Monsoon 2024 Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी केरळात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीव क्षेत्राच्या भागातून आणखी पुढे सरकला आहे.
नैऋत्य मोसमी पावसाचा काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती देखील अनुकूल होत आहे. दक्षिण अरबी समुद्राचा अधिक भाग, मालदीवचे उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्राचा काही भाग यासोबतच लक्षद्वीप क्षेत्र, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर या भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
मेघालयातील एकाकी ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीसह अत्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्रिपुरा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम मधील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होत आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २९°C च्या आसपास असेल.
राजस्थानच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट अशी स्थिती आहे. पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, मध्य प्रदेशातील काही भागात आणि उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या एकाकी भागात उष्णतेची लाट पसरली आहे. गुजरातमध्ये १५ तारखेपासून उष्णतेची लाट कायम आहे. हरियाणा,चंदीगड आणि दिल्ली, राजस्थानमध्ये १७ तारखेपासून आणि पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेश १८ तारखेपासून उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भात देखील उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
Share your comments