पशुपालन व्यवसायामध्ये दूध उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. वाढीव दुधउत्पादन मिळाले तर साहजिकच शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक उत्पादन देखील वाढते. परंतु यासाठी तुम्ही पाळत असलेल्या गाई किंवा म्हशीची जात आणि त्यांचे व्यवस्थापन ही बाब खूप महत्त्वपूर्ण आहे. जातिवंत गाय किंवा म्हशीच्या जातीची निवड ही दूध उत्पादनातील पहिली पायरी असते.
आता बरेच शेतकरी व्यवसायासाठी म्हैस पालन मोठ्या प्रमाणात करतात.आपल्याला माहित आहेच की, म्हशीमध्ये देखिल वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत व त्यांची दूध उत्पादनक्षमता जातीपरत्वे वेगवेगळी आहे. या पार्श्वभूमीवर आपण या लेखात म्हशीच्या महत्त्वपूर्ण जाती विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.
अधिक दूध उत्पादनासाठी लोकप्रिय आहे 'भदावरी' जातीची म्हैस
जर आपण भदावरी या म्हशीच्या दुधाचा विचार केला तर या म्हशीच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट असते. जर आपण जाणकारांचा मताचा विचार केला तर या म्हशीच्या दुधात 8 टक्के फॅट असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या म्हशीच्या दुधापासून जे काही तूप बनते त्याला बाजारपेठेत खूप मोठी मागणी असते.
भदावरी जातीच्या म्हशी आकाराने मध्यम असतात आणि त्यांच्या शरीरावरील केस कमी प्रमाणात असतात. या म्हशीचे पाय लहान असतात पण मजबूत असतात.
वजनाने असते जास्त
या जातीच्या म्हशी वजनाने जास्त असतात व साधारणपणे चारशे किलोग्रॅम वजन असते. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वजन जास्त असताना देखील या म्हशीचा आकार मात्र मध्यम असतो. त्यामुळे या म्हशी पाळण्यासाठी अधिक खर्च येत नाही.
तसेच कोणताही ऋतू या म्हशीसाठी जवळपास सारखाच असतो. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. या अत्यंत उष्ण व दमट हवामानात देखील सक्षमपणे तग धरतात.
तसेच इतर जातीच्या म्हशीपेक्षा या कमी आजारी पडतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या म्हशीपासून जन्माला येणाऱ्या पारडूचा मृत्युदर इतर म्हशीच्या पारडूच्या तुलनेत कमी असतो.
Share your comments