1. कृषीपीडिया

जाणून घ्या कोहळा लागवड तंत्र

कोहळ्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार जमीन चांगली मानवते. हे पीक वाळूत अथवा नदीच्या पात्रात सुद्धा घेतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या कोहळा लागवड तंत्र

जाणून घ्या कोहळा लागवड तंत्र

कोहळ्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार जमीन चांगली मानवते. हे पीक वाळूत अथवा नदीच्या पात्रात सुद्धा घेतात. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली मानवते. या पिकामध्ये को-१ आणि को-२ या तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत. को-१ ही जात मध्यम कालावधीची आहे. फळात बियांची संख्या कमी असते. एका वेलीस सहा ते आठ फळे लागतात. पिकाचा कालावधी १२० दिवसांचा असतो. को-२ या जातीच्या फळातील गराचा रंग फिकट हिरवा असतो. फळे १२० दिवसांत तयार होतात. याशिवाय कोहळ्याच्या एम-१ (पंजाब) आणि मुदलियार (तमिळनाडू) या वाणांची लागवड करता येते.

एक हेक्‍टर लागवडीसाठी चार ते पाच किलो बियाणे पुरेसे होते. लागवड करताना दोन ओळींत दीड ते दोन मीटर आणि दोन झाडांत एक मीटर अंतर ठेवावे. उगवण चांगली होण्यासाठी बिया ओल्या फडक्‍यात २४ ते २८ तास बांधून ठेवाव्यात. बियांना लागवड करण्यापूर्वी कार्बेन्डाझीमची बीजप्रक्रिया करून लागवड करावी. उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात लागवड करावी. या पिकास हेक्‍टरी २५ टन शेणखत द्यावे. पूर्वमशागत करताना जमीन उभी आणि आडवी चांगली खोल नांगरून घ्यावी. दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी शेणखत जमिनीवर पसरून नंतर पाळी द्यावी. माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी १०० किलो, नत्र ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश ही रासायनिक खते द्यावीत.

रासायनिक खते देताना नत्राचा अर्धा हप्ता, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावीत. उरलेली नत्राची मात्रा सलग दोन हप्त्यात लागवड केल्यापासून ३० दिवसांनी आणि नंतर फुले येण्याच्या वेळी द्यावी. पिकास सुरवातीस उगवण होईपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्या लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीचा मगदूर, हवामान आणि पिकाच्या वाढीनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फुले येऊ लागल्यावर आणि पुढे फळांची वाढ पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे. बी उगवून आल्यानंतर एका आळ्यात दोन रोपे ठेवून बाकीची काढून टाकावीत. फुले, तसेच फळे यांचा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये. दोन सऱ्यांतील मोकळ्या जागेत वेली पसराव्यात. फळधारणा वाढविण्यासाठी हाताने परागसिंचन करावे.

कोहळा लागवड नियोजन

जमीन -

 मध्यम भारी,पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी.

हवामान - 

वेलींच्या वाढीसाठी उष्ण / कोरड्या हवामानाची गरज.

लागवड कालावधी - फेब्रुवारी,मार्च,एप्रिल किंवा जून,जुलै .

पूर्व मशागत - 

खोल नांगरणी,वखरणी,सहा फुट बाय तीन फुटावर दोन फुट बाय दोन फुटाचे खड्डे.

लागवड पद्धत - 

एका ठिकाणी दोन बिया टोचून लावाव्या,उगवणी नंतर एक सशक्त रोप ठेवावे .

वाण निवड - 

स्थानिक किंवा को - १,को - २. एकरी एक ते दीड किलो बिया.

बीज प्रक्रिया - बियाणे पेरणी पूर्वी ६ बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून ठेवावे . सावलीत वाळवून लागवड करावी.

खत व्यवस्थापन - लागवडीपूर्वी शेणखत एक टोपले. शिवाय ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद ,२० किलो पालाश. नत्र दोन वेळा एक महिन्याच्या अंतराने विभागून द्यावे.

पाणी व्यवस्थापन - 

उगवण होई पर्यंत तिसऱ्या दिवशी,नंतर तापमान आणि वाफसा स्थिती नुसार . शक्यतो ठिबक करावे.

रोग कीड - 

भुरी,केवडा,करपा हे बुरशी जन्य रोग येतात. त्यासाठी डायथेन एम - ४५ किंवा गोमुत्र ,निंबोळी अर्काची फवारणी. लाल भुंगे,फळ माशी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी इमीडेक्लोप्रीड फवारावे. 

दहिया रोग आढळल्यास १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक अथवा ट्रायडेमार्फ ७ मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 

काढणी / उत्पादन - एकावेलीस ५/६ फळे,प्रत्येकी ४/५ किलो. १२० दिवसांनी फळे काढणीस येतात.

 

विनोद धोंगडे नैनपुर 

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: Know about Kohala plantation technology Published on: 12 January 2022, 03:13 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters