जनावरांच्या आहारात आवश्यक आहे कॅल्शियम; जाणून घ्या काय आहे महत्व

29 January 2021 09:17 PM By: भरत भास्कर जाधव
कॅल्शियमचे महत्व

कॅल्शियमचे महत्व

जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी, रक्त गोठण्यासाठी, स्नायूंची हालचाल होण्यासठी, शारीरिक कार्य चांगले राहण्यासाठी खनिजे महत्त्वाची भूमिका बजावतात. कॅल्शियम हे प्राण्यांच्या शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे खनिज घटक आहे. शरिरात आढळणाऱ्या संपूर्ण खनिजाच्या ७०% कॅल्शियम असते. दुध उत्पादनासाठी कॅल्शियम महत्वाचे ठरते. जनावरांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण जवळजवळ १.३३ टक्के (रक्तात ९ ते ११ मिलीग्रॅम/१०० मिली, हाडांमध्ये ३६ ग्रॅम/ १०० ग्रॅम ) एवढे असते. त्यामुळे कॅल्शियम युक्त समतोल पशुखाद्य जनावरांना देणे आवश्यक आहे.

वासरांमध्ये कॅल्शियमचे महत्व

गायीच्या गर्भामध्ये वासराची वाढ होत असताना वासराची कॅल्शियमची गरज गायीकडून भागवली जाते. जन्मल्यानंतर लहान वासरांमध्ये चिकदुध (गायीच्या स्तनांतून येणारा पहिला स्त्राव) हा नवजात वासरांसाठी कॅल्शियमचा प्रमुख स्त्रोत आहे. तसेच चिकदुधामधील रोग प्रतिबंधक पेशीमुळे वासरांचे लहान वयात होणा-या रोगांपासून संरक्षण होते. त्यामुळे वासरू जन्मल्यानंतर गायीच्या स्तनांतून येणारा पहिला स्त्राव (चिकदुध) वासराला पाजवणे आवश्यक आहे. चीक दुधामध्ये मेद ३.५%, प्रथिने १४.३%, कर्बोदके ३%, कॅल्शियम ०.२६%, फॉस्फरस ०.४२%, लोह ०.२ मिलीग्रॅम/१०० ग्रॅम एवढ्या प्रमाणत आढळते. दुधामध्ये कॅल्शियम ०.१३% एवढे असते. वासरांसाठी चिकदुध आणि दुध हे कॅल्शियमचे महत्वाचे स्त्रोत आहेत. दुधामध्ये लोह (०.०५ मिलीग्रॅम/१०० ग्रॅम) एवढ्या प्रमाणात आढळते. लोह हे सर्वात कमी प्रमाणात दुधामध्ये आढळणारे खनिज आहे. त्यामुळे खानिजाची कमतरता टाळण्यासाठी वयाच्या दुस-या आठवडयानंतर वासराला, वासरांचे खाद्य (काफ स्टार्टर) देण्यास हळुहळू सुरूवात करावी; जेणेकरून वासरांची योग्यप्रकारे वाढ होईल. हा आहार वासरास ३ महिन्यापर्यत देता येतो. चिकदुध तसेच दुध वासराच्या वजनाच्या १०% दिवसभरात तीन वेळा द्यावे.

 

वासरांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार :

  • मुडदूस:

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे वाढीच्या जनावरांमध्ये हा आजार उद्भवतो. (वयस्कर जनावरांत उरमोडी) यामध्ये हाडे ठिसूळ होणे, हाडांची वाढ निट न होणे, स्नायूमध्ये अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसतात. हे टाळण्यासाठी लहान वयात वासरांना योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळणे आवश्यक आहे.

हेही वाचा : दुधाळ गाईंचे संपूर्ण व्यवस्थापन कसे करावे ?

दुधाळ जनावरांमध्ये कॅल्शियमचे महत्व:

कॅल्शियमची गरज दुधाळ जनावरामध्ये अधिक असते कारण गाई आणि म्हशी विल्यानंतर ४८ तासांच्या आत अचानक वाढलेल्या गरजेमुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होते आणि १ ते २ दिवसात जनावरांमध्ये आजाराची लक्षणे दिसू शकतात. चिक दुधामधून ०.२६% आणि दुधामधून ०.१२% इतक्या प्रमाणात कॅल्शियमचा प्रवाह होतो. कॅल्शियम दूधनिर्मितीमध्ये महत्वाचे आणि मुख्य खनिज आहे. एक लिटर दूध तयार करण्यासाठी साधारणत: २ ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. दुधामधून साधारणतः १.२ ग्रॅम/किलो एवढ्या कॅल्शियमची घट होते. संकरीत गाईमध्ये विशेषत: विदेशी गायीमध्ये कॅल्शियमची जास्त गरज लागते. संकरीत जनावरांचे दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे संकरीत जनावरांमध्ये कॅल्शियमची गरज जास्त प्रमाणात असते; तसेच त्यांच्या वासरांचा आकार देखील मोठा असतो. त्यामुळे संकरित जनावरांमध्ये देशी जनावरांपेक्षा कॅल्शियमची गरज जास्त असते.

