सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाने खंड दिला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अजून दोन दिवस राज्यामध्ये पावसाची पोषक परिस्थिती नसल्याचे देखील हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विदर्भ व मराठवाडा तसेच काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. परंतु हा पाऊस पुरेसा नसून जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी बंधूंना आहे.
जर या बाबतीत हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर मराठवाडा व कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 24 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. परंतु आजपासून विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात तरी पावसाचा जोर वाढणार नसल्याचे हवामान विभागाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. परंतु सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल असे देखील भारतीय हवामान विभागाने निवेदनात म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या स्थितीबाबत पंजाबराव डख यांचा अंदाज
या सगळ्या चिंताग्रस्त परिस्थितीमध्येच शेतकऱ्यांमध्ये हवामानाच्या बाबतीत लोकप्रिय असलेले नाव पंजाबराव यांचा देखील हवामान अंदाज समोर आला असून त्यांच्या मते सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास 15 दिवस पावसाचा खंड राहणार आहे. म्हणजेच एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाचा खंड राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
त्यानंतर मात्र 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडेल असे देखील त्यांनी म्हटले आहे. जर पंजाबरावांचा सप्टेंबर महिन्यातील हा अंदाज खरा ठरला तर मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडेल हे मात्र निश्चित. परंतु सप्टेंबर च्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पावसाचे आगमन चांगल्या प्रकारे राहिले तर खरीप पिकांना जीवदान मिळेल व शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल.
Share your comments