वापर केला जातो. कांद्याची पावडर करून आणि कांद्याचे उभे काप किवा चकत्या करून ते वाळवून वर्षभर वापरता येतात. कांद्यामध्ये “ब” आणि “क” जीवनसत्त्वे, कर्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिजे असतात.

कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. कांदा उत्तेजक, चेतानाप्रद असून त्यात गोड, आंबट, तिखट, कडवट आणि तुरट असे पाच निरनिराळे स्वाद आहेत. पित्त आणि वातनाशक म्हणून कांद्याचा कांद्याचा वापर केला जातो. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिनीमधील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे.

महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात लागवडीस पोषक असते. महाराष्ट्रातील ३७ टक्के कांदा क्षेत्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून प्रामुख्याने पुणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक घेतले जाते.

कांदा प्रतवारी यंत्र

कांदा प्रतवारी यंत्र

कांदा काढल्यानंतर त्यास योग्य ती किंमत का मिळत नाही, याची अनेक कारणं आहेत. त्याला भाव न मिळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याची प्रतवारी नसणे. कांद्याच पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. प्रत्येक वेळी त्यातील लहान, मध्यम मोठे कांदे वेगवेगळे काढणं हे जिकिरीचं काम असतं. त्यासाठी मजूरही मिळत नाही. कांद्याची प्रतवारी मजुरांच्या साह्याने करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक कांद्याची हाताळणी जास्त वेळा झाल्यामुळे टरफले निघतात, कांदे सुकून वजन कमी होते. तसेच आयुष्यमानकमी होते व कांदा हाताळावा लागल्यामुळे खर्च वाढतो. तसेच अधिक हाताळणीमुळे त्याचे बाजारातील मूल्य कमी होते. शिवाय सर्व मजूर एकाच प्रकारे प्रतवारी करतील याची खात्री नसते. मुळात भर हंगामात कुशल व वेळेवर मजूर मिळणेच दुरापास्त झाले आहे. बाजारपेठांच्या आवश्यकतेनुसार प्रतवारी करूनकांदा योग्य पॅकिंगमध्ये बाजारात पाठविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक चांगला भाव मिळू शकतो. तसेच कांदा निर्यातीकरिता प्रतवारी करणे आवश्यक ठरते.

या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित करण्यात यश मिळविले आहे. कांदा प्रतवारीसाठी लागणारा वेळ, मेहनत व खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकतेने कांद्याची प्रतवारी करण्याचे उद्देशाने सदर यंत्र विकसित करण्यात आले आहे.

कांदा प्रतवारी यंत्रामध्ये मोठा, मध्यम आणि गोल्टी अशी तीन प्रकारची प्रतवारी करता येते. या यंत्रात कांदा टाकल्यानंतर त्याच्यातून आगोदरच निघालेली टरफले, पालापाचोळा पंख्याच्या सहाय्याने आपोआप वेगळा केला जातो. सुरूवातीला गोल्टी कांदा बाहेर पडतो. त्यानंतर मध्यम व मोठा कांदा यतो. कांद्याची प्रतवारी शेतकऱ्याला घरच्या घरी करता येते. हे यंत्र थ्री फेज विद्युत मोटार वर चालते. सदर यंत्रामध्ये कांद्याची साल निघू नये व त्यास इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे. अकोला जिल्यातील आलेगाव व नाशिक येथील  शेतकऱ्याशी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून सदर यंत्राची  कशी आवश्यकता आहे ते जाणून घेतले व त्यानंतरच ह्या यंत्राची निर्मिती करण्यात आली. कांदा प्रतवारीसाठी सद्यस्थितीत २५ ते ३० मनुष्य एका दिवसामध्ये २० टन कांद्याची प्रतवारी करतात. या प्रतवारी यंत्राच्या साह्याने फक्त ४ मनुष्यच २० टन कांद्याची प्रतवारी एका दिवसात करू शकतात. 

वैशिष्ट्ये :

 • सदर यंत्र हे चालविण्यास सोपे आहे.
 • प्रतवारी करताना कांद्याला इजा होत नाही.
 • हे यंत्र कांद्यांची त्यांच्या आकारानुसार प्रतवारी करते.
 • चाकांच्या साह्याने ने-आण करण्यास सोपे.
 • यंत्राने कांद्यांची ४० मि. मी. पेक्षा कमी, ४०-६० मि. मी. तसेच ६० मि. मी. पेक्षा जाड अशा प्रकारात प्रतवारी करता येते.
 • चाळणी बदलून कांद्याची प्रतवारी पाहिजे त्या आकारामध्ये करता येते.
 • कांदे प्रतवारी यंत्रात टाकण्यासाठी उद्वाहकची व्यवस्था आहे.
 • कांद्याची प्रतवारी करताना निघालेली टरफले वेगळे करण्याची व्यवस्था आहे तसेच
  प्रतवारी केलेले कांदे पोत्यात भरण्यास सुलभ आहे.
 • या यंत्राची क्षमता १५ ते २० टन प्रति दिवस आहे.
 • यंत्राची प्रतवारीची अचूकता ९० ते ९५ टक्के आहे.
 • २० टन कांद्याला हाताने प्रतवारी करतांना ३० कुशल मजुरांची आवश्यकता असते. या मशीनने प्रतवारी करण्यासाठी ४-६ अकुशल मजूर लागतात.

  डॉ. प्रदीप बोरकर व वसुदेव मते
  संशोधन अभियंता
  कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  फोन : ०७२४-२२५८२६६

   

onion grading machine pdkv akola कांदा प्रतवारी मशीन अकोला यंत्र प्रक्रिया processing Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ
English Summary: PDKV onion grading machine

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.