योग्य विक्री व्यवस्थापनामुळे सीमाताई जाधव ठरल्या विविध पुरस्कारांचे मानकरी

22 March 2021 05:17 PM By: भरत भास्कर जाधव
सीमा ताई  जाधव

सीमा ताई जाधव

भाजीपाला शेती करत असाल तर विक्री व्यवस्थापनाला अधिक महत्त्व द्यावे लागते. पाणी आणि  खत व्यवस्थापनासह विक्री व्यवस्थापन हे भाजीपाला शेतीत यश मिळवण्यासाठी आवश्यक असतं. विक्री व्यवस्थापन म्हटलं तर त्यात भाजीपाल्याची पॅकिंग आलीच. यामुळे पॅकिंगही योग्य असणे गरजेचेचं असते. हेच सूत्र आत्मसात करत पुणे जिल्ह्यातील सीमा जाधव यांनी भाजीपाला शेतीत मोठं यश मिळवलं आहे.

फक्त चांगला नफाच नाही तर सुव्यवस्थित शेती व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापनातून सीमा जाधव यांनी  अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. या लेखात आपण त्यांच्या शेतीविषयी माहिती घेणार आहोत...

पॅकिंगमधील शेतमाल विक्रीचा यशस्वी प्रयोग  सीमा जाधव यांनी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चिंबळी गावात यशस्वीपणे राबविला आहे. बऱ्याचदा शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन जरी होत असले तरी शेतीमाल विक्री व्यवस्थेत आपला हातखंडा नसेल तर अनेकदा शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी बऱ्याचदा अडचणीत आलेला दिसतो. शेतीतील संकटावर प्रभावी मात करून सीमा जाधव यांनी शेतमाला विक्री व्यवस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली  आणि शेतीत क्रांती केली.

सीमाताई जाधव यांच गाव चिंबळी असून हे गाव पुणे जिल्ह्यातील आहे. साधरण एक हजार लोकांची वस्ती असणाऱ्या या गावात सीमाताई यांनी शेतीतून उत्तम उदाहरण स्थापित केलं आहे.  चिंबळी गावात राहत असलेले चंद्रकांत जाधव यांच्याशी सीमाताईं यांचा विवाह झाला. चंद्रकांत जाधव हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. पण फक्त कंपनीच्या पगारावर घर खर्च भागत नसल्याने सीमाताई यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीत शेती करण्याचा निश्चय केला. तीन एकर शेतीतून त्यांनी एका एकरात शेती करण्याचा निश्चय केला. या एक एकरात त्या  भाजीपाला शेती करू लागल्या. सुरुवातीला पारंपारिक शेती त्यांनी केली पण त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. हातात चलनासाठी पैसे राहत नसल्याने आपण भाजीपाला शेतीकडे वळल्याचे सीमाताई सांगतात.  या भाजीपाला शेतीत त्यांनी आधी वांग्याचे उत्पन्न घेतले, पण बाजारात त्याला योग्य दर मिळाला नाही.  नवीन काही तरी करण्याचा आणि शाश्वत उत्पन्न मिळावे या विचारातून त्यांनी सेंद्रिय भाजीपाला शेती करण्याचं ठरवलं. यात त्यांनी भारतीय पिकांबरोबर परदेशी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतलं. चायनिज भाजीपाल्याचे उत्पन्न कसे करावे याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले. यासह त्यांनी विक्री व्यवस्थापनाचे देखील प्रशिक्षण घेतले. परदेशी भाजीपाल्यामध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, आईसबर्ग, झुकेनी या प्रकारच्या भाजीपाल्यांचे उत्पन्न त्या घेत असतात. 

परदेशी भाजीपालातून मिळतो भरपूर पैसा

परदेशी भाजीपाल्यातून चांगला पैसा मिळत असल्याचे, त्या म्हणतात. मागील वर्षी ब्रोकलीमधून त्यांनी  तीन लाख रुपयांची कमाई झाली होती. ब्रोकली ही फ्लॉअरसारखे असते पण फ्लॉअर हे फक्त  साधरण २० रुपये किलो प्रमाणे विकले जाते. पण ब्रोकलीला साधरण  २०० रुपये  किलो  दर मिळत असल्याचे, त्या म्हणतात.

सेंद्रिय शेतीचा घेतला वसा

सुरुवातीला सीमाताई पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. परंतु त्यातून अधिक फायदा होत नसल्याने त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यानं शेतात पिकणाऱ्या भाजीपाल्याला उत्तम दर्जा असतो शिवाय दरही चांगला मिळत असतो. सीमा जाधव यांनी आपल्या सेंद्रिय शेतीतून अनेक ग्राहकांसह अनेक शेतकरीही  जुडले. सेंद्रिय शेत मालाला मिळणारा नफा पाहून अनेक शेतकरी त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर आता सेंद्रिय शेती करणाऱ्याचा एक समूहच तयार झाल्याचं, त्या सांगतात. सीमाताई जाधव यांनी आता ३० शेतकऱ्यांच्या ग्रुप तयार केला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा समुहात अजून शेतकरी येणार असल्याचंही त्या म्हणाल्या. कोरोनामुळे ग्राहकांमध्ये सेंद्रिय भाजीपाल्याची मागणी वाढली  आहे. पौष्टीक आहारासाठी ग्राहक मोठी रक्कम देण्यासही तयार असल्याचे सीमाताई म्हणाल्या.

मातीचे परिक्षण करुन पिकांची वाटणी

सेंद्रिय शेती करणाऱ्या ३० शेतकऱ्यांचा समूह आहे. यात सीमाताई व्यवस्थित व्यवस्थापन करतात.  सेंद्रिय शेती करणाऱ्या ग्रुपशी जोडणाऱ्या शेतकऱ्यांची शेत जमिनीचे माती परीक्षण केले जाते. त्यानुसार ज्या पिकांसाठी शेत जमीन चांगली असेल त्या पिकांची लागवड करण्यास सांगितले जाते. ग्रुपमधील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला सीमाताई स्वत: खरेदी करतात.  शेतमाल बाजारात नेण्याचा त्रास कमी होऊन योग्य दर  जागेवर मिळत असल्याने  समूहातील शेतकरी आनंदी असल्याचे सीमाताई म्हणतात.

 

आपल्या शेतमालावर ग्राहकांचा विश्वास

बिग बॅस्केट पेक्षा किंवा इतर कंपन्याकडून मिळणाऱ्या मालापेक्षा आमच्या मालाला अधिक मागणी असते. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे  दर्जेदार  भाजीपाला यामुळे इतर कंपनीशी आपली स्पर्धा नसल्याचे  जाणवले. ‘शहरातील ग्राहकांचा आमच्या भाजीपाल्यावर विश्वास अधिक आहे,  त्यामुळे कोणत्याही कंपन्यांशी आमची स्पर्धा  असल्याचं आम्हाला कधी  जाणवले नाही. बिग बॅस्केट हे फक्त नावाने मोठं आहे, पण मालाचा दर्जा कमी असतो’.सेंद्रिय शेती जरी करायची म्हटले तर विक्री व्यवस्थापन असणे महत्त्वाचे असते. मालाची निवड, ग्राहकांची पसंती, पॅकिंग आदी गोष्टींची काळजी  घ्यावी लागत असल्याचेही त्या म्हणाल्या.

विक्रीसाठी पॅकिंग आहे महत्वाचे

सीमाताई आणि चंद्रकांत जाधव हे भाजीपाला बाजारात देण्यापेक्षा थेट विक्री करण्यास प्राधान्य देतात. यात आपणच विक्री केल्याने आपल्या शेतमालाला योग्य दर मिळत असल्याचे सीमाताई म्हणतात.  या थेट विक्रीतून त्यांना पॅकिंगचे महत्त्व समजले. पॅकिंगमधील वस्तू घेण्यास ग्राहक प्राधान्य देतात, चांगली पॅकिंग असली तर ग्राहक आकर्षित होत असतात. यामुळे सीमाताई ह्यांनी आपल्या भाजीपाल्याचे पॅकिंग वजनानुसार करतात. ग्राहकांची असलेली गरज ओळखून पॅकिगमध्ये शेतमाल देण्यास सुरूवात केली. योग्य पॅकिंगमुळे दर्जा टिकून राहतो. यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम राहिला आणि नंतर शेतमालाची विक्री चांगली होत गेली. शेतमाल विविध पद्धतीने ग्रेडिंग, पॅकिंग केली जाते.. सुरुवातीला सीमाताई भाजी पॅकिंगसाठी बारदाना पोती तसेच गोणीचा वापर करत होते. परंतु हे पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील ग्राहक वर्गाला हे पटत नव्हते. म्हणून त्यांनी पॅकिंगमध्ये बदल केला. तो शेतमाल आता एका कोरोगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो माल ग्राहकांना देण्यास सुरूवात केली. त्यामुळे पॅकिग व ताजा माल थेट ग्राहकांना मिळत असल्याने चांगला प्रतिसाद वाढत गेला. 

