जगातील अनेक व्यवसायांपैकी कृषिव्यवसाय सर्वांत जुना आहे कारण अन्न व वस्त्र या प्राथमिक स्वरूपाच्या गरजा असल्यामुळे मानवजात वसाहती करून राहू लागल्यापासून तिला शेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागले. आधुनिक युगात औद्योगिकीकरणाचा विस्तार व विकास जगभर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाला असला, तरी आजही कृषिव्यवसाय हा जगातील सर्वांत मोठा व्यवसाय समजला जातो कारण जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ दोन-तृतीयांश लोकांचे जीवन कृषीवर अवलंबून आहे. शिवाय जगातील सर्वच लोकांना अन्नाचा पुरवठा मुख्यत्वे कृषीमुळेच उपलब्ध होतो. जगातील एकूण उत्पादन होणाऱ्या अन्नात जवळजवळ २३ टक्के वाटा मासे व मांस यांचा आहे. जगाची लोकसंख्या प्रतिवर्षी वाढत असल्यामुळे शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांचा योग्य उपयोग करून पुरेसा कृषिविकास घडवून आणण्याला सर्वच राष्ट्रांमध्ये फार महत्त्व आहे. जगाच्या क्षुधा, कुपोषण व दारिद्र्य यांसारख्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कृषिविकास ही अत्यंत निकडीची गरज आहे. काही राष्ट्रांमधील लोकांच्या बाबतीत तर कृषी म्हणजेच जीवन अशी परिस्थिती असते. तेथील लोकांच्या भावनात्मक, आर्थिक, सामाजिक व राजकीय जीवनाशी आणि आशाआकांक्षांशी शेतीचा अत्यंत निकटच्या संबंध येतो. या निकटच्या संबंधामुळेच मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये कृषीला महत्त्वाचा वाटा उचलावा लागला.
शेतीचा धंदा जरी फार जुन्या काळापासून चालत आला असला व त्यासाठी लागणारे ज्ञान जरी अनुभवाने व परंपरेने मिळत असले, तरी विकसित राष्ट्रांनी शेतीविषयक प्रश्न शास्त्रीय पद्धतीने हाताळून खुद्द शेतीलाच एका प्रगत शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. कृषीचा व्याप लक्षात घेता ही गोष्ट सोपी नव्हती. कृषिविकास सतत होत रहावा म्हणून त्या राष्ट्रांना इतर अनेक शास्त्रांची मदत घ्यावी लागत आहे :
(१) भूविज्ञानाच्या साहाय्याने खडकांचे प्रकार व त्यांच्यापासून जमिनी कशा तयार होतात, त्यांचे गुणधर्म काय असतात हे समजते त्याचप्रमाणे खनिज पदार्थांची माहिती मिळते. खनिज पदार्थांपैकी काहींचा खते तयार करण्यासाठी उपयोग होतो. (२) वनस्पतिविज्ञानामध्ये झाडांची वाढ आणि तिला लागणारी परिस्थिती, त्यांच्या जाती, पोषण, फलन व सुधारणा इ. बाबींची माहिती मिळते व तिचा शेतीसाठी उपयोग करता येतो. (३) रसायनशास्त्राच्या आधाराने जमीन, पाणी, खते, चारा यांचे विश्लेषण करता येते व खते कोणती आणि कशी घालावीत, झाडांचे व गुरांचे पोषण कसे करावे, यांसारखे प्रश्न सोडविता येतात
रसायनशास्त्र ४) कीटकविज्ञान हे वनस्पतींना उपकारक व हानिकारक असणाऱ्या कीटकांचा अभ्यास करते व वनस्पतींना अपाय करणाऱ्या कीटकांवर काय उपाय योजावेत, याची माहिती देते. (५) सूक्ष्मदर्शकाखेरीज डोळ्यांना दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्र करते व त्यामुळे आपणास वनस्पतींना अपायकारक सूक्ष्मजीव कोणते, त्यांच्यावर काय इलाज करावेत, यांविषयी ज्ञान मिळते. (६) पशुवैद्यकात जनावरांच्या जाती, त्यांची निगा, त्यांचे आहार, आरोग्य व आजार यांबद्दलची माहिती मिळते. (७) कृषिअभियांत्रिकीमध्ये शेतीसंबंधी निरनिराळी औते व अवजारे तयार करणे, गोठे बांधणे, कोठारे उभारणे, पाटबंधारे व धरणे बांधणे, बांध घालणे व शेतीसाठी लागणारे इतर बांधकाम करणे इ. गोष्टींचे ज्ञान होते. यंत्रांचा उपयोग करून कृषिउत्पादन वाढविणे, कृषिपद्धतींची कार्यक्षमता वाढावी म्हणून विशिष्ट प्रकारची यंत्रे बनविणे व शेतकऱ्यांना कृषीच्या यांत्रिकीकरणासाठी शक्य तेवढी मदत देणे इ. हेतू साधण्याचे प्रयत्नही कृषि-अभियंत्यांनी केले आहेत [→ कृषि अभियांत्रिकी]. (८) हवामानातील फेरफार, वारे, वादळे, अतिवृष्टी आणि अनावृष्टी इ. घटकांचे जमिनीवर आणि वनस्पतींवर होणारे परिणाम यांचा अभ्यास कृषिवातावरणविज्ञानात केला जातो [→ कृषि वातावरणविज्ञान]. यामुळे उपलब्ध होणाऱ्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिकर्मात उपयोग करून घेता येतो. (९) कृषि हा आर्थिक व्यवसाय असल्यामुळे अर्थशास्त्राचाही कृषीशी निकटचा संबंध येतो.
