Monsoon Update : देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु झाल्याने राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसंच पुढील चार ते पाच दिवस राज्यात कमी अधिक स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची हजेरी सुरु आहे. या भागात कुठे जास्त तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. राज्यातूनही १० ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातही पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे तसेच घाट क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला होता. या जोराच्या पावसामुळे दरड कोसळणे, डोंगरांवरून माती वाहून येण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
यंदा देशात सरासरी ९४ टक्के तर राज्यात ९७ टक्के पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात चांगला पाऊस असला तरी काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसंच परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट
राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊसाची तूट झाली आहे. यात सांगलीत सरासरीच्या फक्त ५६ टक्के पावसाची नोंद झाली. साताऱ्यात देखील सरासरीच्या ६२ टक्के पावसाची नोंद, सोलापुरात ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे.
यात बीडमध्ये सरासरीच्या ७७ टक्के पावसाची नोंद, संभाजीनगरात ८७ टक्के, धाराशिवमध्ये सरासरीच्या ७१ टक्के पावसाची नोंद, जालन्यात सरासरीच्या फक्त ६७ टक्के पाऊस, हिंगोलीत सरासरीच्या ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील दोन जिल्ह्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. अकोल्यात सरासरीच्या ७५ टक्के पाऊस तर अमरावती जिल्ह्यात ७३ टक्के पावसाची नोंद झाली.
Share your comments