शंखी (गोगलगायी) यंदा मोठ्या प्रमाणात शेतातील पिके व फळपिकांवर दिसायला लागल्याने शेत पिकांना जास्त धोका निर्माण होऊ लागला आहे. अगोदर उत्पादन खर्चाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या शंखी गोगलगायीने अधिक संकटात टाकण्याची भिती निर्माण केली आहे. सध्या कसेबसे वाचलेल्या पिकांवरच ही शंखी गोगलगाय हल्ला करू लागली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान कसे टाळता येईल, याकडे शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत. पण यातून पिक वाचतील की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
गोगलगाय ही बहूभक्षी किड असून ती विशेषतः रोपावस्थेत पिकावे अधाशासारखे पाने खावून नुकसान करते. गेल्या ४ ते ५ वर्षा पासून विदर्भात ही किड कोणत्या ना कोणत्या पिकावर नुकसान करतांना आढळून येत आहे. विदर्भात यावर्षी सुध्दा या किडीचा प्रादुर्भाव नाकारता येत नाही. तर सध्यस्थितीत अमरावती जिल्हयात विविध पिकावर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून काही पिकांना नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या किडीला पाउस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान (२० अंश ते ३२ अंश सें.) पोषक आहे. तरी शेतकरी बंधूंनी वेळीच सतर्क राहून प्रादुर्भाव ग्रस्त भागात या किडीचे नियमित सर्वेक्षण करावे.
शंखी (स्नेल) तसेच शेंबडी (स्लग) हे प्राणी मालुस्का या वर्गात समाविष्ट कलेले आहेत. शंखीच्या अंगावर टणक कवच असते तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते. गोगलगाय सरपटत चालते व चालतांना सतत शेंबडासारखा चिकट स्त्राव सोडते, त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते.शेतात हा स्त्राव वाळल्यावर त्या जागेवर पांदुरका चकाकणारा पट्टा दिसतो. त्यावरून आपण या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखू शकतो. ही किड रात्रीच्या वेळी सक्रीय राहून पिकाचे नुकसान करते. तर दिवसा ती दगड, पालापाचोळ्यावे खाली, झाडाच्या खोडाभोवतालच्या दाट गवतात, जमिनीला लागून झाडाच्या असलेल्या फांदया खाली इ. ठिकाणी लपते.
परिचय व नुकसान क्षमता:
१) शंखीच्या पाठीवर एक ते दिड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी गई, करडया, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात.
२) शंखी गोगलगाय आफ्रिकन जॉइन्ट स्नेल या नावाने परिचित असून, तिचे शास्त्रीय नाव अचेटिना फुलिका आहे. ती निरनिराळ्या ५०० वनस्पती खाऊन उपजिविका करते. जमिनीवर पडलेली पिवळी पाने (त्यात कॅल्शियम जास्त असतो), फुले, फळे, शेणखत, जनावरांचे शेण, कागदाचे पुढे आदीं, कुजलेला कचरासुध्दा त्या खातात. रात्री त्या आक्रमक होवून पानाला छिद्रे पाडतात. कळया, फळे, फुले, साल, नवीन फुटलेले कोंब, नवीन लावलेली रोपे, भाजीपाला, फळझाडे, कडधान्य, तेलबिया पिके आदीचा फडशा पाडतात. शंखीचा उपद्रव भाजीपाला पिकांची रोपे तसेच पुर्ण वाढलेली पपई, केळी, वाल, दोडक्याचे वेल, वांगी, भेंडीची झाडे, काकडीवर्गीय पिके, मिरची, पानकोबी, फुलकोबी, तसेच इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांना होतो.
जीवनक्रम:
सुक्ष्मदर्शीपासून निरनिराळ्या आकाराच्या शंखी आढळून येतात. पुर्ण वाढ झालेल्या शंखीची लांबी १५ ते १७. ५ सेंमी असते. सर्व गोगलगायी हया बाहुलिंगी असून त्या अंडी देण्यास सक्षम असतात. अंडी गोलाकृती व पांढन्या रंगाची साबुदाण्यासारखी असतात. एक मादी सरासरी ८० ते १०० अंडी एकाचवेळी पिकाच्या खोडाशेजारी किंवा मुळाजवळ भुसभुशीत मातीत तीन ते पाच सेंमी खोलीवे छिद्र करून अंडी घालते. अशाप्रकारे एक मादी वर्षातून ६ वेळा अंडी देते.
सर्वसाधारण १७ दिवसापर्यत अंडयातुन पिल्ले बाहेर येतात. त्यांची वाढ पुर्ण होण्यास आठ महिने ते एक वर्ष कालावधी लागतो. या काळात ही पिल्ले पिकांचे नुकसान करतात. शंखी रात्रीच्या वेळी कार्यक्षम असते. दिवसा ती सावलीमध्ये पानाखाली किंवा ओल्या जागी आढळते. शंखी अती थंड किंवा अती उष्ण हवामानात आपल्या कवचावे तोंड पातळ पापद्याने बंद करून झाडाला/भिंतीला विटकून सुप्तावस्थेत जाते.
प्रसार : या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरात असणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर ट्रॉली, तसेच अन्य साधनांमधुन होतो, तसेच ते वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे प्लॉस्टीकचे ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळु, कलम, रोपे, बेणे, ऊस, मास आदीमार्फतही होतो, गोगलगायी सर्वसाधारणपणे अन्नपाण्याशिवाय चार ते सहा महिने जिवंत राहु शकतात.
