कोरडवाहू आणि बागायत क्षेत्रासाठी ज्वारीचे वाण

Sunday, 08 September 2019 04:18 PM


दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाणांची उत्पादन क्षमता स्थानिक वाणापेक्षा जास्त असते. तसेच अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही अत्यंत महत्वाची असते. त्याकरिता योग्य ज्वारीच्या वाणांची उपलब्धता करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जमिनीच्या खोलीनुसार, ज्वारीचे विविध वाण राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जरी ज्वारीची लागवड ही 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केलेली असली तरी राज्यातील काही भागात गोकुळ अष्टमी पासून पेरणीला सुरुवात होते. काही शेतकरी 15 सप्टेंबर नंतर पेरणीला सुरुवात करतात. तर काही शेतकरी हस्ताचा पाऊस पडून गेल्यानंतर पेरणी करतात. विविध भागातील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्या नुसार पेरणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी ज्वारीच्या वाणांची निवड ही अत्यंत महत्वाची. त्याकरिता प्रस्तुत लेखात कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी ज्वारीचे वाण व त्यांची वैशिष्टे याबाबत माहिती दिली आहे.

कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित/संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत.

हलकी जमिन (खोली 30 से.मी)

फुले अनुराधा, फुले माऊली

मध्यम जमिन (खोली 60 से.मी)

फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी 35-1

भारी जमिन (60 से.मी पेक्षा जास्त)

सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही 22, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती
संकरित वाण: सी.एस.एच. 15 आणि सी.एस.एच. 19

बागायतीसाठी

फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही. 18, सी.एस.एच. 15, सी.एस.एच. 19

हुरड्यासाठी

फुले उत्तरा, फुले मधुर

लाह्यांसाठी

फुले पंचमी

पापडासाठी

फुले रोहिणी


फुले अनुराधा:

 • कोरडवाहू क्षेत्रासाठी, हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.
 • पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस.
 • अवर्षणास प्रतिकारक्षम.
 • भाकरी उत्कृष्ट, चवदार.
 • कडबा अधिक पौष्टीक व पाचक.
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
 • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 8-10 क्विं. व कडबा 30-35 क्विं.

फुले माऊली:

 • हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य.
 • पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस.
 • भाकरीची चव उत्तम.
 • कडबा पौष्टीक व चवदार.
 • धान्याचे उत्पादन हलक्या जमिनीत हेक्टरी 7-8 क्विं. व कडबा 20-30 क्विं.
 • धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत हेक्टरी 15-20 क्विं. व कडबा 40-50 क्विं.

फुले सुचित्रा:

 • मध्यम जमिनीसाठी शिफारस.
 • पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस.
 • उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत.
 • धान्य उत्पादन 24-28 क्विंटल व कडबा 60-65 क्विंटल.

फुले वसुधा:

 • भारी जमिनिकारिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
 • पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस.
 • दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.
 • भाकरीची चव उत्तम.
 • ताटे भरीव, रसदार व गोड.
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
 • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 24-28 क्विं. व कडबा 65-70 क्विं.
 • बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 30-35 क्विं. व कडबा 70-75 क्विं.


फुले यशोदा:

 • भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित.
 • पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस.
 • दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार, भाकरीची चव चांगली.
 • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 25-28 क्विं. व कडबा 60-65 क्विं.
 • बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 30-35 क्विं. व कडबा 70-80 क्विं.

सी एस व्ही.22:

 • भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
 • पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस.
 • दाणे मोत्यासारखे चमकदार, भाकरीची चव चांगली.
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
 • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 24-28 क्विं. व कडबा 65-70 क्विं.
 • बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 30-35 क्विं. व कडबा 70-80 क्विं.

परभणी मोती:

 • भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
 • पक्व होण्याचा कालावधी 125 ते 130 दिवस.
 • दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
 • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 17 क्विं. व कडबा 50-60 क्विं.
 • बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 32 क्विं. व कडबा 60-70  क्विं.

फुले रेवती:

 • भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस.
 • पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
 • दाणे मोत्यासारखे, पांढरे चमकदार.
 • भाकरीची चव उत्कृष्ट.
 • कडबा पौष्टीक व अधिक पाचक.
 • धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 40-45 क्विं. व कडबा 90-100 क्विं.

मालदांडी 35-1:

 • मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी शिफारस.
 • पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
 • दाणे चमकदार, पांढरे.
 • भाकरीची चव चांगली.
 • खोडमाशी प्रतिकारक्षम.
 • धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 15-18 क्विं. व कडबा 60 क्विं.

फुले उत्तरा:

 • हुरड्यासाठी शिफारस.
 • हुरड्याची अवस्था येण्यास 90-100 दिवस.
 • भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात.
 • सरासरी 70-90 ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
 • हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.

फुले पंचमी:

 • लाह्याचे प्रमाण (वजनानुसार) 87.4 टक्के.
 • लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात.
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
 • महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी लाह्यांसाठी प्रसारित.

कोरडवाहू रब्बीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी. शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर पेरणी करणे हिताचे आहे. योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव अधिक होतो. पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 1 किलो बियाण्यास 300 मेष गंधकाची 4 ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे कानी हा रोग  येत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम एझोटोबॅकटर व पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने 45 से.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यातून पेरावे. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी 45x12 से. मी. अंतरावर करावी. कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर 20 से.मी ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

लेखक:
डॉ. आदिनाथ ताकटे
(मृद शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
9404032389

sorghum jowar ज्वारी कोरडवाहू Mahatma Phule Krishi Vidyapeeth महात्मा फुले कृषी विद्यापीठ मालदांडी maldandi

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.