गेल्या 6-7 वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अविरतपणे लढा देत असतांना एका गोष्टीचा निश्चितच आनंद होत आहे कि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीतून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहचले आहे.
आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधव आता कांद्या संदर्भातील कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे मोठ्या अधिकाराने आणि अपेक्षेने प्रश्न मांडत आहेत.
परंतु या 6-7 वर्षांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनात आले आहेत आणि ते म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध बाजार समित्यांमधील सभापती, संचालक मंडळ, सचिव, अडते, व्यापारी, निर्यातदार अशा विविध घटकांकडून कांदा उत्पादक शेतकरी हे वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच लुटले जातात आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्षांनुवर्षे आर्थिक संकटात सापडत आहे.
याबाबत सविस्तर लिहिण्यासाठी किंवा सांगण्यासाठी येणाऱ्या काळात व्हाट्सअप, फेसबुक यू-ट्यूब व विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून लिखाण करून व्हिडिओ पाठवून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली जाईल.
परंतु कांदा उत्पादक सोडून इतर घटकांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लुटण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाटते की कांद्याला चांगला भाव फक्त मला एकट्यालाच भेटला पाहिजे.
परंतु ज्या दिवशी आपण एकट्या ऐवजी आपल्या सर्वांच्या कांद्याला हक्काने चांगला भाव मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे या भूमिकेतून व भावनेतून कांदा शेती करू तेव्हा
देशातील कांदा उत्पादकांकडून कांदाक्रांती घडल्याशिवाय राहणार नाही.
Share your comments