1. यशकथा

गावाकडची ती

KJ Staff
KJ Staff

आजमितीला भारताची लोकसंख्या हि  १३५ कोटी आहे. त्यातील पुरुष ७० कोटी आणि महिला ६५ कोटी आहेत. त्यापैकी जवळपास ७२.२ टक्के लोकं हि ग्रामीण भागात राहतात. एकूण भारत हा खेड्यांचा देश समजला जातो. स्वातंत्र्यानंतर भारतातील खेडी हि कात टाकू लागली आणि आजमितीला तंत्रज्ञानाच्या भरारीने आधुनिकतेची चव ग्रामीण भागातही चाखली जात आहे. भारतातील भौगोलिक विविधतेमुळे इथे आर्थिक, सामाजिक, वैचारिक विविधता मोठ्या प्रमाणात आढळते. या विविधतेचा समाजशास्राच्या नजरेतून विचार करता अनेक कंगोरे समोर येऊ लागतात. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आजही शेती आधारित आहे.


शेतकरी आपली कल्पकता लढवून शेती पिकवतात पण सदोष धोरणांमुळे शेतकऱ्याची अवस्था बिकट म्हणावी अशीच आहे. नाही म्हणायला काही कल्पक शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने शेतीतून उत्तम प्रगती साधली आहे. पण जर त्यांचा शेतीवर इतका विश्वास असता तर त्यांनीपण आपल्या मुलींची लग्ने शेतकऱ्यांच्या मुलांशी लावली असती. पण तसे होताना दिसत नाही. भारतासारख्या देशात श्रमाला प्रतिष्ठा नाही. शेतात कल्पक मेहनत घेणाऱ्यापेक्षा वातानुकुलीत ऑफिसमध्ये बसून नोकरी करणे प्रतिष्ठेचे मानले जाते त्यामुळे शेतकरी वर्गाला आणि पर्यायाने ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसांना मुख्य प्रवाहातील प्रतिष्ठा मिळेनाशी झाली. त्याचा परिपाक असा झाला कि शेतीमध्ये, गावात कितीही चांगले आर्थिक उत्पन्न असले, कितीही समृद्धी असली तरी शहराकडची ओढ कमी होत नाही. शहराच्या झगमगाटाकडे आकर्षित होऊन आजही तरुण पिढी तिकडे आकर्षित होत आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्याला आपली मुलगी शहरात द्यायची आहे, मुलाला शहरातली नोकरी पाहिजे तरच लग्न होईल. सामाजिक प्रतिष्ठेच्या या अजब घाण्यात आजचा ग्रामीण समाज अडकला असताना, सर्वांनाच शहराकडे जाण्याची ओढ असताना शहरातील काही लोक स्वच्छेने गावी यायचं म्हणतात तेव्हा त्याचं खूप कौतुक वाटतं. शहराचं आकर्षण तर सर्वांनाच असतं. गावाकडच्या उन्हातान्हाच्या, धुळीच्या पुढे शहराचा चकचकीतपणा नक्कीच सुखावह वाटू लागतो पण त्या चकचकीतपणाच्या बदल्यात मिळणारे प्रदूषण, धावपळ, गजबज जगण्याचा निवांतपणा घालवते हे फार उशिरा लक्षात येते. या अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील मुलींची मानसिकता विचारात घेतली तर त्यांचा कल हा शहरांकडे जाण्याचा आहे. त्यांना असं का वाटतं याचं उत्तर इथच दडलंय.

गावातल्या संधी, गावातले सौंदर्य, गावातली समृद्धी, आणि गावातलं जगणं याच्याविषयी असलेले चुकीचे समज, त्याच्याविषयी नसलेले विचारमंथन त्यांना आपोआप शहराकडे जायला भाग पाडते. त्यांना कसं बर सांगावं कि थोडं थांबा, विचार करा आजूबाजूला पहा, संधी, समृद्धी आणि सौंदर्य सगळं इथच तर आहे. पण नुसतं सांगून त्या ऐकतील? कि कोणाला तरी पुढे येऊन हे सर्व दाखवुन द्यावं लागेल? गावाकडून शहराकडे असा प्रवाह असताना जर कोणी शहराकडून गावाकडे यायचं म्हटलं तर? नुसतं यायचंच नाही तर लग्न करून कायमचं इथेच मातीत समरसून जायचं. ऐकायला थोडा वेडेपणा वाटेल पण खरच असं घडलंय, नम्रताच्या रूपाने. नम्रता, जन्म पुण्यात, शिक्षण पुण्यात, नोकरीसुद्धा पुण्यात. संवेदनशील मन, त्यातून चित्रकार मग आपोआप आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर निरक्षण आणि ते चित्रातून उतरायचे. गावाशी संपर्क असाच सणावाराला, मामाकडे आल्यावर. तेव्हा जर तिला कोणी म्हणाले असते कि तुला कायमचं गावाला राहायचंय तर यावर तिने कधीच विश्वास ठेवला नसता पण नियतीने ते घडवून आणलं आणि तिनेही ते स्वीकारला, अगदी आनंदानं. नुसतं स्वीकारलच नाही तर ग्रामीण भागातलं सौंदर्य, संधी, समृद्धी आणि समाधान शोधून दाखवलं. नम्रताने स्वतःच्या शोधाचा मार्ग शोधत शोधत इतर महिलांना, मुलींनाही आपापला मार्ग शोधण्यासाठी मदत केली. त्याच नम्रताची गोष्ट आपण पाहूया.

तिचे नाव नम्रता, नावाप्रमाणेच नम्र आणि मितभाषी. अंगात चित्रकलेचे, सुजानशीलतेचे गुण पण साधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यामुळे चित्रकलेकडे कानाडोळा करून, नोकरीसाठीचे शिक्षण घेऊन नोकरी करत होती. अशातच तिची भेट एका अशा तरुणाशी झाली जो नेटकाच आपली स्टेट बँकेतील चांगली नोकरी सोडून स्वतःच्या शोधात गावी आला होता. मनोजचा जन्म शेतकरी कुटुंबातील, उच्चशिक्षित पण नोकरी न करता वेगळे काहीतरी करायचे या इच्छेने ६ वर्ष शहरात राहून पुन्हा गावाकडे आला होता. हा चाचपडत होता, स्वतःची संस्कृती शोधत होता. या शोधाचा प्रवास पराशर कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्रावर येऊन स्थिरावला. शेती हा फक्त व्यवसाय नाही तर अखिल मानवजातीची संस्कृती आहे आणि आपण जे खातो ते बनते कसे हे अनुभवायला लोकांनी यावे यासाठी त्याने या कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्राची सुरवात केली होती. जात्याच कलाकार असणाऱ्या नम्रताला हि गोष्ट आवडली नसती तरच नवल. नियतीने दोघांनाही अशा वळणावर भेटवले होते कि हा तिच्या चित्रकलेकडे आणि ती याच्या संकल्पनेकडे आकर्षित झाली. पुढे हि भेट रुनानुबंधात बदलली आणि एकत्र आयुष्य काढण्याच्या आणाभाका घेऊन जगाचा विरोध पत्करून त्यांचे लग्न झाले. नम्रताला हे चांगले ठाऊक होते कि तिला शहर सोडून गावात जायचंय, कायमचं. ती नुसतीच गावाला आली नाही तर तिने गाव आपला मानला, अगदी मनापसून. कारण तिला इथल्या संधी, इथले प्रश्न, इथली समृद्धी आणि मुख्य म्हणजे इथले समाधान या सर्वांचे आकलन व्हायला लागले होते. सुरवातीचे काही दिवस रुळण्यात गेले, रुळत असताना तिचे निरीक्षण सुरूच होते, निरीक्षणातून काही आकलन झाले आणि झालेले आकलन कागदावर, क्यानव्हासवर, झाडांच्या वाळलेल्या सालीवर, वाळलेल्या पानांवर, मडक्यावर मिळेल त्या माध्यमावर उमटत राहिले.


पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रामध्ये नम्रताने स्वतःची सृजन आर्ट व क्राफ्ट ग्यालरी सुरु केली ज्यामध्ये आजूबाजूला पाहिलेले निसर्ग सौंदर्य प्रतिबिंबित केले. इथे येणारे पर्यटक सृजन आर्ट ग्यालरीतल्या वस्तु विकत घेऊन जाऊ लागली. नम्रताचे लग्न होताना तिच्या आईवडिलांना एक प्रश पडला होता. आमची मुली गावी जावून काय करणार? सर्जन आर्ट व क्राफ्ट ग्यालरी हे त्याचे उत्तर होते. मग सृजन आर्ट व क्राफ्ट ग्यालरीच्या माध्यमातून चित्रकलेतील वेगवेगळे प्रयोग ती करून पहात होती, त्यात वारली चित्रकला तिने अवगत करून घेतली आणि वारलीच्या पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत नाविन्यपूर्ण अविष्कार साकारले आणि विशेष म्हणजे ते पर्यटकांच्या पसंतीसही उतरले. याचा फायदा असा झाला कि अनेक व्यवसायिक, डॉक्टर्स आपल्या ग्राहकांना द्यायला हव्या असणाऱ्या भेटवस्तू नम्रताकडून वारली स्वरूपात करून घेऊ लागले. कुणाच्या घराची भिंत वारली पेंटिंगने सजू लागली तर कोणाच्या टेबलवर वारली ची चित्र दिसू लागली. नम्रताने वारली फॉर्म मध्ये ग्रामीण संस्कृतीला बेमालुमपणे चितारले होते. मग पराशर वर येणाऱ्या पर्यटकांना तसेच त्यांच्या मुलांना सृजनशिलतेचे धडे या निमित्ताने मिळू लागले. कोणाला चित्र काढायचे असेल तर ते आपला हात अजमावू लागले असे एकंदरच कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्राला कलात्मकतेची जोड मिळाली. अशीच सहल म्हणुन एकदा एका शाळेची सहल आली, त्यातून शहरी मुलांचा आवाका, आत्मविश्वास आणि त्यांच्या संधी व ग्रामीण भागातील मुलं त्यांचा आवाका, आत्मविश्वास आणि त्यांना मिळणाऱ्या संधी याचा एकत्रित विचार करताना सृजन शाळेची संकल्पना नम्रताच्या डोक्यात आली. काय आहे सृजन शाळा? मुलांना स्वतःमधील सुप्त गुण ओळखण्याचे व्यासपीठ.

निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे, तो नेहमीच आपल्याला भरभरून शिकवत असतो आपण मात्र नैसर्गिक शिक्षणाकडे पाठ फिरवून पुस्तकी शिक्षणावर भर देत असतो. सृजन शाळेच्या माध्यमातून मुलांना परिसर वाचन, निसर्गवाचन, कलात्मक विकास, व्यक्त होण्याची कला, व्यक्त होण्याचा आत्मविश्वास या गोष्टींचे आकलन होण्यावर भर दिला  जातो. मग त्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा, निवासी शिबिरे, उन्हाळी शिबिरे, शाळांच्या सहलींच्या माध्यमातून येणाऱ्या मुलांना स्वःत्वाची जाणीव करून देणे, कलचाचणी घेणे असे विविध उपक्रम राबविले जातात. सृजन शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्याजवळील सुप्त गुण ओळखून त्यांचा आत्मविश्वासाने विकास करण्यावर भर दिला जातो. जुन्नरमधील विविध शाळांमधे सृजनशाळेचे उपक्रम राबविले गेले. त्याची दाखल जुन्नरच्या शिक्षण विभागाने घेतली एवढच नाही तर झी २४ तास सारख्या वृत्तवाहिनीने सृजन शाळेची दखल घेऊन सृजन शाळेचा राज्यभर प्रसार केला. या सर्वाचा फायदा असा झाला कि पराशर कृषी पर्यटन केंद्रामधे शेती संस्कृतीच्या अनुभवासोबत स्वतःला शोधण्याचे प्रशिक्षणही दिले जाऊ लागले. सृजन शाळा फक्त मुलांसाठीच नसुन अशा प्रत्येकासाठी आहे ज्याला स्वतःचा शोध घ्यायचाय. कारण सृजन सृजनशाळेचे ब्रीदवाक्यच आहे “स्वतःच्या शोधात”. नम्रता सृजन शाळेच्या माध्यमातून अनेक शाळा कॉलेजांमध्ये जात असते, तिथल्या मुलांसोबत गप्पा मारत, त्यांच्या डोक्यात काय चाललंय याचा वेध घेण्याचा प्रयत्न करते आणि डोक्यातल्या विचारांना दिशा देण्याचे काम करते.

कॉलेजांमध्ये जाऊन ती, कॉलेजमधील मुलींशी संवाद साधते, वयात येत असताना, शारीरिक आकर्षण, प्रेम, आयुष्य, स्वप्न, जीवनसाथी या महत्वाच्या विषयांवर मुलींशी गप्पा मारते आणि त्यांचा जगण्याविषयीच्या संकल्पना सजग करते. यातून नकळतपणे तरुण पिढीच्या वैचारिक घुसमटीला जागा मिळते आणि वेळीच सावधानता बाळगली जाण्यास मदत होते. ग्रामीण भागातील कलात्मकता शोधून ती लोकांसमोर मांडत असताना, ग्रामीण भागातील शालेय, विद्यालय व महाविद्यालयीन मुलामुलींशी गप्पा मारत त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेत असताना नम्रता ग्रामीण महिलांविषयी फार संवेदनशीलपणे विचार करते. ग्रामीण भागातील महिलांचा दिवस कामानेच सुरु होतो आणि संपतोही कामानेच. पण काम करत असताना या महिलांनाही आवडीनिवडी असतात, स्वप्न असतात, छंद असतात, प्रश्न असतात, व्यक्त व्हायचं असतं पण हे सर्व कुठे आणि कधी करणार? शहरांमध्ये किटी पार्टी, भिशी पार्टी असते पण ग्रामीण भागातील महिलांना असं काही व्यासपीठ नसतं. वर्षातून कधीतरी सणावाराच्या निमित्ताने एकत्र जमल्या तर व्यक्त होण्याचे धाडस नसते त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची होणारी कुचंबना तशी दुर्लक्षितच होती. नम्रता लहानपणापासून शहरी महिलांचे व्यक्त होणे पाहत आली होती, इथे गावी आल्यावर इथे असं काही व्यासपीठ नाही त्यामुळं महिलांची होणारी घुसमट ती अनुभवू शकत होती. तिच्या संवेदनशील मनाने यावर काहीतरी उपाय काढायचा असं ठरवलं आणि विचारांती एक पर्याय पुढे आला, स्वच्छंदी कट्टा. आठवड्यातून एकदा तासभर या कट्ट्यावर जमायचे. आल्यावर मनमोकळ्या गप्पा मारायच्या, आठवडाभरात काही वाचले असेल, काही ऐकले असेल, काही मनात आले असेल, काही समस्या असेल असं सगळं सगळं इथे शेयर करायचं. स्वच्छंदी कट्ट्यावर वेगवेगळ्या वयोगटातील बायका असल्यामुळे अनुभव सुद्धा वेगवेगळा होता, त्या अनुभवाचा फायदा एकमेकांना त्यांच्या अडचणी सोडवायला होऊ लागला. मग काही बायकांना टाळ वाजवायला शिकायचा होता, एका जाणकार व्यक्तीला बोलावून बायका टाळ वाजवायला शिकल्या. ज्यांना त्याची आवड होती त्या रोज एकत्र जमून भजन गाऊ लागल्या. त्याच परिपाक असा झाला कि एरवी पुरुषी मक्तेदारी असणाऱ्या कीर्तनाच्या साथीला उभे राहणाऱ्या टाळकरी पुरुषांच्या बरोबरीने महिला उभ्या राहिल्या. प्रथमदर्शनी साधी वाटणारी हि गोष्ट महिलांना मात्र मोठा आत्मविश्वास देऊन गेली. त्याचा फायदा असा झाला कि काही महिला मन मारून नोकरी करत होत्या. त्यात होणारी ओढाताण सहन करून म्हणावा असा पगार मिळत नव्हता, मग काय स्वतःचाच व्यवसाय सुरु झाला आणि सचोटीने तो यशस्वीही झाला. हा आत्मविश्वास स्वच्छंदी कट्ट्याचाच. दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत काम काम आणि काम करत असताना मनात येणारे विचार, कल्पना, स्वप्न यांना जबाबदारी पुढे दाबुन टाकावे लागते, मन मारून जगावे लागते. पण स्वच्छंदी कट्ट्याच्या माध्यमातून जबाबदाऱ्या पार पाडत मनातल्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरु झाली.एरवी नारायणगाव च्या पुढे कधी न गेलेल्या महिल्या भिमथडी यात्रेला पुण्याला गेल्या, नजर उघडी झाली, स्वप्नांना दिशा मिळू लागली. तिथे आलेले वेगवेगळे प्रयोग पाहून आपणही असे काही का करू नये हा विचार प्रबळ झाला. मग कट्ट्यातील काही महिलांनी गोधड्या शिवण्याचा उपक्रम सुरु केला. त्यांनी शिवलेल्या गोधड्या आपल्या पराशर कृषी पर्यटन केंद्रावर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या नी त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. संक्रातीचे हळदी कुंकू तसं नेहमीसारखच पण स्वच्छंदी कट्ट्याचे हळदीकुंकू सुद्धा वेगळे होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर एकमेकीला वाण न देता ते पैसे एकत्र करून परिसरातील ठाकरवस्तीवरील शाळेतील मुलांना वह्या पेन्सिली देत सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ घालुन दिला. चाळीशी नंतर सुरु होणारे आजारपण, शरीरात होणारे बदल, वयात येताना मुलींमध्ये होणारे बदल आणि त्यांच्यासोबत घरातल्या महिलांनी साधावयाचा संवाद यावर छान योग शिबीर पार पडले. आता स्वच्छंदी कट्टा आपल्या कामाची व्याप्ती वाढवतोय, सुरु होताना एका वस्तीवरून सुरु झालेला हा स्वच्छंदी कट्टा आता आजूबाजूच्या कार्यक्षेत्रात वाढतोय. महिन्यातून एकदा परिसरातील यशस्वी महिलेला गप्पा मारायला बोलवायचे, तिचे अनुभव कथन ऐकायचे आणि जमेल तसे प्रेरणा घेऊन आपले जगणे समृद्ध करायचे.

२०१४ ला नम्रता, आपलं शहरातलं सुखवस्तू जगणं सोडून कायमची ग्रामीण भागात आली, सुरवातीला जरा जड गेलं पण नंतर सरावाने छान रुळली. फक्त रुळलीच नाही तर संवेदनशीलतेने सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट उद्यमशीलताही जोपासली. तिने तिच्या जगण्यातून ग्रामीण भागातील तरुणींना एक आदर्श घालुन दिला. गावात काय आहे म्हणत मला शहराकडे जायचंय किव्हा मला शहरातला नवरा हवा असं म्हणणाऱ्या किव्हा आपल्या मुलीला शहरातला नवरा असावा असं वाटणाऱ्या पालकांना, गावात काय आहे याचेहि उत्तर नम्रताच्या रूपाने नक्कीच मिळेल. हजारो वर्षांपूर्वी शेतीची सुरवात हि स्त्रियांनीच केली होती. घरातील स्त्री शिकलेली असेल तर कुटुंबाचे कल्याण होते हे काही वेगळे सांगायला नको. अशा परिस्थितीत केवळ शहरी झगमगाटाला, चकचकीतपणाला भाळून शहराकडे धाव घेणाऱ्या मुलींना माझे सांगणे आहे कि प्रवाह आता बदलू लागलाय. शहरातल्या प्रदूषण, दगदग, धावपळ या सगळ्याच्या बदल्यात स्वच्छ हवा, पौष्टिक अन्न आणि जगण्याचे समाधान देणारे वातावरण गावात आहे. शिवाय ज्या संधींच्या शोधात लोकं शहरांकडे जायची त्यापेक्षा शाश्वत संधी आता गावाकडे उपलब्ध आहेत, उपलब्ध होत आहेत. आपण आपली कल्पकता लढवून त्या संधीचे सोने करून जगण्याचेही सोने करू शकतो.

श्री. मनोज हाडवळे
संस्थापक, पराशर कृषी पर्यटन केंद्र
राजुरी, जुन्नर, पुणे 
9970515438

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters