
rain update
सध्या बऱ्याच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने खंड दिला असून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाची गरज आहे. कारण पावसाअभावी बऱ्याच ठिकाणी खरिपाची पिके करपू लागल्याची स्थिती उत्पन्न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तसे पाहायला गेले तर गेल्या तीन-चार दिवसापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी चांगला पाऊस होत आहे आणि काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
परंतु खरिपाच्या पिकांची सध्याची स्थिती पाहता एवढा पाऊस पुरेसा नसून जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी बंधूंना आहे. तसेच राज्यातील बरीच धरणे अद्याप देखील पूर्ण क्षमतेने भरलेली नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आरक्षण साठा आणि त्यानंतर शेतीसाठी पाणी या बाबींवर सरकारला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला तर सध्या मुसळधार पावसाची खूप गरज आहे. या सगळ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्येच पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातील पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
पुणे वेधशाळेने दिली महत्त्वाची माहिती
पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली असून त्यानुसार राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाही.
म्हणजेच या महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र मुसळधार पाऊस या महिन्यात होणार नाही असे सांगितले जात आहे. परंतु येणारा सप्टेंबर महिना हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये पुणे वेधशाळेने चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवड्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असा देखील अंदाज पुणे वेधशाळेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
त्यातच प्रशांत महासागरामध्ये एलनिनोचा प्रभाव असल्यामुळे सप्टेंबर मधील पावसावर त्याचा काही परिणाम होतो का हे देखील बघणे गरजेचे आहे.परंतु या कालावधीपर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यामधून पिके जगवणे खूप गरजेचे आहे. कारण दहा दिवस तरी राज्यांमध्ये अपेक्षित पाऊस पडेल अशी स्थिती नाही. परंतु त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Share your comments