1. कृषीपीडिया

वाटाणा लागवडीचे हे तंत्रज्ञान देईल खूप नफा

नुकत्याच झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची पाण्याची चिंता काही प्रमाणात दुर झाली.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वाटाणा लागवडीचे हे तंत्रज्ञान देईल खूप नफा

वाटाणा लागवडीचे हे तंत्रज्ञान देईल खूप नफा

नुकत्याच झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची पाण्याची चिंता काही प्रमाणात दुर झाली. रब्बी हंगामातील लागवडीच्या पुर्वनियोजनाचा कालावधी आता सुरु झाला आहे. रब्बी हंगामात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात वाटाणा हे एक महत्वाचे पिक आहे. वर्षभर असणारी मागणी आणि चांगला भाव असे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. हे पिक कडधान्य वर्गातील असले तरी भाजी म्हणुनच ह्या पिकाला घरांसोबत हॉटेल्समध्येही भरपुर मागणी असते. हे पीक जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. भारतात वाटाण्याची लागवड प्राचीन काळापासून होत आहे. बडोदे, खानदेश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या ठिकाणी वाटाण्याची लागवड केली जाते.

हवामान व जमीन

सरासरी तापमान १० ते १८ सेल्सिअस असल्यास पिकाची वाढ चांगली होते. वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते. तर मध्यम भारी पण भुसभुशीत जमिनीत पीक तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. मात्र या जमिनीत उत्पादन चांगले मिळते. वाटाण्याच्या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार, रेतीमिश्रित आणि ५.५ ते ६.७ सामू असलेली जमीन निवडावी.

पुर्वमशागत

जमिनीची मशागत चांगली केल्यास मुळांची वाढ झपाट्याने होते.

शेत समांतर व भुसभुशीत करून घ्यावे.

लागवडीपूर्वी प्रति हेक्‍टरी दहा टन शेणखत मिसळून द्यावे.

लागवडीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास चोळावे.

लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 15 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश द्यावे.

लागवड

लागवड ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते.

या पिकासाठी ५० – ७५ किलो बियाणे पेरणी साठी वापरावे.

लागवड सरी वरंबे किंवा सपाट वाफ्यामध्ये 30 x 15 सें.मी. अंतराने करावी.

वाटाण्याचे बी जिब्रेलिक अँसीडच्या 100 पीपीएम द्रावणामध्ये 12 तास बुडवून नंतर लागवड केल्यास शेंगांचे उत्पादन वाढते.

बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम बियाण्यास चोळावे. बागायतीला पाणी देऊन वाफसा आल्यावर पेरावे.

खत व्यवस्थापन

ओलीताखाली लागवडीच्यावेळी हेक्टरी 50:75:50 ही खत मात्रा तर 25 किलो नत्र एक महीन्याने द्यावे. हेक्‍टरी आठ ते दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत लागवडीपुर्वी व लागवडीनंतर विभागुन द्यावे.

हे पीक जमिनीत नत्र स्थिरीकरण करत असल्याने नत्रयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी.

खते देतांना जमिनीवर फेकून न देता झाडाच्या भोवती ८ सें.मी. अंतरावर गोलाकार आळे करून द्यावे. नत्रयुक्त खते व पालाश झाडांच्या सान्निध्यात आल्यास बियांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो.

जाती व त्यांची वैशिष्ट्ये

असौजी

या जातीचे झाड बुटके असते. लवकर येणारी ही जात आहे. दाणा हिरवा व मऊ आवरण असलेला, लागवडीनंतर 30-35 दिवसांत फुलधारणा होते. शेंगा एकेरी लागतात. शेंगांची लांबी सात ते आठ सें.मी., गडद हिरव्या रंगाच्या असतात.

अलास्का

लवकर येणारी जात असून, दाण्याचा रंग निळसर-हिरवा असतो. झाडाची उंची 40-45 सें.मी. असते. फुलधारणा 38 दिवसांत होते. शेंगा एकेरी व हिरव्या रंगाच्या असून, शेंगांमध्ये पाच-सहा दाणे असतात.

मेटेओर

झाडाची उंची 35-40 सें.मी., गर्द हिरवा रंग, फुले एकेरी येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या, सात-आठ सें.मी. लांब व 58 ते 60 दिवसांत काढणीस येतात. ही जात ऑक्‍टोबरच्या सुरवातीस लावण्यासाठी उपयुक्त आहे.

बोनव्हीले

या जातीचे झाड मध्यम उंचीचे असून झाडास दुहेरी शेंगा लागतात. फुलधारणा 55-60 दिवसांत होते. शेंगांचा रंग फिक्कट हिरवा, शेंगा सरळ, साधारणतः नऊ सें.मी. लांब व शेंगामध्ये सहा ते सात दाणे असतात.

अपर्णा

ही बुटकी वाढणारी व जास्त उत्पादन देणारी जात आहे. मर रोगास व शेंगा पोखरणाऱ्या अळीस प्रतिबंधक आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो.

पाणी व्यवस्थापन

या पिकाला इतर भाजीपाला पिकांच्या मानाने कमी पाणी लागते.

लागवडीनंतर पिकास हलके पाणी द्यावे.

पाण्याची दुसरी पाळी फुलधारणेच्या काळात व तिसरी शेंगामध्ये दाणे भरत असताना द्यावी.

जमीन हलकी वाळू मिश्रित असल्यास नियमित पाण्याच्या पाळ्या द्याव्या.

किड व रोग व्यवस्थापन

रोग :

भुरी, करपा – या पिकावर हा रोग जास्त प्रमाणात पडतो. याच्या नियंत्रणासाठी कॅराथेन / गंधक / बाविस्टिन २.५ ग्रॅम / १ लिटर पाण्यातुन फवारावे.

पानांवरील ठिपके/तांबेरा– या रोगासाठी डायथेन एम -४५-२ ग्रॅम/लिटर पाण्यात फवारावे

मर – या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम ४ ग्रॅम/किलो बियाण्यावर प्रक्रिया करावी.

किडी :

या पिकावर सोंड्या भुंगा, शेंगा पोखरणारी अळी, मावा, तुडतुडे, शेंगा पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो.

त्यांच्या नियंत्रणासाठी मोनोक्रटोफॉस १.५ मि.ली./लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.

काढणी व उत्पादन :

वाटाणा ४५ ते ६५ दिवसात काढणीस तयार होतो.

शेंगाचा गडद हिरवा रंग बदलून त्या फिक्कट हिरव्या रंगाच्या व टपोऱ्या दिसू लागतात.

English Summary: This technology of pea cultivation will give a lot of profit Published on: 25 February 2022, 10:56 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters