Rain News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, कुडाळ आणि वेंगुर्ले भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबत या भागातील चक्रीवादळाचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या वादळात एक पान टपरी पाला पाचोळयाप्रमाणे उडून गेली. तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. आज (दि.२३) हवामान खात्याने कोकणता पावसासह उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला होता.
राज्यात बहुतांश भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नागरिकांना झोडपून काढलं आहे. सोशल मिडियावर सिंधुदुर्गमधील वादळी वाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जोराच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याचं दिसून येत आहे. यासोबत मुसळधार पाऊस देखील झाला आहे.
यासोबत विदर्भातील यवतमाळ आणि अमरावतीत देखील बुधवारी (दि.२२) पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तसंच अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांचा नुकसान झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
मराठवाडा कोकणात पावसाचा अंदाज
अंदमान-निकोबारात मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सूनची आगेकूच पुढे सुरुच आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी देखील चांगले वातावरण आहे. त्यामुळे केरळच्या काही भागात मान्सूनपूर्व जोरदार पाऊस मागील चार दिवसांपासून सुरु आहे. त्यातच देशासह राज्यातील वातावरणात देखील याचा परिणाम दिसून येत आहे. राज्यात सध्या पावसासह उष्णतेचा काही भागात इशारा देण्यात आला आहे. तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
Share your comments