
Weather Update
मागील महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवु लागला आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान वाढले होते. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना उन्हापासून दिलासा मिळू लागला आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान कमी होऊन थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,राज्यातील नेहमीच सर्वात जास्त तापमान असलेल्या जळगावचे तापमानही कमी झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील तापमान कमी होऊ लागले आहे. आता येत्या दोन दिवसांत पुणे गारठणार असून ऑक्टोबर हिटनंतर आता पुणे शहरात काही दिवस थंडीची लाट येणार आहे.
राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. तसेच दोन दिवसांत राज्यातील तापमानात घसरण होणार आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात यापूर्वी अनुभवलेल्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली. तसेच हॅाट सिटी जळगावचे तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान अधिक होते. महाबळेश्वरचे तापमान १६.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही, तसेच थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त करण्यात आला आहे.
Share your comments