Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे वातावरणावर परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने होऊ लागला आहे. आज (दि.२७) रोजी चक्रीवादळाचा वेग कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या वादळामुळे देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 इतका राहू शकतो. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात केल्या आहेत. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम मान्सूनवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांत हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहील. तर अकोला येथे ४५.६°C कमाल तापमानाची नोंद झाली. धाराशिव येथे २२.०°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.
Share your comments