कोणत्याही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पिकाला भासली तरी त्याचे परिणाम स्पष्ट दिसतात व इतर कोणत्याही अन्नद्रव्याने त्या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढता येत नाही आणि परिणामतः आपल्या शेती उत्पादनात घट येते.माणसाच्या शरीराला ज्याप्रमाणे विविध कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध व इतर अन्नघटकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पिकांनाही त्यांच्या वाढीसाठी 17 प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.यामध्ये कार्बन, हायड्रोजन,ऑक्सिजन या तीन घटकांनी मिळून पिकांची जवळपास 94-95 % शरीररचना तयार होते व कोणतेही पीक हे वरील तीनही घटक वातावरणातील हवेतून व पाण्यातून मिळवत असते.याखेरीज नत्र, स्फुरद व पालाश ही तीन प्राथमिक अन्नद्रव्ये आहेत.जी शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या माध्यमातून पिकांना देत राहतात.याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर यांना दुय्यम अन्नद्रव्ये म्हंटले जाते.उरलेली आठ अन्नद्रव्ये म्हणजे झिंक, बोराॅन, काॅपर, लोह, क्लोराईड, मॅग्नेशियम, माॅलिब्डेनम व निकेल यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हंटले जाते.यांचे प्रमाण पिकांना जरी सूक्ष्म प्रमाणात लागत असले तरी त्यांचे कार्य हे इतर अन्नघटकांसारखेच महत्त्वाचे असते.
झिंक :-झिंक हे एक अतिमहत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.परंतु भारतीय मातीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता आढळून येते.वर्षानुवर्षे होणारी शेती आणि झिंकच्या नगण्य वापरामुळे मातीतील या मूलद्रव्याची पातळी खालावली आहे.पिकांच्या निरोगी वाढीसाठी व प्रजनन क्रियेदरम्यान होणार्या विविध प्रक्रियांसाठी झिंकची आवश्यकता असते.झिंकचे कार्य :- झिंक हे पिकांसाठी लागणार्या विविध संप्रेरकांचे कार्य करते.झिंक हे परागकण विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.दाणे व फळे तयार होण्यामध्येही झिंकचे महत्त्व अबाधित आहे.विविध प्रकारची प्रथिने, कर्बोदके व प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी त्याची आवश्यकता असते.झिंक कमतरतेची लक्षणे :- पिकांची वाढ खुंटणे, परिपक्वतेचा कालावधी वाढणे, नवी पाने खालच्या बाजूस शिरांच्या मध्ये पिवळी पडणे, फळझाडांमध्ये गुच्छाप्रमाणे किंवा झुडपाप्रमाणे शेंड्यांची खुंटलेली वाढ दिसणे.ही झिंक कमतरतेची लक्षणे आहेत.त्यामुळे कोणत्याही पिकाच्या उत्पादनात 20 % हून अधिक घट येऊ शकते.मका, तांदूळ, कापूस, गहू व विविध प्रकारची फळझाडे आणि पालेभाज्या ही झिंकच्या कमतरतेस अतिसंवेदनशील पिके आहेत.
माती परिक्षण :- नैसर्गिकरीत्याच मातीमध्ये झिंकची कमतरता असते. उदा.-रेताळ जमिन.जमिनीत कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण अधिक असल्यासही झिंकची कमतरता भासते.जमिनीचा सामू जास्त असल्यास किंवा जमिनीत फाॅस्फरस व लोहाचे प्रमाण अधिक असल्यास झिंकची उपलब्धता कमी राहते.जास्त काळ पाणी साचून राहिलेल्या जमिनीतही झिंक उपलब्ध होऊ शकत नाही.झिंकच्या कमतरतेची माहिती मिळवायची असल्यास माती परिक्षण करणे हा उत्तम पर्याय आहे.जमिनीत झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट हे अत्यंत प्रभावी खत आहे.सर्वसाधारणपणे शेत तयार करतेवेळी एकरी 10 किलो झिंक सल्फेट जमिनीत पसरून व्यवस्थित मिसळून द्यावे.एकदा वापरलेल्या झिंक सल्फेटचा उपयोग पुढील दोन ते तीन वर्षापर्यंत पिकांना होतो व उत्तम प्रतीच्या शेतमालासह उत्पादनातही लक्षणीय वाढ मिळू शकते.सल्फर :- सल्फर हा पिकांमध्ये प्रथिने तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.पिकांमध्ये विविध संप्रेरकांची व व्हिटॅमिन्सची कार्ये व विकास होण्यासाठी मदत करतो.पानांमध्ये हरितकण तयार करण्यासाठी हा उपकारक ठरतो.मुळांची वाढ व दाणे भरण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असतो. थंड वातावरणात पिकांना प्रतिकारक्षम बनवून निरोगी वाढीसाठी मदत करतो.कांदा, आले, मोहरी, लसूण, कोबी पिकांना असलेला गंध हा सल्फरमुळे असतो.
म्हणून या पिकांसाठी तो आवश्यक ठरतो.तेलवर्गीय पिकांमध्ये तेल तयार होण्याच्या क्रियेत सल्फर हा महत्त्वाचा ठरतो.उदा.-सोयाबीन, मोहरी, भुईमूग इत्यादी.सल्फर कमतरतेची लक्षणे :-पिकांमध्ये वाहून जाण्याचा गुणधर्म नसल्यामुळे व कमतरतेमुळे सल्फर हा शेंड्यापर्यंत पोचत नाही व सर्वप्रथम नवी पाने पिवळी पडतात.(नत्राच्या कमतरतेमुळे जुनी व खालची पाने पिवळी पडतात.)अतिकमतरतेमुळे पूर्ण पीक किंवा झाड पिवळे पडून वाढ खुंटते. पीक परिपक्वतेचा कालावधी वाढतो.कडधान्यांच्या मुळावर गाठींची संख्या कमी होते.अधिक उत्पादन देणार्या जातींमुळे जमिनीतून मोठ्या प्रमाणावर सल्फरचे शोषण होते.सल्फरयुक्त खतांचा होणारा कमी वापर हेही त्याचे कारण आहे.सल्फरयुक्त कीटकनाशकांचा कमी होणारा वापर, मातीमध्ये रासायनिक अभिक्रियेमुळे सल्फरचे होणारे स्थिरीकरण हेही याचे कारण आहे.बाजारात सहजपणे उपलब्ध असणार्या जिप्सममध्ये जवळपास 18 % सल्फर असते.अलीकडील काळात सल्फरची कमतरता कमी करण्यासाठी विशेष 90 % सल्फर असलेले बेन्टोनाईट सल्फर हे खत उपलब्ध आहे.हे 10 किलो प्रतिएकर या प्रमाणात शेतजमीन तयार करतेवेळी व्यवस्थित पसरवून शेतात मिसळून द्यावे.याचा उपयोग पिकांना आगामी दोन वर्षांपर्यंत होऊ शकतो
Share your comments