बीजप्रक्रियेमुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर केले जात असल्यामुळे जमिनीला दिल्या जाणार्या रासायनिक खतांची मात्रा कमी द्यावी लागते.जैविक खत बीजप्रक्रियेमुळे जमिनीचे, पाण्याचे, तसेच हवेचे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही.
स्फुरद विरघळविणारे जिवाणू पिकांना अनुपलब्ध असलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात.जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यास पिकांची उगवणक्षमता वाढते तशीच पिकांची जोमदार वाढ होते.जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यामुळे जमीन सतत जिवंत म्हणजेच त्यापासून अधिक उत्पादकता किंवा उत्पन्न मिळविणे शक्य होते.
वेगवेगळ्या खरीप पिकांसाठी जैविक खत बीजप्रक्रिया :-
1)स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत बीजप्रक्रिया : स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत बीजप्रक्रिया खरिपातील सर्व पिकांसाठी उपयुक्त अशी बीजप्रक्रिया आहे.
2)रायझोबियम जिवाणू खत बीजप्रक्रिया : रायझोबियम हे जिवाणू शिंबीवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीत सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात.
उदा. सर्व डाळवर्गीय वनस्पती पिके, द्विदल वर्ग पिके.
3)अॅझोटोबॅक्टर / अझेस्पिलीयम जिवाणू खत बीजप्रक्रिया : अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू एकदल वनस्पतींच्या मुळाभोवती असहजीवी पद्धतीचे नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात.
उदा. एकदल वर्ग पिके - कापूस, ज्वारी, मका, बाजरी, ऊस इत्यादी.
अझोस्पिरिलियन हे ही जिवाणू एकदल वनस्पतींच्या मुळांवर राहून नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात. उदा. ऊस, गवतवर्गीय पिके इत्यादी.
बीजप्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य :-रायझोबियम/ अॅझोटोबॅक्टर / अझोस्पिरिलियम / पी.एस.बी. यांचे विकत आणलेले पाकीट, गूळ, पातेले, प्लॅस्टिक ट्रे, स्टोव्ह, पाणी, कागदी पेपर इ.
प्रत्यक्ष कृती :-
1)बीजप्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची जमवाजमव केल्यानंतर सर्वप्रथम स्टोव्हवर पातेले ठेवून त्यामध्ये 250 मिली लिटर पाणी टाकून त्यामध्ये 125 ग्रॅम गूळ टाकावा व हे द्रावण गूळ चांगला विरघळेपर्यंत उकळून घ्यावे व थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवावे.
2)थंड झालेल्या पातेल्यात 250 ग्रॅम रायझोबियम किंवा अॅझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरीलियम + 250 ग्रॅम पी. एस. बी. टाकून हे द्रावण लाकडी काडीच्या साहाय्याने योग्य रीतीने ढवळून घ्यावे.
3)नंतर प्लॅस्टिक ट्रे-मध्ये 10 किलो बियाणे घ्यावे व या बियाणांवर तयार केलेले द्रावण हाताने शिंपडून घ्यावे व नंतर दोन्ही हातांनी सर्व बियाणे अशा पद्धतीने चोळावे की सर्व बियांवर लेप आलेला असेल.
Share your comments