दुधाळ गाईंचे संपूर्ण व्यवस्थापन कसे करावे ?

05 January 2021 12:59 PM By: भरत भास्कर जाधव
गाईंचे व्यवस्थापन

गाईंचे व्यवस्थापन

संकरित जातीच्या कालवडी लवकर वयात येतात. संकरित गाईंमध्ये दूध उत्पादनाची क्षमता जास्त असते, तसेच भाकड काळ कमी असतो.सामान्यतः जास्त दूध देणाऱ्या गाईचा मागचा भाग मोठा व रुंद असतो.चारही सड एकाच आकाराचे असतात. सडांची लांबी सारखी असते. कासेच्या शिरा या मोठ्या आकाराच्या, लांब व स्पष्ट दिसतात. कातडी ही तजेलदार, पातळ, मऊ असते. 

सर्वसाधारणपणे गाय समोरून निमुळती व मागे रुंद दिसते. त्यांचा बांधा भक्कम असतो. गोठा तुलनात्मकदृष्ट्या मोठा असतो.

गोठा नियोजन कसे असावे

 • भरपूर उजेड येईल, हवा खेळती राहील अशा ठिकाणी गोठे असावेत. गोठे उंचावर असावेत.

 • गव्हाणी टिकाऊ व पक्क्या असाव्यात.

 •  छप्पर मध्यभागी १५ फूट व बाजूस ६ ते ८ फूट असावे. जमीन पक्की असावी.

 • जनावरांच्या मागच्या बाजूस गोठा उतरता असावा, शेवटी मूत्रवाहक नाली असावी. 

 • प्रत्येक जनावरासाठी साधारणतः ६५ ते ७५ चौ. फूट जागा असावी. 

 • गोठा धुतल्यानंतर पाणी शेतीमध्ये जाईल अशी व्यवस्था करावी.

हेही वाचा : कॅल्शियमची गरज ओळखून करा जनावरांच्या आहाराचे नियोजन

दूध काढताना घ्यावयाची काळजी -

 • - दूध काढण्याअगोदर गोठा स्वच्छ करावा. त्यांनतर कास व शेपटीमागील भाग स्वच्छ पाण्याने धुवावा.

 • कास स्वच्छ फडक्याने कोरडी करावी. 

 • दूध काढणाऱ्या माणसाचे हात स्वच्छ असावेत. त्याला कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नसावा. त्याने नखे काढलेली असावीत.

  दूध कोरड्या हाताने काढावे.

 • दूध हलक्या हाताने आणि वेगाने काढावे. दूध काढण्याच्या वेळेत बदल करू नये.

 • दूध काढण्याची भांडी स्वच्छ व कोरडी असावीत.

 • प्रत्येक आठवड्याला कासदाह चाचणी करावी.

वासरांचे संगोपन -
- वासरू जन्मल्यानंतर गाय त्याच्या नाकातील कानातील व तोंडातील सर्व चिकट पदार्थ स्वच्छ करते; मात्र वासराचे कोवळे खूर लवकर काढावेत. 
- नाळ आपोआप तुटली नसल्यास ती २ ते ३ सेंटिमीटर अंतरावर जंतुनाशकामध्ये भिजवलेल्या दोऱ्याने घट्ट बांधून त्यापुढील भाग निर्जंतुक केलेल्या कात्रीने कापावा. त्यानंतर त्यावर दिवसातून २ ते ३ वेळा निर्जंतुक द्रावण लावावे.
वासरू जन्मल्यानंतर सुमारे एक तासाच्या आत त्याच्या वजनाच्या ८ ते १० टक्के चीक पाजावा. तसेच प्रतिदिवस याच प्रमाणात दूध पाजावे. वासराला दूध पाजाल्यानंतर थोडा वेळ तोंडाला मुसकी बांधावी.
 शिंगे वाढू नयेत म्हणून ७ ते १० दिवसाच्या आत तज्ज्ञांच्या सहकार्याने शिंगे काढावीत.

 

दुभत्या गाईचे संगोपन -
-गाईला दुधोत्पादनाच्या प्रमाणात खाद्य द्यावे. गाईला सरासरी १५ ते २० किलो हिरवा, ५ ते ८ किलो कोरडा चारा रोज द्यावा. दूध उत्पादनासाठी दुधाच्या ४० टक्के खुराक रोज द्यावा. त्याचप्रमाणे शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो खुराक द्यावा.
गाईंना रोज २ ते ३ तास फिरायला मोकळे सोडावे, त्यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होईल. जनावरांना समतोल खाद्य मिळेल याची काळजी घ्यावी.

हेही वाचा : गाई – म्हशीच्या गर्भधारणेसाठी ऑक्टोबर ते मार्चचा काळ असतो उत्तम 

माजावर आलेल्या गाईचे व्यवस्थापन
- गाय सुमारे २१ दिवसांच्या अंतराने माजावर येते. माजाची लक्षणे दिसल्यापासून सुमारे १० ते १८ तास भरल्यानंतर २० ते २१ दिवसांनी माज दाखवत नाही.
 काही गाई दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यांत माजावर येतात. अशा गाईंची पशुवैद्यकीयांकडून तपासणी करून औषधोपचार करावा.

गाभण गाईचे संगोपन -
- गाभण गाईंना शेवटच्या अडीच महिन्यांच्या काळात दीड किलो समतोल खाद्याचा जादा पुरवठा करावा. विण्याच्या अगोदर मोकळे फिरायला द्यावे. गाई विण्याच्या वेळी दूरूनच तिच्यावर लक्ष ठेवावे.
-गोठ्यात टोकदार दगड व खिळे असू नयेत.

