1. कृषीपीडिया

जमिनीची सुपीकता आणि शाश्वत पर्याय

भारतामध्ये पीकपद्धती आणि खतवापराविषरी विविध गैरसमज पाहायला मिळतात

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जमिनीची सुपीकता आणि शाश्वत पर्याय

जमिनीची सुपीकता आणि शाश्वत पर्याय

भारतामध्ये पीकपद्धती आणि खतवापराविषरी विविध गैरसमज पाहायला मिळतात. देशात वाढत्या लोकसंख्येला मुबलक प्रमाणत अन्नधान्य पुरवण्यासाठी जास्तीत जास्त धान्य उत्पादनाची आवश्यकता आहे. यासाठी रासायनिक खतांचा वापर अनिवार्य आहे संकरित आणि सुधारित पिकांच्या वाणांबरोबरच रासायनिक खतांच्या वापराने देशात पिकांच्या उत्पादनात उच्चांक गाठले गेले आहेत. वाढत्या उत्पादनात रासायनिक खतांचा सहभाग 50 टक्क्यांपर्यंत गेला आहे.

रासायनिक खतांची शिफारस केलेली मात्राच पिकास पोषक ठरते. शिफारशीपेक्षा अधिक किंवा कमी खतांची मात्रा जमिनीत/पिकांत असमतोल निर्माण करते. यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर आणि उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. जमिनीमध्ये खत घातल्यानंतर रासायनिक प्रकिया घडतात आणि त्याद्वारे उपलब्धावस्थेतील अन्नद्रव्ये बऱ्याच वेळेस उपलब्ध नसलेल्या अवस्थेत जातात. परिणामी पिकांची अनैसर्गिक वाढ होवू लागली. यामुळे रोग, किडीचे प्रमाण वाढू लागले. त्याचे नियंत्रण करण्यासाठी मग रासायनिक किटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. या सर्व बाबींमुळे पिकाच्या शरीर रचनेत बदल होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या. पिकाची खूप शाखीय वाढ, पाने फुले कमी येणे, गळ होणे, फुले, फळे न येणे या समस्या येवू लागल्या. पुन्हा या समस्या सोडवण्यासाठी संजीवकाचा वापर होऊ लागला. तसेच तणनियंत्रण मजूरांच्या सहाय्याने करणे अवघड झाल्यामुळे तणनाशकांचा वापर वाढला. पाणी व्यवस्थापन चूकीचे होऊ लागले.

सुपीक जमीन :

ज्या जमिनीमध्ये २५% हवा, २५% पाणी, ४५% खनिज पदार्थ, ५% सेंद्रिय पदार्थ असतात अशी जमीन पिकाच्या वाढीसाठी उत्कृष्ट समजली जाते. पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या स्पर्धेमुळे एकात्मिक निविष्टा वापराच्या तंत्रास सोईस्कर बगल देऊन बेसुमार पणे रासायनिक निविष्ठांचा वापर वाढु लागला आणि जमिनी कधी नापीक झाल्या हे समजलेच नाही.

जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवून ठेवायची असेल तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापना शिवाय पर्याय नाही

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

सेंद्रिय, रासायनिक आणि जैवीक खतांचा एकत्रित वापर, सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण आणि योग्य पीकपद्धतीचा अवलंब करून पिकास अन्नद्रव्ये पुरविण्याच्या पद्धतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात. एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खताच्या वापराबरोबर सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जीवाणू खते, हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडीकचरा, इतय टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून मिळणारा खताचा समतोल साधला जातो. या पद्धतीला द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत, तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपीकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्यांचे नियोजन विविध स्रोतांतून करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविली जाऊन उत्पादनात वाढ होते, तसेच जमिनीचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते. त्याकरिता सेंद्रिय पदार्थ सहभाग 30 ते 35 टक्के असावा. जैविक खते 20 ते 25 टक्के आणि रासायनिक पदार्थ (खते) 40 ते 50 टक्के असावा. परंतु सेंद्रिय खंतांची उपलब्धता आणि खर्च पाहुन त्यांचा वापर कमी होत आहे आणि जमिनीची सुपीकता बिघडण्यास मुख्य कारण ठरत आहे.

अधिक माहितीसाठी सपंर्क ७०२०२१६१२३, ७९७२९६७७७८

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे फायदे:

१) सेंद्रीय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.

२) पीक पद्धतीत पहिल्या पिकास वापरलेल्या सेंद्रीय खतांचा वापर पुढील पिकासही उपयुक्त ठरतो.

३) जमिनीच्या भौतिक गुणधर्मात (उदा. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे, पाणी मुरविणे, जमीन भुसभुशीत करणे इत्यादी) सुधारणा होऊन जमिनीस फूल येण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होते.

४) जमिनीची जलधारण शक्ती, जैव रासयानिक प्रक्रियांचा समतोल राखला जातो.

५) उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.

६ ) जमिनीतील कर्ब – नत्र यांच्या प्रमाणात समतोल प्रमाणात राखला जातो.

७) योग्य पीक फेरपालटीचा व आंतरपीक पद्धतीचा पुढील पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषाचा जमिनीत प्रथम आच्छादन आणि नंतर सेंद्रीय खत म्हणून वापर केल्यास जल व मृदसंधारण तसेच अन्नद्रव्यांचे संधारणही करता येते.

८) जमिनीतील पिकांना पोषक नसणाऱ्या गुणधर्मावर मात करून पीक उत्पादन यशस्वीरीत्या घेता येते. उदा. चुनखडीयुक्त जमिनीत सेंद्रीय खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य दिली असता त्यांची पिकास उपलब्धता वाढते व पीक उत्पादनात वाढ करता येते.

येणाऱ्या काळात पिक उत्पादन व जमिनीची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक नियोजन, सेंद्रिय खताचा वापर, पिक फेरपालट जिवाणू खताचा रासायनिक खताचा संतुलित वापर कमीत कमी किटकनाशाके बुरशी नाशके यांचा वापर करून निसर्ग चक्र टिकवणे ही काळाची गरज आहे.

 

डॉ. विश्वजीत कोकरे

प्रबंधक होय आम्ही शेतकरी

डेप्युटी मॅनेजर, ऍग्री अडव्हायजरी सर्व्हिसेस, झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड

English Summary: Soil fertility and sustainable alternatives Published on: 22 April 2022, 07:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters