थंड आणि कोरडे वातावरण हे भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या किंवा बुंध्याजवळील पानांवर होतो भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या पानांवर, फुलकळी तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात. कालांतराने झाडाची पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. भुरी रोगाचा प्रादुर्भाव मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, वेलवर्गीय पीक तसेच विविध फुलपिके आणि फळपिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे भुरी रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
यासाठी पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. 1. लागवडीसाठी भुरी रोगास सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करावी. 2. पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावे तसेच पिकांची फेरपालट करावी. 3. पिकास पोटॅश अन्नद्रव्य कमी पडल्यास पीक भुरी रोगाला बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही. 4. प्लॉट मध्ये आद्रता टिकवून ठेवण्यासाठी शक्य असल्यास तुषार सिंचनाचा वापर करावा.
5. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस @ ५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा पिकात फवारणी करावी. अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस ची बुरशी भुरी रोगाच्या बुरशीवर उपजीविका करते त्यामुळे रोग नियंत्रणास तसेच प्रतिबंधास मदत होते. 6. कीड आणि रोगांच्या विरोधी लढण्याची क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन @ १ मिली प्रति लिटर तसेच कायनेटिन घटक असणारे कीटोगार्ड @२ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात
फुलोरा अवस्थेपूर्वी २ वेळा फवारणी करावी 7. शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा. यामध्ये गंधक ८०% @ २ ग्रॅम प्रति लिटर पाणी (वेलवर्गीय पीक व उन्हाळा हंगाम वगळता), मायक्लोब्यूटानिल १०% डब्ल्यू घटक असेलेले बुरशीनाशक @ ०.५ ग्रॅम किंवा झिनेब ६८% + हेक्साकोनॅझोल ४% डब्ल्यू घटक असलेले बुरशीनाशक @२ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल.
Share your comments