उन्हाळी भुईमुगाच्या पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे यथायोग्य अंतराने साधारणता 15 ते 17 पाण्याच्या पाळ्या ची गरज असते. उन्हाळी भुईमूग पेरणीपूर्वी पहिली पाण्याची पाळी द्यावी व वापसा आल्यानंतर पेरणी करावी व पेरणीनंतर लगेच दुसरी हलकी पाण्याची पाळी द्यावी. त्यानंतर उगवण होईपर्यंत पाणी देण्याची आवश्यकता पडणार नाही. उगवण झाल्यावर खांडन्या असल्यास त्या भरून घ्याव्या व लगेच पाण्याची तिसरी पाळी द्यावी. या पाण्याच्या पाळीमुळे सर्व बियाणे पूर्णपणे उगवून येईल व नंतर पिकास पाण्याचा ताण सुरू करावा. हा ताण दिल्याने उन्हाळी भुईमूग पिकास जास्त फुले येण्यास मदत होते.
हा पाण्याचा ताण जमिनीच्या मगदुरानुसार साधारणता पंधरा ते पंचवीस दिवस किंवा पिक सुकल्यासारखे दिसेपर्यंत किंवा भुईमुगाला प्रथम फूल दिसेपर्यंत चालू ठेवता येईल. हा तान दिल्यामुळे ओलिताची बचत तर होतेच शिवाय जास्त फुले लागण्यासाठी मदत होते. अर्थात हा तान देताना ताणाचा कालावधी जमिनीच्या मगदुरानुसार तसेच झाडाची सुकण्याची स्थिती लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार योग्य कालावधीत तोडावा. साधारणता या ताना नंतर चौथी पाण्याची पाळी द्यावी.यानंतर मात्र उन्हाळी भुईमूग पिकास पाण्याचा ताण पडणार नाही किंवा पाण्याची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमूग पिकास साधारणता जमिनीच्या मगदुरानुसार फेब्रुवारी महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने तीन ओलीत,
मार्च महिन्यात सात दिवसाच्या अंतराने चार ओलीत एप्रिल महिन्यात सहा दिवसांच्या अंतराने पाच ओलीत व मे महिन्यात पाच दिवसांच्या अंतराने सहा ओलीत अशा फेब्रुवारी ते मे सर्वसाधारणपणे 17 ते 18 पाण्याच्या पाळ्या व सुरुवातीला लागणाऱ्या तीन पाण्याच्या पाळ्या अशा एकूण 22 पाण्याच्या पाळ्याचे नियोजन करून ठेवल्यास व गरजेनुसार ओलिताच्या कालावधी कमी अधिक करून तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास सर्व पिकास सारखे पाणी मिळून अधिक उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमूग पिकास सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीने ओलीत केल्यास अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळतो असे आढळून आले आहे. तुषार सिंचन पद्धतीने किंवा स्प्रिंकलरने कमी पाणी जास्त वेळा उन्हाळी भुईमूग पिकास दिल्यास विशेष मानवते. स्प्रिंकलरच्या नोझल मधील अंतर इतके असावे की सर्व पिकास सारखे पाणी मिळेल. सर्व पिकास सारखे पाणी मिळाले नाही तर नुकसान होऊ शकते.
उन्हाळी भुईमुगाच्या पीक वाढीच्या नाजूक अवस्था उदाहरणार्थ फुलोरा अवस्था, आर्या धरण्याची अवस्था, शेंगा ची वाढ होण्याची अवस्था या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिल्यास उन्हाळी भुईमूग पिकाची अवास्तव वाढ होऊन तसेच पिकात पाणी साचून राहिल्यास जमिनीतून अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यात बाधा निर्माण होऊन भुईमुगाचे पीक पिवळे पडून उत्पादनात घट येऊ शकते त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी भुईमूग पिकास दिले जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी.
Share your comments