
Weather update
Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे चक्रीवादळात रुपांतर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वातावरणावर झाला आहे. या वातावरणाचा फटका राज्यात देखील बसला आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून डिंसेबर महिन्यात देखील पावसाची शक्यता आहे. तर येत्या २४ तासात देखील पावसाच्या शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात पावसाने तडाखा दिल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. आज (ता.२) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडिप राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच काही भागात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे 'मिचॉन्ग'चक्रीवादळाचा धोका आहे. मात्र, हे संभाव्य वादळ देशाच्या दक्षिण भागात धडकणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. सोमवारी पहाटे हे वादळ पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र हे वादळ नेमके कुठे धडकेल याबाबत हवामान खात्याने माहिती दिली नाही.
Share your comments