Weather Update :
विश्रांती दिलेल्या पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज (दि.१६) मुंबई आणि ठाण्यात ढगाळ हवामानासह अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर धरण क्षेत्रातही पावसाने चांगलाच जोर धरल्याने विदर्भातील दोन धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. पावसाची संततधार असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच तोतलाडोह आणि नवेगाव खैरी ही धरणे १०० टक्के क्षमतेनी भरली आहेत.
याशिवाय नद्यांनाही पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच येत्या काही दिवसात विदर्भात आणखी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान खात्याने दिल्या आहेत.
आज खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Share your comments