1. कृषीपीडिया

मूरघास (सायलेज) तयार करण्याची पद्धती आणि फायदे

मूरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वणीकरण (आंबवण) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टीक आम्ल तयार होते. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
मूरघास

मूरघास

मूरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वणीकरण (आंबवण) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टीक आम्ल तयार होते. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चार कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो, तेव्हा वनस्पतींच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छवास चालू असतो.

त्यामुळे पाणी व कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेतील जगणारे जीवाणू तेथे तग धरू शकत नसल्याने चारा खराब न होता टिकून राहतो.

मूरघासाचे_फायदे 

  • मूरघास जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे. 

  • मूरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमीत कमी जागा लागते. म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मूरघासाच्या स्वरुपात ५०० किलो चारा ठेवता येतो.

  • दररोज चारा कापून जनावरांना खाऊ घालण्यापेक्षा त्याचा मूरघास बनवल्यास चारा पिकाखालची जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पीक त्वरित घेता येते. म्हणजेच आपल्याला जास्त पिके घेता येतात व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील कष्ट व वेळ वाचतो.

  • मूरघास बंदिस्त जागेत असल्याने त्यास आगीचा धोका नाही. तसेच तो जास्त दिवस टिकवून ठेवता येतो व हिरवा चारा नसेल अशा टंचाईच्या काळात मूरघास वापरता येतो.

  • उपयुक्त व पौष्टीक चारा व गवत यांचा वापर मूरघासात केल्याने प्रथिने व कॅरोटीनचे प्रमाण मूरघासात जास्त असते. मूरघासात तयार होणारे लॅक्टीक आम्ल हे गायी-म्हैशींच्या

  • पचनेद्रींयात तयार होणाऱ्या रसासारखे असते. म्हणून मूरघास जनावरांना पचण्यास सोपे जाते. 

  •  मूरघासामुळे जनावांची भूक वाढते व ती मूरघास जास्त प्रमाणात खातात, वाया घालवत नाहीत. कारण तो रुचकर, स्वादिष्ट व सौम्य रेचक असतो.

  • वाळलेल्या चाऱ्याच्या पौष्टिकतेपेक्षा मूरघासाची पौष्टिकता उत्तम असते.

  •  मूरघासाकरता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नद्रव्ये चाऱ्यामध्ये येतात.

  • हिरव्या चाऱ्यापासून मूरघास तयार करून हा मूरघास टंचाईच्या काळात पाहिजे तेव्हा वापरता येतो. पावसाच्या पाण्यावर चाऱ्यासाठी अवलंबून असणाऱ्या प्रदेशामध्ये

  • पावसाळ्यामध्ये तयार झालेल्या हिरव्या चाऱ्याचा मूरघास तयार करून तो ऊन्हाळ्यामध्ये वापरता येतो. 

  • मूरघास तयार केल्यास मजुरावर होणारा खर्च कमी होतो आणि मजुरांचे व्यावस्थापन व्यवस्थित करणे शक्य होते.

हेही वाचा : मसाला शेती आहे नफा देणारी ; वाचा लसणाची लागवड पद्धत

मूरघासासाठीची_पिके 


उत्तम प्रकारचा मूरघास बनवण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, संकरीत नेपियर (हत्तीघास), मारवेल (पन्हाळी गवत), ऊसाचे वाढे, ओट इत्यादी एकदल चारा पिकांचा उपयोग करता येतो. कारण या पिकांमध्ये किन्वणीकरण्यासाठी (आंबवण्याच्या क्रियेसाठी) लागणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच या पिकांची साल जड व टणक असते. त्यामळे हि पिके वाळण्यासाठी जास्त वेळ घेतात. म्हणून हि पिके वाळविण्यापेक्षा मूरघास बनवण्यासाठी जास्त सोयीस्कर आहेत.

 

मूरघासाचे_नियोजन 
दुध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी खड्ड्यात किंवा टाकीमध्ये मूरघास तयार करता येतो. दुध उत्पादकांकडे किती जनावरे आहेत, मूरघास किती दिवसांकरिता करावयाचा आहे, प्रत्येक जाणवला किती मूरघास देणार, तेवढा चारा उपलब्ध आहे का? याचे पूर्वनियोजन मुरघास तयार करण्यापूर्वी असणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ –

एका शेतकऱ्याकडे चार दुभती जनावरे आहेत व ऊन्हाळ्याच्या चार महिन्यात हिरवा चारा उपलब्ध होत नाही. अशा वेळेस दुध उत्पादकाला खालीलप्रकारे नियोजन करता येईल;
• दुध देणारी एकूण चार जनावरे आहेत.
• चार महिने म्हणजे १२० दिवसांसाठी मूरघास तयार करावयाचा आहे.
• प्रत्येक गाईला दिवसाला दिवसाला २० किलो मूरघास, म्हणजे चार जनावरांसाठी ८० किलो मूरघास द्यावा लागेल.
• चार महिने म्हणजे १२० दिवसांकरता दररोज ८० किलोप्रमाणे एकूण ९६०० किलो हिरवा चारा असणे आवश्यक आहे.
• एक घनफूट खड्ड्यामध्ये (१ फुट लांब, १ फुट रुंद, १ फुट ऊंच म्हणजे १ घनफूट) १६ किलो हिरव्या चाऱ्याची कुट्टी मावते. त्यावरून तयार कराव्या लागणाऱ्या खड्ड्याचे माप काढता येते. एकूण आवश्यक ९६०० किलो हिरव्या चाऱ्यास १६ ने भागल्यास ६०० घनफुटाचा (२० फुट लांब, ६ फुट रुंद, ५ फुट ऊंच) खड्डा घ्यावा लागेल.