वेगवेगळ्या शास्त्रांपासून उपलब्ध होणारी माहिती कृषिउत्पादनाचे प्रमाण व दर्जा वाढविण्यासाठी वापरण्यात आली. तरच कृषिव्यवसायाचा उत्कर्ष शक्य होतो. कित्येक पिढ्यांच्या अनुभवाने चांगल्या शेतकऱ्यांस या निरनिराळ्या शास्त्रांतील काही प्रमुख सिद्धांत माहीत असले, तरी सर्वच शास्त्रांची वाढ इतक्या झपाट्याने होत आहे, की आधुनिक जगातील शेतकऱ्यांस केवळ पिढीजात अनुभवाच्या आधारावर विसंबून चालणार नाही. आपल्या दैनंदिन शेतीकामात त्याला जे अनेक निर्णय घ्यावे लागतात, ते शास्त्रीय प्रगतीचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतले, तरच त्याला शेतीपासून जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. कृषिव्यवसायाची वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन उपलब्ध शास्त्रीय ज्ञानाचा प्रत्यक्ष कृषिकर्मात उपयोग करून शास्त्रीय पद्धतीने निर्णय कसे घ्यावेत व ते अंमलात कसे आणावेत, याचा विचार करणारे जे शास्त्र, त्याला ‘कृषिव्यवस्थापन शास्त्र’ म्हणतात. पुढारलेल्या राष्ट्रांनी या शास्त्राचा उपयोग करून आपल्या कृषिव्यवसाय ऊर्जितावस्था तर आणलीच, परंतु त्यासाठी आवश्यक असणाऱ्या श्रमिकांची संख्या बरीच कमी करून त्यांचा उपयोग इतर औद्योगिक उत्पादनासाठी करून घेऊन एकूण राष्ट्रीय उत्पादनात आणखी भर टाकली. विकसनशील राष्ट्रांनीसुद्धा त्यांच्या कृषिविकासासाठी कृषिव्यवस्थापन शास्त्राचा अधिकाधिक उपयोग करणे अपरिहार्य आहे.
कृषि : हा शब्द ‘कृष्’ म्हणजे ‘नांगरणे’ या धातूपासून झाला आहे. परंतु ‘कृषि’ या संज्ञेचा अर्थ केवळ जमीन नांगरून तीत पीक काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नाही. कृषिव्यवसायाचा व्याप बराच विस्तृत आहे. आपल्या अन्न, वस्त्रादी गरजा भागविणारे पदार्थ आपणास वनस्पती व प्राणी यांच्यापासून मिळतात. म्हणून पिके काढण्याबरोबरच गुरे, बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या व मधमाशा पाळणे रेशमाचे किडे पोसणे बागाईत करून फळफळावळ काढणे वगैरे उद्योगांचाही कृषीमध्ये समावेश होतो. थोडक्यात मनुष्यबळ, प्राणी, अवजारे व यंत्रे यांच्या साहाय्याने जमीन कसून पिके काढणे, ह्याला ‘कृषिकर्म’ किंवा शेती म्हणतात पण त्यात पशुपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसायसुद्धा अंतर्भूत आहेत. शेतीचे दोन प्रकार आहेत : जिराइती (फक्त पावसावर अवलंबित) व बागाइती (सिंचाईवर अवलंबित). शेतीत जी पिके काढतात, त्यांचे दोन मुख्य पेरणीचे हंगाम आहेत : खरीप व रब्बी. पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी करून येणारी जी पिके ती खरीप पिके व हिवाळ्यात पेरणी करून काढलेली ती रब्बी हंगामाची पिके होत. बागाइतीत विहिरीच्या किंवा पाटाच्या पाण्यावर भाजीपाला, फुलझाडे व फळफळावळ इत्यादींचे उत्पादन करण्यात येते.
Share your comments