
Maharashtra Rain
Weather Update: दररोज बदलत असणाऱ्या हवामानामुळे आता येत्या काही दिवसांत देशातील काही ठिकाणी तापमानात असामान्य वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मार्च ते मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागाने राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
4 ते 6 मार्च या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवला होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. आज हवामान विभागाने महाराष्ट्रात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रात चार ते सहा मार्च या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळू शकतो. उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.
औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होण्याचं चित्र नाहीच, सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस अतिशय कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज असल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळणार नाहीच.
Share your comments