Maharashtra Weather Update : राज्यात मागील आठवडाभरापासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याची पाहायला मिळाली आहे. यासोबतच पावसामुळे शेतपिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. देशात ३१ मे ला मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यापूर्वी आठवडा भरापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश अंशतः ढगाळ राहील आणि वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २७°C च्या आसपास असेल.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन दक्षिण निकोबार बेटावर आणि दक्षिण अंदमान सागरात दाखल झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय मान्सून मालदीव, कोमोरिन भाग, आणि बंगालच्या खाडीच्या दक्षिणेकडील भागात झाल्याचं सांगितलं.
Share your comments