1. कृषीपीडिया

जमीन आरोग्यासाठी खरीपपूर्व नियोजन गरजेचे

नैसर्गिक स्रोतांचा वापर करून पीक उत्पादनवाढ आणि त्याची गुणवत्ता सांभाळताना जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जमीन आरोग्यासाठी खरीपपूर्व नियोजन गरजेचे

जमीन आरोग्यासाठी खरीपपूर्व नियोजन गरजेचे

नैसर्गिक स्रोतांचा वापर करून पीक उत्पादनवाढ आणि त्याची गुणवत्ता सांभाळताना जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पूर्वनियोजन खूप महत्त्वाचे आहे. शेतीतील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी रासायनिक खते, मजूर समस्या, किडी व रोग, निसर्गाचा अनियमितपणा, हवामान बदल, योग्य बाजारभावाचा अभाव, वाढती तापमान वाढ आदी समस्यांमुळे शेतीवर भार पडत आहे, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा सुधारित तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. 

जमिनीनुसार पिकांचे नियोजन -

जमिनींच्या प्रकारानुसार पिकांचे नियोजन महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा जमीन एकसारखी दिसत असली तरी तिच्या गुणधर्मात खूप विविधता असते. मुख्यतः तिची खोली कमी-अधिक असल्यामुळे उत्पादनक्षमतेत खूप फरक असतो. 

1) सर्वसाधारणपणे कपाशीसारखी पिके खोल जमिनीत घेणे गरजेचे असते. कारण कापसाची मुळे खूप खोलवर वाढतात आणि दीर्घ कालावधीचे ते पीक आहे. 

2) तूर, सोयाबीन या पिकांसाठी मध्यम ते खोल जमीन फायद्याची ठरते. 

3) ज्वारी, सूर्यफूल, बाजरी, मका आदी पिकांसाठी मध्यम खोलीची जमिनीची निवड करावी. 

4) परंतु उथळ जमिनीवर अतिशय कमी कालावधीची पिके उदा. मूग, उडीद ही पिके घ्यावीत म्हणजे त्यांची मुळे जमिनीच्या वरच्या थरातच योग्य वाढू शकतात. 

5) जमिनीचा प्रकार लक्षात घेणे गरजेचे असते. 

6) फळपिकांसाठी मातीचे परीक्षण करताना खड्डा घेऊन प्रत्येक थरातील मातीचे निदान करणे महत्त्वाचे ठरते. त्यामध्ये चुनखडीचे प्रमाण तसेच खडक किंवा मुरूम किती खोलीवर आहे आदी बाबी लक्षात घ्याव्यात. 

7) काही फळपिकांना चांगला निचरा होणाऱ्या जमिनींची खूप गरज असते. अलीकडे डाळिंबाची लागवड बऱ्याच प्रमाणात वाढताना दिसून येत आहे; परंतु त्याआधी जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन माती परीक्षणानुसार योग्य निदान करणे गरजेचे आहे. 

सेंद्रिय खते गरजेचीच -

शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर अनिवार्य आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांत सुधारणा होण्यासाठी नियमित सेंद्रिय खतांच्या वापराची गरज आहे. त्यासाठी शेतीची मशागत करीत असताना चांगले कुजलेले शेणखत किमान पाच टन प्रति हेक्‍टरी वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

हे ही वाचा - शेतकऱ्यांसाठी आनंदी बातमी, कुंपण करण्यासाठी सरकार देणार पैसे.

त्यामधून जमिनीस सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जवळजवळ सर्वच अन्नद्रव्ये प्राप्त होतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही पुरवठा होतो. शेणखताची टंचाई मोठ्या प्रमाणावर दिसून येते; परंतु त्यास पर्याय म्हणून अन्य स्रोतांचा वापर करण्याची गरज आहे. गांडूळ खत, कंपोस्ट, हिरवळीची खते यांचा वापर करावा. शेतातील काडीकचरा वापरून उत्तम कंपोस्ट तयार करता येते. जमिनीत हवा व पाणी यांचे योग्य प्रमाणासाठी ती भुसभुशीत असणे गरजेचे असते. तिचा चांगला निचरा होण्याची गरज असते. तिचा सामू नियंत्रणात ठेवण्याची गरज असते आणि त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यंत गरजेचा असतो. त्यांच्या नियमित वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येते. 

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन -

सर्वांत महत्त्वाचे नियोजन अन्नद्रव्ये व्यवस्थापन करण्याला आहे. शिफारशीत अन्नद्रव्यांच्या मात्रेएवढी खते पिकाला द्यावी लागतात. माती परीक्षणाचा वापर करून त्यात काही प्रमाणात बचत करता येते. जमिनीची सुपीकता चांगली असल्यास ही शिफारशीत मात्रा काही अंशी कमी करता येते. अन्नद्रव्यांच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम आपल्याकडील शेतखताच्या वापराचे नियोजन करावे. शेणखताची टंचाई असल्यास आलटून-पालटून का होईना, प्रत्येक शेतास शेणखत तीन वर्षांतून तरी एकदा मिळेल असे नियोजन करावे. जेणेकरून आपण जी रासायनिक खते वापरणार आहात, त्यांचा योग्य कार्यक्षम वापर पिकांसाठी होऊन फायदा होईल. तसेच अन्य स्रोतांमध्ये कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खत इत्यादीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त युरियाचा वापर किंवा फक्त डीएपीचाच वापर बऱ्याचदा होताना दिसतो. किंबहुना तीनही मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा संतुलित पुरवठा महत्त्वाचा असतो.

पालाशसारख्या अन्नद्रव्याचा वापर-

बराच कमी होताना दिसून येतो; परंतु संतुलित प्रमाणात पिकाचे पोषण होण्याच्या दृष्टीने पालाशचा वापर नत्र, स्फुरदासोबत करणे गरजेचे आहे. तसेच गंधकाचा वापर गरजेनुसार करण्याची गरज आहे. सोयाबीनसारख्या तेलबिया प्रकारातील पिकांना गंधकाची गरज असते. स्फुरदाचा स्रोत म्हणून सुपर फॉस्फेटचा वापर करावा म्हणजे त्यातून गंधक पिकास मिळतो. जस्त, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अलीकडे आपल्या जमिनीत वाढताना दिसत आहे. त्यासाठी त्यांच्या कमतरतेचे निदान माती परीक्षणाद्वारा करावे आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य कमी असेल त्याचाच वापर करावा. या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवू नये म्हणून सेंद्रिय खतांच्या वापराचे नियोजन ठेवावे. तरीही कमतरता आढळल्यास त्यांचा फवारणीद्वारा वापर करावा. गरज नसल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांवर खर्च करू नये. खते वापरण्याची वेळ, मात्रा, पद्धत या विषयी नियोजन करून तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून त्यांचा प्रभावी वापर होईल. 

पीक फेरपालट गरजेची -

जमिनीच्या आरोग्यासाठी पिकात विविधता महत्त्वाची आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा जमिनीस फायदा होतो. फक्त तृण धान्याधारित पीक पद्धती सतत घेतल्यास सुपीकतेचा ऱ्हास होतो. सोयाबीन, तूरसारख्या पिकांचा पालापाचोळा जमिनीस सेंद्रिय कर्ब मिळवून देतो. कपाशीसारख्या पिकात फेरपालट गरजेचे असते. त्यासाठी कपाशीसारख्या पिकानंतर सोयाबीन असे नियोजन आधीच करण्याची गरज आहे. सोयाबीन - तूर आंतरपीक ही पद्धत अतिशय महत्त्वाची आढळून येत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पिकांचे आणि पीक पद्धतींचे नियोजन करावे.

हिरवळीची खते - रासायनिक खतास पूरक

हिरवळीच्या खतांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिकांचा वापर म्हणावा त्याप्रमाणात केला जात नाही. त्यासाठी हंगाम वाया जातो अशी धारणा असते; परंतु हिरवळीच्या पिकांची उदा. धेंचा बोरू यांची मुख्य पिकासोबत उदा. कपाशीच्या दोन ओळींत एक ओळ अशी लागवड करता येते. अवघ्या 35 ते 45 दिवसांत मोठ्या प्रमाणात तयार होणारा "बायोमास' जमिनीत गाडल्यास मोठा सेंद्रिय पदार्थ मिळतो. त्यामुळे जमिनीचे गुणधर्म सुधारतात, खतांची बचत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येत नाही. सुपीकता टिकवून ठेवता येते. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन होते. जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात. सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे रासायनिक खतांच्या वापरात बचत होते. गिरीपुष्प झाडाची पाने जमिनीत टाकल्यास उत्तम असा फायदा होऊन खतात बचत करता येते. मूग, उडीद इत्यादी पिकांचा सुद्धा वापर करता येतो. चवळीसारख्या पिकाचादेखील हिरवळीचे खत म्हणून वापर होतो. 

पीक अवशेषांचा पुनर्वापर -

पिकांच्या अवशेषांमधील अन्नद्रव्यांचा जमिनीत पुनर्वापर करून साखळी पद्धतीने त्यांचे संवर्धन येते आणि त्यातून जमिनीस सेंद्रिय पदार्थ प्राप्त होतो. या अवशेषांमध्ये बऱ्याच प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. रासायनिक खतांना पूरक म्हणून त्यांचा शेतीत वापर वाढविण्याची गरज आहे. 

मार्गदर्शन महत्वाचे - शेती व्यवसाय करताना खत, पाणी, आणि कीटक नाशक फवारणी याचे काटेकोरपणे व्यस्थापन आणि नियोजन करणे अत्यन्त महत्वाचे आहे. शेती हे एक शास्त्र आहे,हे आपण लक्षात घेतले पाहिजे, त्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, तद्न्य शेतकरी, कृषी व्यावसायिक यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.अनुभवी आणि शेतीतील तद्न्य व्यक्तीच आपल्याला शेती उत्पादकता वाढविणे साठी मदत करू शकतात म्हणून योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा व आपल्या खरीप हंगामाचे नियोजन करावे.

माती परीक्षणाचे नियोजन -

शेतातील मातीचे परीक्षण करण्यासाठी उन्हाळ्यातच नियोजन करून प्रातिनिधीक नमुना घेऊन परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षणाचा अहवाल नीट समजून घ्यावा. त्यानुसार खतांचे नियोजन आधीच करून घ्यावे. गंधक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची गरज आपल्या शेतास आहे का याची खात्री करून घ्यावी. जमिनीचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि जमिनीचे शाश्‍वत शेतीसाठी संवर्धन होईल या दृष्टिकोनातून खरिपाच्या नियोजनाची गरज आहे. 

 

अधिक माहितीकरिता संपर्क -

डॉ. विलास खर्चे,

(लेखक मृद विज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.) 

English Summary: For Soil health pre mansoon need management Published on: 30 April 2022, 10:38 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters
News Hub