व्यवस्थापन:
१) शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत व वेळोवेळी शेतात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी.
२) गोगलगायीच्या लपण्याच्या जागा शोधुन त्या स्वच्छ व सपाट कराव्यात.
३) प्रादुर्भावग्रस्त शेतात तूषार सिंचना ऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा म्हणजे जमिनीत ओलावा व हवेत आर्द्धता कमी राहील त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
४) गोगलगायीची अंडी मातीमध्ये खोडाशेजारी तसेच गवताच्या ढिगाखाली पुंजक्याने घातलेली असतात, ती शोधून नष्ट करावी.
५) सापळे : १ ते दिड फुट लांबीच्या दोन लाकडी पाटयांना रीपा ठोकून बोर्ड तयार करावे व असे बोर्ड प्रादुर्भावग्रस्त भागात ठिकठिकाणी रिपा खालच्या बाजूने राहील अशा पध्दतीने ठेवावे किंवा गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवुन संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावीत. त्यावर गोगलगायी आकर्षित होईल. अशाप्रकारचे सापळे आवश्यकतेनुसार तयार करून त्याखालील गोळा झालेल्या गोगलगायी सकाळी सुर्योदयानंतर जमा करून साबणाच्या द्रावणात बुडवून नष्ट कराव्यात. तसेच प्रादुर्भावग्रस्त भागाचे नियमित सर्वेक्षण करून संध्याकाळी आणि सुर्योदयापुर्वी बाहेर आलेल्या व दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवून नष्ट कराव्या.
६)१५% मीठाच्या द्रावणामध्ये गोणपाट बुडवून प्रादुर्भावग्रस्त भागामधे १० गोणपाट प्रती एकर याप्रमाणे अंथराव्या. म्हणजे गोगलगायी दिवसा गोणपाटाखाली लपण्यासाठी जमा होऊन मिठाच्या संपर्कात येवून नष्ट होतील किंवा जमा करून नष्ट कराव्यात.
७) अळथडे : प्रादुर्भावग्रस्त फळबागेत खोडावर पातळ पत्र्याचे बॅड लावावे म्हणजे गोगलगाय झाडावर चढणार नाही. पत्राचे बॅड तयार करण्यासाठी चार ते पाव इंच रुंदीच्या पट्ट्या कापाव्या व त्या रुंदीला मध्यभागी काटकोनात मोडाव्या व खोडाच्या घेरानुसार लांबीला कापून खोडावर बॅड लावावे.
८) बागेत सर्वसाधारणपणे दर वर्षी खोडावर बोर्डो पेस्ट लावावे म्हणजे गोगलगाई झाडावर चढणार नाही. ही पेस्ट सर्वसाधरण एक ते दोन वर्षापर्यंत प्रभावी राहू शकते.
९) गोगलगायीचे वास्तव्य मुख्यत्वेकरून बांधावर, गवतामध्ये असते. त्यामुळे त्यांना शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी चुन्याची भुकटी यांचा चार इंच पट्टा बांधाच्या शेजारी टाकावा. जेणेकरून त्या पट्टयाच्या संपर्कात आल्यास त्या मरून पडतात. परंतु पाऊस असल्यास किंवा जमीन ओली असल्यास याचा फारसा उपयोग होत नाही.
१०) ल्युकोडर्मासारखा रोग शंखीमध्ये आढळतो या रोगाने ग्रासीत असलेल्या शंखीवा पाण्यातील अर्क शेतातील इतर सुदृढ शंखीवर फवारला तर त्यांच्यामध्ये देखील रोगाची लागण होते आणि त्या मरतात.
११) परमयाक वाणी (Millipede Orthomorpha sp.) हा आपल्या स्टीक ग्रंथीमधुन हायड्रोसायनिक आम्ल शंखीवर टाकतो त्यामुळे त्या निष्क्रीय होतात व नंतर तो त्यांना खाऊन टाकतो.
१२) शेतातुन मोठया शंखी जमा करून प्लास्टीक पोत्यात भराव्यात व त्यामध्ये चुन्याची फंकी (पावडर) किंवा कोरडे मीठ टाकुन पोते शिवुन धुन्याकाठी ठेवावेत. त्यामुळे त्या आतच्या आत मरून जातात.
१३) प्रभावी नियंत्रणासाठी मेटाअल्डीहाइड २.५ टक्के भुकटी २ किलो प्रति एकर या प्रमाणे रोपांवर/झाडांवर, भाजीपाला, संत्रा व धान या पिकांमधे धुरळणी करावी. धूरळणी केल्यावर ३ ते ४ दिवस ओलीत करू नये. तसेव जनावरांना धुरळणी क्षेत्रात चरू देउ नये. धूरळणी करतांना स्वंरक्षणासाठी पोषाख, हँडग्लोज तसेच नाकावरील मास्कचा उपयोग करावा.
अशा प्रकारे उपाययोजना केल्यास गोगलगायींचे चांगले नियंत्रण होते. या किडीची सामुहिक पध्दतीने मोहीमेव्दारा उपाय योजना केल्यास हमखास नियंत्रण होते. या करीता सर्व स्तरावरून कार्यवाही करणे गरजेचे आहे.
Share your comments