Rain News : अंदमान-निकोबारात मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सूनची आगेकूच पुढे सुरुच आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी देखील चांगले वातावरण आहे. त्यामुळे केरळच्या काही भागात मान्सूनपूर्व जोरदार पाऊस मागील चार दिवसांपासून सुरु आहे. त्यातच देशासह राज्यातील वातावरणात देखील याचा परिणाम दिसून येत आहे. राज्यात सध्या पावसासह उष्णतेचा काही भागात इशारा देण्यात आला आहे. तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत आज (दि.२३) रोजी सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार आणि संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २९°C च्या आसपास असेल.
दरम्यान, सध्या मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाल्याने मान्सूनचा प्रवास चांगला सुरु आहे. ३१ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने आधीच व्यक्त केला आहे. यामुळे राज्यात मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच खरीप हंगामाला देखील शेतकऱ्यांना सुरुवात केली असल्याने शेतकरी आता पावसाचे आगमन होण्याची वाट पाहत आहेत.
Share your comments