एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक कीडनाशकांच्या वापरामध्ये वाढ होत गेली आहे. पिकामध्ये कीड दिसली की आर्थिक नुकसानीची पातळी वगैरे फारसा विचार न करता रासायनिक नियंत्रणाचे उपाय वापरले जातात. याचे विपरीत परिणाम - १. रासायनिक कीडनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये दिसत असून, त्याचे परिणाम मानवी आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहेत. परदेशातील कीडनाशक अवशेषाबाबतचे धोरण कडक असून, असे अवशेष आढळल्यामुळे शेतीमाल नाकारला जात आहे. २. सततच्या वापरामुळे किडींची रसायनाविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढली आहे. ३. पिकावरील किडींचे नैसर्गिक शत्रू सततच्या फवारणीमुळे नष्ट झाल्याने किडींवरील नैसर्गिक अंकुश नाहिसा होत आहे. परिणामी पूर्वी अल्प प्रमाणात नुकसान करणाऱ्या किडीही रौद्ररूप धारण करताना दिसत आहेत. ४. परागीभवन करणाऱ्या मधमाश्या, बंबल बी अशा शेतीसाठी आवश्यकत कीटकांची संख्या कमी होत आहे. या ऐवजी शेतीमध्ये पिकांचे निरीक्षण करून योग्य वेळी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय वापरणे आवश्यक आहे. या उपायासाठी निसर्गाला समजून घेतल्यास खर्चात बचत शक्य होईल. त्यासाठी खालील टीप्स उपयोगी ठरतील. कीड व रोगांची ओळख करून घेणे : आपण सामान्यतः जी पिके शेतात घेतो, त्यातील हानिकारक व उपयुक्त कीटकांचा परिचय करून घ्यावा.
त्यासाठी परिसरातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांतील कीटकशास्त्रज्ञ, रोग व विकृती शास्त्रज्ञ यांची मदत घ्यावी. शेतीविषयक माहिती गोळा करत राहावी. कीड व रोगप्रतिकारक वाणांची निवड : आपल्या परिसरात येणाऱ्या कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाची माहिती करून घ्यावी. अशा कीड किंवा रोगांना प्रतिकारक किंवा सहनशील जाती मिळवण्याचा प्रयत्न करावा. अधिक उत्पादनक्षम अशा कीड - रोग प्रतिकारक वाण कृषी विद्यापीठातून जाणून घ्यावेत. त्यांच्या बियाणांची मागणी करावी. पिकांची फेरपालट : एकाच प्रकारातील किंवा कुळातील पिकांची लागवड करू नये. उदा : तूर, हरभरा, टोमॅटो आदी पिकांवर घाटे अळीची उपजीविका होते. या पिकानंतर कपाशीचे पीक घेऊ नये. अन्यथा घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. पेरणीच्या वेळात बदल : विभागवार पेरणीची एकच वेळ ठरवून पीक घ्यावे. अन्यथा एका विभागातील किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. यालाच ‘झोनल सिस्टीम ऑफ प्लॅंटींग’ असे म्हटले जाते. शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर : पिकास नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर शिफारशीनुसार करावा. शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त खतांचा वापर केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पालाश किवा सिलिकायुक्त खताचा शिफारशीप्रमाणे वापर केल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. सापळा पिके : मुख्य पिकाचे हानिकारक किडींपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावले जाते. सापळा पिकांची लागवड ही शेताच्या चारी बाजूनी करतात. याला ‘पेरीमीटर ट्रॅप क्रॉपिंग’ किंवा ‘पी.टी.सी.’ असे म्हणतात. विविध पिकांसाठी आवश्यक सापळा पिकाची निवड तज्ज्ञांच्या साह्याने करावी. आपल्या शेताचा आकार, मुख्य पिकाचे एकूण क्षेत्र इत्यादी वरून सापळा पिकाचे क्षेत्र अथवा त्याची प्रति चौरस मीटर संख्या (घनता) ठरवावी.
सापळा पीक वापरण्याची तत्त्वे :
सापळा पीक हे मुख्य पिकाच्या जीवनकाळात सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.मुख्य पिकाशी अन्नद्रव्य, पाणी, जागा व प्रकाश या बाबतीत कमीतकमी स्पर्धा करणारे असावे.टप्प्याने सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज, अळ्या, कोष आणि प्रौढ अवस्था गोळा करून नष्ट कराव्यात. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.
उदा.कापूस या पिकाभोवती पिवळ्या रंगाच्या झेंडूची एक बॉर्डरलाइन लावून घ्यावी. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालतो. झेंडूच्या मुळामधून हानिकारक अल्फा टर्थीनील हे रसायन स्रवत असल्याने सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते. सणासुदीला या पासून मिळालेल्या फुलांतून अतिरीक्त उत्पन्न मिळू शकते. कपाशीमध्ये मुग, चवळी, मका यासारखी पिके घेतल्यास नैसर्गिक मित्रकीटकांचे प्रमाण वाढते. मुख्य किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
भुईमूग पिकात शेताच्या चारी बाजूने सूर्यफूल या पिकाची बॉर्डरलाइन म्हणून लागवड करावी. भुईमुगावर येणारी केसाळ अळी, स्पोडोप्टेरा अळी अशा किडी सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भाव ग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत. किंवा आवश्यकतेनुसार जैविक अथवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. ती कीड मुख्य पिकास हानी पोचवणार नाही.
जैविक नियंत्रण : एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जैविक नियंत्रण ही महत्त्वाचे आहे. यामध्ये परोपजीवी कीटक, भक्षक कीटक, सूक्ष्म जिवाणू, विषाणू, बुरशी अशा घटकांचा समावेश होतो. या बाबी निसर्गात उपलब्ध असतात. मात्र, शेतामध्ये नियंत्रणाच्या अनुषंगाने योग्य प्रमाणात सोडण्याची आवश्यकता असते. प्रयोगशाळेत त्यांची अंडी व बिजाणूंची योग्य अशा वातावरणामध्ये वाढ केली जाते. अशा घटकांची उपलब्धता जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा, कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ होऊ शकते. त्यांचा वापर बीजप्रक्रियेपासून विविध टप्प्यामध्ये करता येतो. ती नेमकी समजून घ्यावी. यामुळे शेती उत्पादनातील कीडनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण कमी ठेवणे शक्य होऊ शकते. उदा : ट्रायकोग्रामा, ऑस्ट्रेलियन बिटल असे मित्रकिटक. ट्रायकोडर्मा बुरशी.
संपर्क - संदीप कानवडे, ९९२१५८३८५८ (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर, जि. नगर.)
Share your comments