1. यशकथा

मैत्री हिरवाईशी: गच्चीवर फुलवलं नंदनवन, भाजीपाल्यासह 100 वनस्पतींचे संगोपन

ललिता बर्गे
ललिता बर्गे
terrace garden

terrace garden

अहमदनगर- वृक्षांच्या सान्निध्यात माणसाचं मन प्रसन्न होते. पाना-फुलांशी जपलेलं नात माणसाचं भावविश्व समृद्ध बनवते. मात्र,सिमेंटच्या जंगलात हिरव्या झाडांची वनराई लुप्त होत असताना हिरवाईशी मैत्री जोपासण्याची अनोखी किमया शहरातील किरण अजित तिवारी यांनी साधली आहे. इमारतीवरील जागेचा पूरेपूर वापर आणि जैविक खतांची सांगड घालून तिवारी यांनी गच्चीवरच बाग फुलवली आहे.

विविध रंगांच्या फुलांपासून ते औषधी वनस्पतींपर्यंत विविध जातींच्या १०० वनस्पतींचा यामध्ये समावेश आहे. हंगामानुसार रोपण, मातीचा शास्त्रीय वापर आणि नियमित निगा या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वीरित्या झाडांचे संगोपन केले आहे. विविध आकाराच्या कुंड्यांची प्रमाणबद्ध मांडणी आणि पाना-फुलांच्या विविध रंगी छटांमुळे गच्चीवरच नंदनवन अवतरल्याचे दृश्य निर्माण झाले आहे.

इमारतीवरील गच्चीसोबतच घराच्या बाहेरील बाजूला असलेल्या झाडांमुळे तिवारी परिवाराने 'हरित इमारत' संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. जणू जैवविविधतेची एक प्रयोगशाळाच तयार झाली आहे.

रोपणासोबत संगोपन:

 रोपणासोबत झाडांच्या संगोपनाची अचूक माहिती असणे महत्वाचे आहे. त्यानुसार पाणी आणि खतांचे योग्य प्रमाणात ठेवता येते. कीटकांपासून प्रतिबंध करता येतो. तापमान कमी करण्यासाठी टेरेस गार्डनिंग हा उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात शीतलता मिळते. हिवाळ्यात वातावरणात उबदारपणा मिळतो. शहरातील हरवलेल्या वृक्षराजीमुळे छोटे-छोटे पक्षी भेट देतात. पक्ष्यांचा किलबिलाट सुखावणारा असतो. हिरवाईच्या आल्हाददायक वातावरणात घरगुती छोटेखानी कार्यक्रमांचा आनंदही त्यामुळे द्विगुणित होत असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

ऑक्सिजन प्लांट:

लॉकडाउन काळात बाह्यवावरावर बंधने असल्यामुळे आम्ही गच्चीवरच नियमित योगासने आणि व्यायाम करतो. त्यामुळे झाडांच्या सान्निध्यात शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला होतो.

एकप्रकारे आमच्यासाठी झाडे इनडोअर नैसर्गिक ऑक्सिजनचा प्लांटच असल्याचे किरण तिवारी यांनी म्हटले आहे.

बागेमुळे तापमानात घट

बागेमुळे मन रमते. स्वत:च्या हाताने पिकवलेल्या ताज्या भाज्या उपलब्ध होण्याचा फायदा तर आहेच, पण त्यामुळे घराजवळच्या तापमानातही घट होते. त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास जाणवत नाही. हिरवळीचा आनंद उपभोगता येतो, भविष्यात आपली बाग अधिक समृद्ध करणार असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. 

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters