माणसाकडे काम करण्याची जिद्द आणि चिकटी असेल तर या जगाच्या पाठीवर कोणीच अडवू शकत नाही.आणि याच मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावरती कृषी पदवीधारक एका तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे कि आपण फक्त योग्य निर्णय घेतल्याने शेतीतून भरगोस उत्पन्न भेटते. त्यासाठी या तरुणाने शहरातील एक चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या घरच्यांना आणि बऱ्याच लोकांना योग्य वाटला नाही.
जिद्दीच्या जोरावर काम करून दाखविले :
पण या सगळ्या लोकांना जास्त विचारात न घेता त्याने आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे केले.आणि केवळ अडीच महिन्यात फक्त एक एकर शेतामध्ये सात लाखांचं उत्पन्न घेण्याची कमाल केली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील गजानन इंगळे या तरुण शेतकऱ्यांची पंचक्रोशीत मोठी चर्चा आहे.गजानन या तरुणाने भर उन्हाळ्यात एक कौतुकास्पद व धाडसी निर्णय घेतला. आपल्या शेतात पारंपरिक पीक न घेता आपल्या कृषी पदवीच्या ज्ञानाचा उपयोग करत ढोबळी मिरचीचे पीक घेतले आणि मोठा पराक्रम करून दाखवला ज्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत याच तरुणाची चर्चा सुरू आहे.
हे पीक घेण्यासाठी त्याने जमीन तयार करून त्याला शेणखत, कंपोस्ट खत व इतर खतांचा बेसल डोस देऊन जमीन तयार केली. त्यावर पाच फूट अंतरावर बेड तयार करून ठिबक सिंचन व मल्चिंग केले. त्यात ५४१ अंतरावर लागवड केली.त्यासाठी त्याला १३००० रोपे लागली. त्याला ड्रीपद्वारे खत व औषध फवारणी केली.त्या नंतर लागवडीपासून ५० व्या दिवसापासून मिरची बहरात आली आहे. आतापर्यंत ४ वेळा तोडणी केली आहे. आतापर्यंत सुमारे १२.५ टन एवढे उत्पन्न निघाले आहे. ही मिरची(Capsicum) कळंबच्या व्यापाऱ्यामार्फत हैद्राबाद येथे विक्रीसाठी जात आहे. सध्या या मिरचीला सुमारे २० ते २२ हजार रु.टन भाव आहे.त्यातून २ लाख ६० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
हेही वाचा:योग्य विक्री व्यवस्थापनामुळे सीमाताई जाधव ठरल्या विविध पुरस्कारांचे मानकरी
यापुढे सुमारे ३५ ते ४० टनाच्या आसपास मिरचीचे उत्पादन निघन्याची शक्यता आहे. यातून सुमारे साडेसहा ते सात लाखाच्या आसपास उत्पन्न होण्याची खात्री आहे. एक एकर शेतीत गजानन इंगळे याने अवघ्या अडीच महिन्यात सुमारे साडेसहा ते सात लाखांचे उत्पन्न घेऊन तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.आणि याच तरुणाची भूमिका अनुकरण करत अनेक तरुण पिढी शेती करण्यास सुरुवात करत आहे.
Share your comments