Weather News : देशासह राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे. हवामान बदलामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठावाड्यात आज पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
काल (दि.८) रोजी कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा ही खंडीत झाला होता. सिंधुदुर्गात देखील आज पहाटे अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा, काजू पिके आता फुलोऱ्यात आहेत, त्यामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. आज मंगळवारी देखील दिवसभरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणात पाऊस, आंबा उत्पादक चिंतेत
काही दिवसात आंबा हंगाम सुरु होणार आहे. तसंच आंबा झाडांना मोहर देखील आला आहे. या पावसामुळे आंबा मोहर गळ होऊन आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत. काजू पिकाला देखील या पावसाचा फटका बसला आहे.
कोकणात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कोकणासह राज्याच्या इतर भागात देखील पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार, सोलापूर जिल्ह्यात देखील अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांना अद्यापही गारठ्यापासून दिलासा मिळाला नाही. तसंच उत्तर भारतात देखील पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याकडून काही भागात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. आज उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Share your comments