Rain Update :
राज्यात ऑगस्ट महिना कोरडा गेला यामुळे शेत पिकांचे काही भागात नुकसान झाले. मात्र गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर राज्यात पावसाने हजेरी लावली. पण काल (दि.११) पासून राज्यात पावसाने उघडीप दिली. मात्र उद्यापासून राज्यात हलका पाऊस तर १८ सप्टेंबरपासून जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दाब क्षेत्र ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेश किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
शनिवारी राज्याच्या सर्वत्र भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहील, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात पावसाने सध्या उघडीप दिली आहे. मात्र १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान राज्यासह मध्य भारताच्या काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Share your comments