द्राक्ष उत्पादन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते हेच कारण आहे की नाशिक जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हणून देखील संबोधले जाते. असे असले तरी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात असे एक गाव आहे जे द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण जिल्ह्यात आपला एक वेगळा दबदबा बनवित असते. जिल्ह्यातील कडवंची गाव द्राक्षासाठी विशेष ओळखले जाते या गावाला द्राक्षाचे हब म्हणून देखील संबोधले जाते.
द्राक्ष उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या याच गावातील शेतकरी नारायण शिरसागर यांची कन्या उमाने द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात आपले नाव गाजवले आहे. उमा वयाच्या तेराव्या वर्षापासून शेती क्षेत्रात सक्रिय आहेत, विशेष म्हणजे नारायण यांना एकूण आठ मुली आहेत. परंतु उमा ही त्यांना मुला पेक्षा कमी नाही, उमा ने देखील वडिलांची शेती यशस्वीरीत्या सांभाळली आहे. उमा तेरा वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचा अर्थात नारायण यांचा एक अपघात झाला तेव्हा शिरसागर कुटुंबापुढे आता शेती कोन सांभाळणार? हा एक मोठा प्रश्न उभा झाला त्यावेळी उमाने आपल्या कुटुंबाचा भार उचलत शेती करण्याचा निर्धार केला. 13व्या वर्षी अगदी कोवळ्या वयात शेतीची जबाबदारी सांभाळण्याचा निर्धार करीत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली.
8वी पास उमाला अगदी लहानपणापासून शेतीची आवड असल्याने, तिने वडिलांची शेती सांभाळण्याचा निर्णय घेतला. पाच एकर द्राक्षबागेतून उमाने आपल्या कष्टाच्या जोरावर आणि योग्य नियोजनाने पहिल्याच वर्षी लाखो रुपयांची उलाढाल केली. शेती क्षेत्रात मिळालेल्या या नेत्रदीपक यशाची जिल्हा पातळीवर देखील दखल घेण्यात आली, उमाच्या या नेत्रदीपक यशासाठी त्यांना एकूण 45 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या आईवडिलांचा भार सांभाळण्यासाठी उमाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे लग्नानंतर देखील माहेरी राहत वडिलांची शेती करण्याचा.
उमा आता वडिलांची शेती ही करते शिवाय त्यांचा सांभाळ देखील मोठ्या उत्साहाने करत आहे. उमाच्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांचे वडील विशेष प्रसन्न असल्याचे बघायला मिळते. उमा चे वडील म्हणतात की, उमा ही आमच्या मुलापेक्षा कमी नाही. एखादा मुलगा जेवढं करू शकला नसता तेवढं आमच्या उमा ने करुन दाखवले. उमाने महिला देखील आता कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत हे दाखवून दिले आहे. तिचे हे नेत्रदीपक यश इतर महिला शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
Share your comments