जनावरांचे प्रसूतिपूर्व व्यवस्थापन महत्त्वाचे

जनावरांची उत्पादनक्षमता ही त्यांच्या आनुवंशिक गुणांवर त्याचप्रमाणे त्यांच्या वयात येण्यापूर्वीच्या शारीरिक वाढीवर अवलंबून असते. वयात येण्यापूर्वीची शारीरिक वाढ प्रामुख्याने गर्भात असतानाच्या वाढीवर अवलंबून असते म्हणून गाभण काळात जनावरांची योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

 

गाभण जनावरांची प्रसुतिपूर्व काळजी घेतल्यास पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येते. दुभत्या जनावरांबरोबर असणाऱ्या म्हशींचीही काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हशींचा गाभण काळ १० महिने १० दिवस कालावधीचा तर गायींचा गाभणकाळ ९ महिने ९ दिवसांचा असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा त्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, खनिज द्रव हे सर्व घटक समतोल प्रमाणात असावेत.

खाद्य व्यवस्थापन
- ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे, अशा हिरव्या कुरणात गाभण जनावरांना चरण्यासाठी सोडण्याची सोय असल्यास ते निश्चितच जनावरांच्या फायद्याचे ठरते, त्यामुळे गाभण जनावरांना ताजी वैरण खायला मिळते. बरोबरच मोकळ्या जागेत फिरायला मिळत असल्याने मोकळी हवा, सूर्यप्रकाश आणि आवश्यक तो शारीरिक व्यायाम होतो. 
हिरव्या चाऱ्याची सोय नसेल तर जनावरांना गोठ्यातच भरपूर प्रमाणात हिरवा चारा खाण्यास देता येईल, अशी व्यवस्था करावी.
शेवटच्या दोन महिन्यांत गर्भाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे या काळात चाऱ्यात वाढ करावी. कारण गर्भावस्थेच्या अंतिम काळात गाभण जनावराला स्वतःच्या पोषणाकरिता किमान एक ते दीड किलो पशुखाद्य द्यावे. गर्भाच्या वाढीसाठी आणखी एक ते दीड किलो जास्तीचे पशुखाद्य देण्याची गरज असते. अशा वेळी जास्त खाद्य दिल्याने गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते.

भाकड काळाचे नियोजन
- रेतन केलेल्या तारखेची नोंद महत्त्वाची असते कारण त्या नोंदीनुसार तिचे दूध काढणे बंद करावे. प्रसूतीच्या अडीच ते तीन महिने अगोदर दूध काढणे बंद करावे. 
- दूध काढणे बंद केल्यामुळे दुग्ध उत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गायीची झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी व गर्भातील वासराच्या वाढीसाठी उपयोगात आणले जाते. पुढील वेतातील दुधासाठी कासेची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होईल व विण्यापूर्वी गायीचे व गर्भातील वासराचे आरोग्य चांगले राहील. विण्यापूर्वी प्रत्येक गाय अडीच ते तीन महिने भाकड असावी. देशी गायीच्या दोन वेतात दीड ते दोन वर्षे अंतर राहते, त्या जेमतेम ६ ते ७ महिनेच दूध देतात म्हणजेच विण्यापूर्वी १२ ते १७ महिने ही भाकड राहतात. मात्र संकरित गायी आणि त्यामध्ये पहिल्या वेतातील गायी वेत संपत आले तरी बरेच दूध देतात. अशा गायी आटवणे खूप आवश्यक असते. 

 विण्यापूर्वी किमान अडीच महिने गाय भाकड राहिली पाहिजे नाहीतर त्यांचे पुढील वेतातील दूध उत्पादन निश्चितच कमी होते. 
गाय जर जास्त दुधाळ असेल तर याहून अधिक काळ म्हणजे तीन महिन्यांपर्यंत भाकड ठेवणे गरजेचे असते. गाय ३ ते ४ लिटर दूध देत असेल, तर धार काढणे एकदम बंद करावे. याहून जास्त दूध देणाऱ्या गायीचा खुराक बंद करावा. धार दिवसातून दोनदा काढत असल्यास ती एकदा आणि एकदा काढत असल्यास ती दोन-तीन दिवसाआड काढावी.

दूध कमी झाल्यावर एकदम धार थांबवावी. यामुळेही दूध कमी न झाल्यास गायीची हिरवी वैरण बंद करावी. आणि त्यानेही न झाल्यास एक दिवस पाणी कमी पाजावे हे उपाय योजण्यापूर्वी गायीला दुभत्या जनावरांपासून बाजूला काढून भाकड जनावरांमध्ये बांधावे. अशा रीतीने गाय आटल्यानंतर ती २-३ दिवसांत कास कमी करते, त्यानंतर तिच्या प्रत्येक सडात पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविक सोडावे. यामुळे भाकड काळात गायीला काससुजीचा धोका होणार नाही. गाय पूर्णतः भाकड (आटल्यानंतर) झाल्यानंतर गरजेनुसार आहार परत सुरू करावा.

 

लेखक : डॉ .गणेश उत्तमराव काळुसे.

            विषय विशेषज्ञ(पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय)

    डॉ .सी.पी .जायभाये

    कार्यक्रम समन्वयक

संकरित गाय संकरित गाई Hybrid cows cows व्यवस्थापन गायींचे व्यवस्थापन
English Summary: How to fully manage milk cows

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.