जलयुक्त वेळू गाव

18 July 2019 03:59 PM


सर्वासाठी पाणी- टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. पिकाच्या मुख्य वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परस्थिती निर्माण होवुन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. अवर्षण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या जमनीचे मोठे प्रमाण विषम, अनिश्‍चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्‍चितता विकासाठी आव्हान ठरत आहे. यास पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे.

शाश्‍वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणा अंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन कोरेगाव तालुक्यात वेळु या गावात राबवण्याचे ठरवून पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्‍चित करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्याचे प्रमुख उद्देश:

 1. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवणे.
 2. भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.
 3. सिंचनक्षेत्र, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
 4. पाणी पुरवठा योजनेचे पुर्नरज्जीवन करून पाणी पुरवठयात वाढ करणे.
 5. विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे.
 6. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.
 7. अस्तीत्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोत्राची पुर्नोजीव पाणी साठवण क्षमता वाढवणे.
 8. अस्तित्वातील जलस्त्रोत्रामधील गाळ लोकसहभागातून काढून पाणी साठा वाढवणे.
 9. वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देवुन वृक्ष लागवड करणे.
 10. पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव/जागृती निर्माण करणे
 11. शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
 12. पाणी अडवणे, जिरवणे बाबत लोकांना प्रोत्साहीत करणे, लोकसहभाग वाढवणे.
 • वेळु गावातील लोकसंख्या- 1,511 आहे.
 • गावाचे एकूण क्षेत्रफळ (हे)- 1,236.85
 • वहीती क्षेत्र (हे)- 798 
 • सरासरी पर्जन्यमान- 600 मि.मि.
 • प्राप्त पर्जन्यमान- 275 मि.मि.

जलयुक्त शिवार अभियान योजनेत निवड करते वेळी गावाचा पाण्याचा ताळेबंद:

 • गावातील पर्जन्यमान- 600 मि.मि.
 • गावातील पाऊसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी- 741.60 टी.सी.एम.
 • गावातील अडवलेले पाणी- 274.00  टी.सी.एम.
 • गावातील एकुण उपलब्ध पाणी- 1,387.10 टी.सी.एम.
 • गावासाठी लागणारे एकुण आवश्यक पाणी- 1,728.60 टी.सी.एम. (लोकसंख्या, जनावरे, पिके इत्यादी)
 • पाण्याच्या ताळेबंदानुसार पाण्याची तुट- 347.00 टी.सी.एम.

सदर योजनेतुन पाण्याची तुट भरुन काढण्यासाठी खालील प्रमाणे कामांचे नियोजन करण्यात आले होते.


वैशिष्ट्यपुर्ण कामे:

1) सदर गावाच्या पुर्वेस पाझर तलाव असुन त्याची सांडवा दुरुस्ती गावकर्‍यांनी लोकसहभागातून केली असुन त्यासाठी 5.80 लाख खर्च आलेला आहे. सदर सांडवा दुरुस्तीचा उपयोग गुरुत्वाकर्षणाने गावातील इतर चार पाझर तलावांमधे बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाणीसाठा वाढण्यास होणार आहे.
2) सदर गावात अस्तीत्वात असणार्‍या तीन पाझर तलावांची गळती काढण्याचे काम यांत्रिकी विभागामार्फत करण्यात आले. त्यातील सिओटी मधे वापरण्यात आलेला प्लास्टीक कागद गावकर्‍यांनी लोकसहभागातुन उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यासाठी 0.48 लाख खर्च आलेला आहे.
3) गावकर्‍यांनी लोकसहभागातुन पॉलीमर जाळीमध्ये 5 गॅबियन बंधार्‍याची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी 1.62 लाख खर्च करण्यात आला आहे.
4) गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे व शाळेच्या छतावरील पाणी एका ठिकाणी जमा करून बोअर वेल पूर्णभरण केले आहे.

लोकसहभागातुन/श्रमदातुन झालेली वैशिष्टपुर्ण कामे:

गावात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब शिवारात आडवण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामुळे गावामध्ये लोक जागृती झाली, गावामध्ये एकी वाढु लागली. तसेच दर रविवारी ग्रामस्थ, सातारा निवासी ग्रामस्थ सकाळी 7 ते 9 आज अखेर पर्यंत श्रमदान चालु आहे. त्यामधुन 3,307 मी. सि सि टी, 7,600 मी. डीप सि सि टी, 240 लुज बोल्डर, 6 गॅबियन बंधारे, 26 अर्दन स्ट्रक्चर, 2 माती नालाबांध, 6 शेततळी, 7,000 मी. नाला खोलीकरण, 151.70 हेक्टर मल्चिंग, 558 हेक्टर वरती रुंद सरी वरंभा पध्दत, 1,511 वृक्ष लागवड, 26.41 हेक्टर ठिबक सिंचन, 13 हेक्टर क्षेत्रावर तुषार सिंचन वापर इत्यादी कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या मधुन 230 टी सी एम पाणीसाठा लोकसभागातुन करण्यात आला आहे.

नाविण्यपुर्ण कामे:

 • सदर गावाने लोकसहभागातुन व राज्यसभा सदस्या मा. खासदार श्रीमती अनु आगा यांच्या खासदार फंडातुन 96 लाख रुपये व मा. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांचे मार्गदर्शनाखाली बेलेवाडी तलावातुन जादा वाहुन जाणारे पाणी 1,800 मीटर लांबीची पाईपलाईन खोदुन गुरुत्वाकर्षनाने चार पाझर तलावात पाणी साठवण्याचे काम सध्या पुर्णात्वाकडे आहे. सदर काम पुर्ण झाल्या नंतर वेळु गावातील संपुर्ण क्षेत्र बागायत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
 • कृषी विभागामार्फत या गावात 205 हेक्टर वर कंपार्टमेंट बंडिंग चे काम शेतकर्‍यांच्या शेतात करण्यात आले आहे. वर्ष 2016-17 हे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष होते व डाळ वर्गीय पिकांची टंचाई लक्षात घेता मा. जिल्हाधिकारी यांचे प्रेरणेतुन जिल्हा नियोजन विकास समिती यांचे निधीतुन बीडीएन-711 या तुरीच्या वाणाची लागवड करण्यासाठी जिल्ह्यात अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामधुन वेळु गावात 150 हेक्टर क्षेत्रावर बांधावर तुर लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा, तसेच जिल्ह्यातील कृषी, महसुल व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या उपस्थीतीत झाला.
 • राज्यसभा सदस्य माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. शरद पवार यांनी त्यांच्या खासदार निधीतुन 45 लाख निधी साखळी सिमेंट बंधार्‍या करीता मंजूर करुन देण्यात आला.

कामाचे दृष्य-अदृष्य परिणाम:

पाण्याचे दरडोई उपलब्धता: 
गावामध्ये पुर्वी झालेल्या कामातुन व जलयुक्त शिवार अभियानातुन झालेल्या कामातुन 347 टी सी एम पाणीसाठा करण्यात आलेला असुन गावकर्‍यांनी लोकसहभागातुन व श्रमदानातुन पाणी फौंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेमध्ये केलेल्या कामातुन साधरणत: 230 टी सी एम पाणीसाठा करण्यात आला आहे. असा मिळुन गावात एकुण 577 टी सी एम पाणीसाठा करण्यात आला असुन दरडोई 0.38 टी सी एम पाणी उपलब्ध झाले आहे.

टँकर/चारा छावणी (पुर्वीची/आताची परीस्थिती):
वेळु गावात दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी पासुनच टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु सध्या पडलेल्या पावसामुळे गावातील सर्व कामे पाण्याने पुर्ण भरलेली आहेत. अगदी गावाची पाणी पुरवठा विहरीची पाणी पातळी 2 मी वर आलेली आहे. त्यामुळे येथुन पुढे या गावात टँकरची आवश्यकता भासणार नाही.

विहीर पाण्याची पातळी:
या पुर्वी गावात पाऊसमान कमी असल्यामुळे व क्षेत्रीय उपचाराची कामे झालेली नसल्याने विहीरीची पाणीपातळी अत्यंत कमी 10 ते 12 मीटर होती. परंतु सध्या पाऊस पडल्यानंतर पाणी पातळी 3 ते 4 मीटर वर आलेली आहे.


पिक पध्दती:

गावातील प्रचलित पिक पध्दती व भविष्यात प्रकल्पानंतरची पिक पध्दती मागील प्रपत्रात दर्शवली असुन लोकांचा सोयाबीन, रब्बी ज्वारी, ऊस, घेवडा पिकाकडील कल कमी होवुन वाटाणा, भाजीपाला पिके, आले व फळबागा लागवड करण्याकडे कल वाढलेला आहे.

रोजगार निर्मीती/स्थलांतर:
यापुर्वी गावात सिंचन क्षेत्र कमी असल्यामुळे व अनियमीत पाऊसमानामुळे तरुणांचे रोजगारासाठी पुणे, मुंबई तसेच इतर शहरांकडे स्थलांतर होत असे. जलयुक्त शिवार अभियान योजनेची कामे झाल्यामुळे व समाधानकारक पावसामुळे गावातील सिंचन क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्यामुळे गावातच रोजगार उपलब्ध होत असल्याने व संभाव्य बदलणार्‍या पिक पध्दतीमुळे इथुन पुढे रोजगारासाठी स्थलांतर करण्याची आवश्यकता भासणार नाही.

संरक्षित सिंचन क्षेत्रातील वाढ:
यापुर्वीची गावातील सिंचन क्षेत्र 201 हेक्टर असुन गावात झालेल्या पाणीसाठ्यातुन व ठिबक व तुषार सिंचनाचे महत्व शेतकर्‍यांना पटल्यामुळे 350 ते 400 हेक्टर पर्यंत सिंचन क्षेत्रात वाढ होणे अपेक्षित आहे.

वहिताखालील वाढलेले क्षेत्र:
गावातील सध्याचे वहिताखालील क्षेत्र 798 हेक्टर आहे. गावात झालेल्या क्षेत्र उपचारामुळे लोकांचा वहित क्षेत्रात वाढ करण्याकडे कल वाढला आहे. गावात झालेला पाणीसाठा व पिक पध्दतीत होणारे बदल विचारात घेवुन तरुण पिढी शेतीकडे उद्योग म्हणुन पाहु लागली आहे. त्यामुळे वहित क्षेत्रामधे 900 ते 950 हेक्टर वाढ होणे अपेक्षीत आहे.

सामाजिक/आर्थिक/सांस्कृतीक परिणाम:
यापुर्वी गावातील राजकीय मतभेदामुळे विकासाच्या प्रत्येक कामात अडथळा येत असे. कोणत्याही सामाजिक कामात लोकसहभाग अथवा श्रमदानास प्रतिसाद म्हणावा असा मिळत नव्हता. जलयुक्त शिवार अभियान योजनेत लोकांना श्रमदानाचे व लोकसहभागाचे महत्व पटवुन दिल्यामुळे जागृती झालेली आहे. तसेच गावातील सातारा रहिवासी ग्रामस्थ यांचे मार्फत लोकसहभागात सक्रीय सहभाग दाखवण्यात आल्यामुळे गावातील ग्रामस्थ गट तट राजकारण विसरुन एकत्र आले. त्यामुळे लोकसहभागातुन तसेच शासकीय यंत्रणेचे किंबहुना जास्त काम पाणी फौंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतल्यामुळे झाले आहे.

शासकीय यंत्रणे मार्फत व लोकसहभागातुन निर्माण झालेल्या पाणीसाठाच्या जोरावर शेतीसाठी पाणी देण्याच्या पध्दतीत बदल करुन पाण्याचा काटकसरीने वापर करुन आर्थिक जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातुन वेळु गाव वाटचाल करीत आहे.

वाढत्या लोकसहभागामुळे या गावास तत्कालीन मा. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा मा. जितेंद्र शिंदे, उपविभागीय अधिकारी कोरेगाव श्री. अजय पवार, तहसिलदार कोरेगाव श्री. जोगेंद्र कटारे, यांनी वेळो वेळी भेटी देवुन मार्गदर्शन केले. या सर्व कामासाठी व गावकर्‍यांचा लोकसहभाग वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. अविनाश पोळ, तालुका कृषी अधिकारी श्री. सुनिल साळुंखे, मंडल कृषी अधिकारी रहिमतपुर श्री. ज्ञानदेव जाधव, कृषी सहाय्यक वेळु सौ. वैशाली सुतार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

लेखक: 
श्री. ज्ञानदेव जाधव
(मंडल कृषी अधिकारी, रहिमतपुर) 
सौ. वैशाली सुतार
(कृषी सहाय्यक, वेळू)

Velu वेळू जलयुक्त शिवार jalyukta shivar पाणी फौंडेशन वॉटर कप water cup Paani Foundation drought दुष्काळ कोरेगाव koregaon
English Summary: Jalyukta Velu Village

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.