मूरघासाची_खड्डा_पद्धत 


• मूरघासाच्या खड्ड्याची रचना, आकार व बांधणीची पद्धत हि त्या ठीकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.
• खड्डा बनविताना तो जास्तीत जास्त ऊंच जागेवर करावा. म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही.
• चौरस खड्डा असल्यास कोपऱ्याच्या जागेत हवा राहण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी खड्ड्याचे कोपरे गोलाकार असावेत.
• खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाहीत याची खात्री करावी. भितींना छिद्रे किंवा भेगा नसाव्यात यासाठी भिंतींना सिमेंटने गुळगुळीत प्लास्टर करावे.
• खड्ड्याची खोली हि त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे. जेथे पाण्याची पातळी वर आहे, तेथे जमिनीवर टाकी बांधावी व जेथे पाण्याची पातळी खोल आहे, तेथे जमिनीत खड्डा घेऊन तो बांधून काढणे सोयीस्कर व फायद्याचे आहे.
• खड्डा खोदून बांधकाम, प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास, खड्डा खोदल्यानंतर निळ्या रंगाचा २०० मायक्रॉनचा पेपर वापरावा.

 

मूरघासावरील प्रक्रिया -


• पौष्टीक व संतुलित मूरघास बनविण्यासाठी त्यावर योग्य प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 
• कुट्टी केलेल्या प्रति टन हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १ किलो युरिया, दोन किलो गुळ, १ किलो मीठ, १ किलो मिनरल मिक्स्चर व १ लिटर ताक वापरावे.
• युरिया, गुळ, मिनरल मिक्स्चर व मीठ वेगवेगळ्या भांड्यात घेऊन १० ते १५ लिटर पाण्यामध्ये विरघळवून घ्यावे व नंतर कुट्टी केलेल्या चाऱ्याच्या थरांवर शिंपडावे.

हेही वाचा : आयसीएआरने विकसीत केले मिरचीचे नवीन वाण; या खरीप हंगात येईल भरघोस उत्पन्न

मूरघास_खड्डा_भरण्याची_पद्धत 

  •  चाऱ्याचे पीक फुलोऱ्यात आल्यावर, चिकात असताना किंवा दाणे भरण्यास सुरुवात झाल्याबरोबर पिकाची कापणी करावी व चारा ५ ते ६ तास सुकू द्यावा. म्हणजे त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८० टक्क्यांवरून ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत खाली येईल.

  • मुरघासाचा खड्डा साफ व कोरडा करून घ्यावा. त्यानंतर प्लास्टिकचा कागद खड्डा सर्व बाजूला झाकेल अशा पद्धतीने अंथरावा.

  •  मूरघास तयार करण्यासाठी चाऱ्याची कुट्टी करणे आवश्यक आहे.

  • मका, कडवळ, ऊसाचे वाढे, मारवेल, ओट यासारखे हिरव्या वैरणीचे कडबाकुट्टी यंत्राच्या सहाय्याने १.५ ते २ सेमी आकाराचे तुकडे करावेत.

  • युरिया, गुळ, मिनरल मिक्स्चर व ताक यांचे वेगवेगळे मिश्रण तयार करावे. त्यानंतर खड्ड्यात कुट्टी भरण्यास सुरुवात करावी.

  • चार इंचाचा थर तयार झाल्यावर त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा फवारा मारावा.

  • थर चोपणीने किंवा धुमसाने चोपून चांगला दाबून घ्यावा. प्रत्येक वेळेस चार इंचांचा थर झाल्यावर वरीलप्रमाणे कृती करावी. यामुळे कुट्टीतील हवा निघून जाईल.

  • दाबलेल्या कुट्टीचा थर जमिनीपासून १ ते १.५ फुट वर आल्यावर कडेने राहिलेल्या प्लास्टिकच्या कागदाने खड्डा काळजीपूर्वक झाकून घ्यावा. त्यावर वाळलेले गावात, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड यांचा थर देऊन त्यावर मातीचा थर द्यावा.

  • खड्ड्याचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर छप्पर करावे. मूरघास बनण्यास साधारणतः ४० ते ६० दिवस लागतात. तयार मूरघास ६ महिने ते एक वर्ष सुरक्षितपणे साठवून ठेवता येऊ शकतो.

मूरघासाचा_वापर 


आठ ते दहा आठवड्यानंतर खड्ड्यामध्ये असणाऱ्या चाऱ्यात आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अशा वेळी खड्डा एका बाजूने उघडावा व तो वापरण्यास सुरुवात करावी. वापरत नसताना खड्डा बंद ठेवावा. मूरघासाची चव निर्माण करण्यासाठी जनावरांना पहिले ५ ते ६ दिवस ५ ते ६ किलो मूरघास हिरव्या चाऱ्याच्या कुट्टीत मिसळून घालावा. एकदा आंबट-गोड चवीची सवय लागली की जनावरे मूरघास आवडीने खातात, वाया घालावीत नाहीत.

 

मूरघासाची_प्रत 


• *बुरशी –* मूरघास व्यवस्थित दाबला नाही तर त्यात बुरशीची वाढ होते.
• *वास –* चांगल्या मूरघासाला आंबट-गोड वास येतो.
• *रंग –* चांगल्या मूरघासाचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी असतो. कुजलेल्या मूरघासाचा रंग काळा असतो.
• *सामू –* चांगल्या मूरघासाचा सामू (पीएच) ३.५ ते ४.२ असतो.                

लेखक  -

डॉ .गणेश उत्तमराव काळुसे

विषय विशेषज्ञ(पशु संवर्धन व दुग्धशास्त्र )

डॉ .अनिल एस .तारू ,

 डॉ सी .पी .जायभाये

  कृषि विज्ञान केंद्र , बुलढाणा

 

English Summary: Methods and benefits of making silage Published on: 17 February 2021, 07:05 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters