कांदा बियाणाचा यशस्वी प्रवास : संदीप प्याजचा अख्या देशात डंका ; मिळवला राष्ट्रपतींकडून पुरस्कार

28 October 2020 05:18 PM By: भरत भास्कर जाधव


कांदा पीक म्हटलं म्हणजे झटक्यात श्रीमंत करणारी आणि फटक्यात गरीब बनवणाऱ्या लॉटरीचं चित्र आपल्या समोर येत असतं. कांदा पिकाच्या वेळेसही असंच काहीसे होत असतं. कांदा पिकातून भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल तर या पिकाचे शास्त्र समजून घेणं फार गरजेचे असते. कांदा शेती करायची असेल आणि यात यश संपादन करायचं असेल तर काही तरी नवीन करण्याची आणि सतत अभ्यास करण्याची गरज असते. कांदा पीक नाशवंत असल्यामुळे शेतकरी कमी दरातही माल विकून मोकळा होत असतो. कांदा टिकत नाही म्हणून अधिक फटका बसण्यापेक्षा लागवडीसाठी लागलेला खर्च तरी निघला तरी चालेल असे म्हणत, शेतकरी कमी दरात कांदा विकत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? कांदा टिकण्याची क्षमता ही बिजावर अवलंबून असते.

जर आपण खराब कांद्यांपासून बियाणे तयार केले तर येणारे पीक ही त्याच प्रतिचे तयार होत असते. शेतकरी मात्र नेहमी बीज तयार करताना तीच चूक करत असतो. कांदा बियाणे तयार करत असताना बाजूला सारलेल्या कांद्यांचे बियाणांसाठी उपयोग करत असतो.  यामुळे बीज तयार करत असताना अधिक काळजी घेणे आवश्यक असते.आज अशाच एका शेतकरीविषयी आपण चर्चा करणार आहोत, ज्यांनी शेती करताना केलेल्या अभ्यासामुळे आणि आपल्या जिज्ञासू वृत्तीमुळे राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळवला आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे, संदीप घोले. तुम्ही  संदीप प्याज बियाणं हे नाव कधी ऐकलं का? नाही ना तर आज आम्ही तुम्हाला संदीप प्याजशी परिचित करून देणार आहोत. संदीप घोले यांनी कांदा बीज प्रक्रियेत आपलं नाव पूर्ण देशात पोहचवलं आहे. आधी फक्त एका गावासाठी मर्यादित असलेले नाव आज राज्यासह देशाच्या अनेक राज्यात पोहचले आहे.

हेही वाचा : आता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सॉल्यूशन

शेती व्यवसाय तसा त्यांचा वडिलोपार्जितच पण संदीप प्याज ब्रँड बनणे हे त्यांच्या अभ्यासामुळे आणि शेतीत काहीतरी करुन दाखवण्याच्या ध्येय्यामुळे शक्य झालं आहे. संदीप घोले हे पुणे जिल्ह्यातील असलेल्या दौंड तालुक्यामधील पाटस गावाचे रहिवाशी. घोले यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आहे.बारावीनंतर त्यांनी शेती व्यवसाय करत असताना बाहेरुन आपले शिक्षण पुर्ण केले. सुरुवातीला संदीप घोले हे नेहमीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. पण यश मिळत नव्हते. यामुळे घोले खूश नसतं. आपण काहीतरी वेगळं करावं असं मनाशी ठरवून त्यांनी कांदा शेतीकडे आपला मोर्चा वळवला. घोले हे ऊस पट्ट्यातील शेतकरी आहेत. त्यांच्या परिसरात कांदा पीक सहसा घेतलं जात नाही. ज्या भागात कांदा पीक घेतले जात नाही त्या भागात त्यांनी ८० टक्के शुद्ध कांदा बीज तयार केले आणि अख्या देशात आपलं नाव पोहोचवलं. संदीप प्याज बियाणांच्या लागवडीतून दर हेक्टरी ३७.५ टन इतकं उत्पन्न येते. दापोली येथील कृषी विद्यापीठात संदीप घोले यांच्या कांदा बियाणांची चाचणी झाली आहे. त्या चाचणीत संदीप प्याज पहिल्या क्रंमाकावर आले होते.

 


यावेळी त्यांच्या बरोबर बाबासाहेब किशोरे यांनी तयार केले बियाणे आणि राजगुरूनगर पुणे येथील कांदा –लसूण संशोधन संस्थेने तयार केलेली फुले बसवंत आणि एग्री फाऊंड रेन हे बियाणेही चाचणीसाठी पाठवण्यात आली होती. त्यावेळी संदीप घोले यांनी तयार केलेले संदीप प्याज या बियाण्याची उत्पादन क्षमता सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झालं. साधरण ३७.५ टन दर हेक्टरी इतके उत्पादन या बियाणांपासून आले. आपल्या बियाणांविषयी बोलतांना घोले म्हणतात की, ‘अशा प्रतिच्या बियाणांची निर्मितीसाठी आठ वर्ष निरनिराळ्या कांदा शेतीचं आणि वखारीतील कांद्यांचे निरीक्षण करुन अभ्यास केला. त्याच मुळे आजच्या घडीला आपण ८० टक्के इतके शुद्ध बियाणे तयार करू शकत आहोत’’. 

एनआय फाउंडेशननेही (नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन) घोले यांचे कांदा बियाणे राज्यासह  हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश अशा सात राज्यातील शेतकऱ्यांकडे चाचणीसाठी पाठवले होते. त्याचबरोबर पुणे  विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ येथेही चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. साधरण चार वर्ष चाचणीसाठी बियाणे वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे आणि विद्यापीठांकडे पाठवण्यात आले होते. या बियाण्यांची उत्पन्न क्षमता किती ? काढणी कधी होते?  टिकण्यासाठी कसे आहे? असा अहवाल एनआयने मागवला होता. त्यात संदीप प्याज अव्वलस्थानी राहत सगळ्या निकषात योग्य बसले. याचमुळे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन या भारत सरकारच्या स्वायत संस्थेने दखल घेत भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेच्या प्रगतीशील शेतकरी यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला.

हेही वाचा : नियोजनबद्ध शेतीतून गाठलं यश; अवघ्या अर्धा एकरात पिकवला ४२ टन ऊस

संदीप घोले यांच्या कांदा बियाणांची गुणवत्ता पाहून त्यांना टॉप प्रोग्रेसिव्ह फॉर्मर या पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना मागील वर्षी रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला. दरम्यान संदीप प्याज या बियाणांपासून उत्पादित केलेले कांदे हे निश्चित वेळेत काढणीला येत असल्याने लोकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान देशभरातील कांदा उत्पादक संदीप घोले यांच्याकडून कांदा बियाणे लागवडीसाठी घेत असतात. आधी संदीप घोले हे पारंपारिक पद्धतीने कांदा पीक घेत असत,पण हवे तसे यश येत नव्हते. बऱ्याच वेळा बाजारात भेटणारे कांदा बियाणे हे निकृष्ट प्रतीचे असल्याने त्यांनी कांदा बियाणे निर्मित करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी साधरण ८ ते ९ वर्ष अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी कांद्यावरील रोग, टिकण्याची क्षमता या बाबींचा अभ्यास कांदा  शेतात आणि कांदा वखारीत केला.

हेही वाचा : संत्र्याच्या शेतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झाली वाढ ; वाचा अमरावतीतील यशोगाथा

 

जे कांदे सिंगल रिंगचे आहेत, फुटत नाहीत.या कांद्यामध्ये ओलसरपणा कमी असतो. हे अशी कांदे बियाणांसाठी योग्य असल्याचं घोले सांगतात. पण इतर शेतकरी कांदा बियाणे तयार करताना आपल्याकडील फुटीचे आणि दुबाळ कांद्याचा उपयोग  बिज निर्मितीसाठी करत असतात. यामुळे या काय होतं कांदा टिकण्यास योग्य नसतो. कारण या कांद्यांमध्ये ओलसरपणा अधिक असतो,यामुळे कांदा लवकर खराब होत असतात.अशी माहिती त्यांनी ‘कृषी जागरण मराठी’शी बोलताना दिली. यासह त्यांनी कांदा बियाणे कसे असावे?  काय केले पाहिजे याविषयीही माहिती दिली.


काय आहेत संदीप प्याज बियाणांची वैशिष्टये –

रोगप्रतिकारक शक्ती अधिक -

संदीप घोले यांनी निर्मित केलेल्या बियाणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे.कारण कांदा बिज निर्मितीसाठी चांगल्या गुणवत्तेच्या कांद्यांचा उपयोग केला जातो. या बियाणांच्या कांद्यावर करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो.

अधिक काळ टिकतो –

बिज निर्मितीसाठी सिंगल रिंगचे कांद्यांची निवड.या कांद्यात ओलसरपणा कमी असतो. साधरण सहा महिने या बियाण्याचा कांदा वखारीत टिकत असतो.

काढणीसाठी योग्य स्थिती येत असतो –

संदीप प्याजचे कांदे हे १२० दिवसात काढणीला येत असतात. कांद्याचे पीक हे कालावधी येऊनही उपयोगाचे नसते आणि कालावधीनंतर येऊनही उपयोगाचे नसते. यामुळे संदीप प्याजची काढणी ही निश्चित वेळेत येत असल्याने लोकांच्या पसंती उतरत आहे. साधरण देशभरातील कांदा उत्पादक या बियाणांची मागणी करत असतात.

बाजारात मागणी अधिक –

चवी चांगला असल्याने या कांद्याला मागणी अधिक आहे. यासह हे कांदे आकर्षक दिसत असल्याने बाजारात हा कांदा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो.

दरम्यान चांगल्या बियाण्यांसाठी काय केले पाहिजे असे विचारले असताना घोले यांनी गाव व्यवस्थापनावर अधिक भर दिला. संदीप घोले म्हणतात की, ‘आपण ज्या कांद्याच्या जातीची बिजप्रक्रिया करत आहे. तर साधरण आपल्या शेतापासून दोन किलोमीटर अंतरावरील क्षेत्रातही त्याच जातीचा कांदा बियाणे असले पाहिजे. यामुळे परागीकरणाचा धोका राहत नाही. आपण जर वेगवेगळ्या प्रतिचे कांदा बियाणे लावले तर मधमाशांमुळे कांदा बियाणे दुषित होत असते’. कांदा बियाण्यासाठी फुटीचे कांदा, दुबाळ, पत्ती नसलेला कांदा, डेगळाळ कांदा घेऊ नये. कांदा बिज निर्मितसह संदीप घोले हे ऊस उत्पादक आहेत.  ते उसाचे साधरण १२० टन इतके उत्पन्न घेत असतात. याच बरोबर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. व्हॉट्स अप, इतर सोशल मिडियाच्या व्यासपीठावरुन ते शेतकऱ्यांना पीक सल्ला आणि पाणी व्यवस्थपानविषयी माहिती देत असतात. दरम्यान आपल्या या यशाचे श्रेय ते राहुरी येथील वने गुरुजी यांना देतात. शेतातील विविध प्रयोग करण्याचे धाडस त्यांनीच दिल्याचे घोले म्हणतात. 

Onion Seed Sandeep Onion seed संदीप प्याज कांदा बियाणे dond pune district पुणे जिल्हा दौंड
English Summary: Successful Journey of Onion Seed: Sandeep Onion's reach in all over country

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.