Weather Update :
राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाने आज हजेरी लावली आहे. तर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार ते हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. परतीच्या मान्सूनसाठी पुढील ३ दिवसात आणखी पोषक वातावरण होण्याची शक्यता आहे.
मान्सून परतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर अधूनमधून आहे. आज (दि.२७) रोजील कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला होता. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दोन दिवसानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील २ ते ३ दिवसात राजस्थानमधून परतीच्या मान्सूनसाठी अधिक पोषक वातावरण तयार होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत कोकणात तर २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज सांगली जिल्ह्यातील चांदोलीत १ हजार ७१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील काळात पावसाचा जोर कायम राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठी कोणीही जावू नये, नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल (दि.२६) रोजी हिंगोलीत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचं नुकसान झालं आहे.
Share your comments