सर्व साधारणपणे १० किलो चीक देणाऱ्या गायीच्या शरिरातून जवळपास २३ ग्रॅम कॅल्शियम चिकामध्ये स्रावले जाते; जे एकूण रक्तात असणाऱ्या कॅल्शियमच्या ९ पट जास्त असते. म्हणून अशावेळी रक्तातील कॅल्शियम कमी होते आणि जनावरे दुग्धज्वर आजारास बळी पडतात. अशी देंनंदिन कॅल्शियमची होणारी घट भरून काढण्यासाठी जनावरांना आहारात कॅल्शियम देणे गरजेचे आहे.

हेही वाचा : पशुप्रजननासाठी आवश्यक आहेत 'या' गोष्टी; वाढेल दूध उत्पनादनही

कॅल्शियमची घट भरून काढण्यासाठी जनावरांमध्ये विशेषतः आहारात लसूण घास किंवा द्विदल वनस्पती (उदा. लुसर्ण, बसिर्म, चवळी) किंवा इतर डाळवर्गीय चाऱ्याचा समावेश करावा. गाभण आणि दुधाळ गाई-म्हशीमध्ये जास्त क्षारांची गरज असते. या काळात शरिराची होणारी झीज किंवा दूध उत्पादनासाठी वापरली जाणारी उर्जा भरून काढण्यसाठी जनावरांच्या खाद्यात खुराक, बोनमिल, चुन्याची निवळी इ. कॅल्शियम चे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा वापर करावा. तसेच आहारात २५ ते ५० ग्रॅम क्षारमिश्रण द्यावे.

 

दुधाळ जनावरांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार :

  • दुग्धज्वर: या आजारास दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर असेही म्हणतात. गायी आणि म्हशी विल्यानंतर ४८ तासाच्या आत अचानक कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. विल्यानंतर १ ते ३ दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. जनावर अस्वस्थ दिसते. अशक्तपणा येऊन जनावर खाली बसते. तिसऱ्या व पाचव्या वेतामध्ये या आजारास बळी पडण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • किटोसीस : अति दुध उत्पादन असणाऱ्या जनावरांमध्ये व्यायल्यानंतर १ ते २ महिन्यांच्या कालावधीत हा आजार दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि शरिरात किटोन आम्लाचे प्रमाण जास्त वाढते. यामध्ये जनावरांच्या तोंडाला, लघवीला गोड वास येतो. जनावर रवंथ बंद करते. जनावरांचा आहार कमी होतो.
  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे गायी म्हशी मध्ये अवघड प्रसूती होते.
  • मायांग बाहेर येणे, झार अडकणे, स्तनदाह, प्रतिकारशक्ती कमी होणे यासारख्या समस्या दिसतात.

 हेही वाचा : कॅल्शियमची गरज ओळखून करा जनावरांच्या आहाराचे नियोजन

कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे:

  • काही जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असते, अशा जमिनीवर घेतलेल्या उत्पादनामध्ये आपोआप कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.
  • तसेच पिकांचे अवशेष (उदा. ज्वारीचा कडबा, तुरीची फसकट) यामध्ये देखील कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. यांचा जास्त प्रमाणात आहारात उपयोग केल्यास कॅल्शियमची कमतरता निर्माण होते.
  • जनावरांना आहारात उसाचे वाडे खाऊ घातले तर त्यात ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असते. जे कॅल्शियमच्या कमतरतेस कारणीभूत ठरते.
  • शरीरामध्ये गाभण काळात, लहान वासरांमध्ये हाडांच्या वाढीसाठी, दुधाळ गायी-म्हशी इ. कॅल्शियमची वाढती गरज
  • हाडांमधून कमी जास्त प्रमाणात कॅल्शियमची होणारी हालचाल तसेच ‘ड ’जीवनसत्वाची कमतरता सुद्धा यासाठी कारणीभूत ठरते.

 

   

डॉ. श्रद्धा राऊत, ९२७०७०६००३

    पशुपोषण आहारशास्त्र विभाग,

     पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय,

      उदगीर, जि. लातूर.

डॉ.  शरद दुर्गे.

calcium कॅल्शियम कॅल्शियमचे महत्व Importance of Calcium
English Summary: Calcium is essential in the diet of animals, know what is the importance

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.