व्हॉट्सअपने जोडले ग्राहक

कोरोना काळात अनेकांना त्रास झाला. अनेकांची कामे गेली, पण या काळात अनेकांना ऑनलाईनचं महत्त्व कळाले. सीमाताई यांनीही ऑनलाईन व्यासपीठाचा उपयोग करत आपला व्यवसाय वाढवला. सीमाताई आपल्या शेतातील भाजीपाला पुण्यातील सोसायट्यांमध्ये विकतात. यासाठी सीमाताई यांनी काही व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. त्यांतून त्यांनी ग्राहक जोडले, प्रत्येक सोसायटीमधून १०० ते १५० ग्राहक आहेत. पुढील काळात डिजिटायझेशनचा उपयोग करत अजून ग्राहक वाढवू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

  विक्री व्यवस्थापन

ग्राहकांची ऑर्डर ही व्हॉट्सअपवरुन घेतली जाते. किती किलो मालाची ऑर्डर आहे याची माहिती त्यांनी होत असल्याने शेतातून किंवा आपल्या ग्रुपमधील शेतकऱ्यांकडून मोजक्याच प्रमणात भाजीपाला विकत घेत असतात. किंवा तितकाच भाजीपाला शहरात विकत असतात. विक्रीविषयी बोलताना सीमाताई म्हणतात की, ‘शेतकरी जोपर्यंत आपला शेतमाल स्वत: विकत नाही तोपर्यंत त्याला योग्य दर मिळणार नाही’’. शेतातून पिकलेला भाजीपाला त्या स्वत: विकतात. ऑर्डर देऊनही भाजीपाला उरत असेल तर तो माल आपल्या गावात विकत असल्याचं, त्या सांगतात.

 

परदेशी भाजीपाला शेतीचं व्यवस्थापन

चायनिज भाजीपाला घेण्यासाठी त्यांनी शेतातील जमिनीचे सपाटीकरण करुन घेतले. त्यानंतर ७० सेंटीमीटर रुंद  आणि  सात - आठ इंचीचे बेड तयार केले.  प्रत्येक बेडवर गांडूळ खत, निंबूळी पेंढ, ट्रायक्रोमा टाकलं त्यानंतर एक इंच मातीमध्ये लागवड करण्यात आली.

पाणी व्यवस्थापन

पिकांना व्यवस्थित पाणी मिळावे, यासाठी  विहिरीवर ठिंबक संचाची  सोय करण्यात आली. चायनिज भाजीपाल्याला पाणी आणि खत देण्यासाठी ठिंबकचा उपयोग केला जातो.

मिळालेले पुरस्कार

शेतीत नवनवीन प्रयोग करताना अनेक संकटावर सीमाताई यांनी  मात केली म्हणून विविध माध्यमांनी त्यांची दखल घेतली.

१)महिला शेती पुरस्कार ( ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंन्ट ट्रस्ट, बारामती २०१५)

२) उत्कृष्ठ महिला शेतकरी पुरस्कार २०१३ (महाराष्ट्र सिंचन सहयोग)

३) उद्योगजननी कमल पुरस्कार २०१८ (सेंद्रीय शेती)

४) कृषीथाँन पुरस्कार २०१५

५) अभिनव कृषी पुरस्कार २०१८

६) वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद),  आणि  नाशिक येथील सौजन्य महिला विकास संस्थेकडून सेंद्रिय शेतीसाठी पुरस्कार मिळाला आहे.

Seematai Jadhav organic farming sales management विक्री व्यवस्थापन सीमाताई जाधव पुणे जिल्हा pune district
English Summary: Seematai Jadhav gets various awards due to his proper sales management of organic farming

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.