1. यशकथा

जलनायक महूदकर

KJ Staff
KJ Staff
कासाळ ओढा

कासाळ ओढा

जलनायक म्हटलं, की एखादी व्यक्ती डोळ्यापुढं उभी राहते. पण अख्खं गाव जलनायक बनलयं. आश्‍चर्य वाटलं ना तुम्हाला? पण हो ! दुष्काळाच्या झळांमधून मुक्ती मिळवण्यासाठी सोळा हजार लोकसंख्येच्या महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानातून कासाळ ओढ्याचे पुनर्जीवन केले. त्यातून गावाच्या अर्थकारणाला चालना मिळाली. याच गावानं केंद्र सरकारच्या नॅशनल वॉटर अ‍ॅवॉर्ड वर आपलं नाव कोरलं. याच गावाची ही यशोगाथा....

पाणी कमविण्यासाठी आणि शेती उर्जितावस्थेत आणण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांमधून प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे. त्यामध्ये महूद गाव अग्रेसर राहिले. पंढरपूरपासून कराड रस्त्यावर पंचवीस किलोमीटर अंतरावरील हे गाव कासाळ ओढ्याच्या काठावर वसलयं. राजकारणाचा गावगाडा इथंही हाकला जातोय. पण एकदा निवडणूक संपली, की राजकीय मतभेदांना इथं थारा दिला जात नाही. शिक्षणातून सेवा, नोकरी, व्यापार, उद्योगात करिअर केले जात असले, तरीही बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.

25 खेड्यांची ही बाजारपेठ दुष्काळाने बेजार झाली होती. जगणं मुश्कील होत चाललं होतं. 4 हजार 547 हेक्टरचे भौगोलिक क्षेत्र असलेल्या गावाच्या शिवारात 4 हजार 58 हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. त्यापैकी सर्वाधिक सव्वा चारशे हेक्टरवर डाळिंबाची बाग शेतकर्‍यांनी उभी केली. अगोदरच तेलकट डागानं शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळालेले असताना पाण्याच्या टंचाईने शेतकरी जर्जर झाले होते. अशावेळी नेमकं काय करायचं? या प्रश्‍नानं ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले होते. पाण्याच्या प्रश्‍नावर मात करत पाणी कमवण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत स्वतःचे स्थान असलेल्या डाळिंबाच्या माध्यमातून फलोत्पादनात क्रांती करण्याचा निर्णय गावाने घेतला. जलयुक्त शिवार अभियानात गावाची निवड झाली. प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणी मिळत असले, तरीही पाणी पुरत नव्हते. त्यामुळे ओढ्यातल्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढवून गावाबरोबरच शेतीच्या पाण्याचा ताण हलका होऊ शकेल असा आत्मविश्‍वास ग्रामस्थांमध्ये दुणावला.

ग्रामपंचायतीच्या बैठकींमधून त्यावर चर्चा होत राहिली. सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, सदस्य अ‍ॅड. धनंजय मेटकरी, ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पुढाकार घेत जलयुक्त शिवार अभियानातून गावच्या जगण्याचा श्‍वास असलेल्या कासाळ ओढ्याच्या पुनर्जीवनाची सुरवात करण्याचा निर्णय घेतला. सोलापूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी रणजित कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने, पंढरपूरचे तत्कालिन उपविभागीय कृषी अधिकारी शिवराज ताटे, सांगोल्याचे तत्कालिन तहसिलदार श्रीकांत पाटील आदींच्या माध्यमातून यंत्रणांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न फलद्रुप झाला.

सांगोल्याचे तत्कालिन तहसिलदार श्रीकांत पाटील कामाला सुरवात करताना

सांगोल्याचे तत्कालिन तहसिलदार श्रीकांत पाटील कामाला सुरवात करताना

मुंबईच्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी फंड आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मिळण्याचा मार्ग सुककर झाला. यंत्रणांकडून निधी उपलब्ध होण्याच्यापूर्वी पुनर्जीवन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या पाचव्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. खरे म्हणजे, पाच किलोमीटरच्या कामासाठी पैसे पुरेसे उपलब्ध होतील काय या प्रश्‍नाची पर्वा न करता काम पूर्ण करण्याच्या जिद्दीने ग्रामस्थांनी दिवस वाटून घेत जेसीबी यंत्राच्या सहाय्याने गाळ उपसण्यास सुरवात केली.

शाश्‍वत पाणी शेतकर्‍यांना वाटले मोलाचे

ओढ्याच्या पाच किलोमीटरच्या पुनर्जीवनासाठी नेमका किती खर्च येऊ शकतो याचे अंदाजपत्रक ग्रामस्थांनी तयार करुन घेतले. त्यानुसार प्राथमिक अंदाज 88 लाखांपर्यंत पोचला होता. एवढा मोठा खर्च करणे हे गावाच्या दृष्टीने दिव्य होते. ग्रामपंचायतीचे उत्पन्न तेवढे नसल्याने आता काय करायचे असा प्रश्‍न तयार होणे स्वाभाविक होते. मात्र कसल्याही परिस्थितीत काम पूर्ण करायचे अशी इर्षा तयार झाल्याने सुरु असलेल्या कामाची पाहणी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष संजीव पाटील यांनी पाहणी केली. तिसर्‍या दिवशी त्यांनी अडीच लाखांची मदत पोच केली. इथं उत्साह दुणावला.

सहा जेसीबीच्या सहाय्याने उपसण्यात येत असलेला गाळ 30 ट्रॅक्टर आणि 20 टिपरच्या सहाय्याने शेतकरी शेतात नेऊन टाकत होते. कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनातून दिलेला त्यातील एक जेसीबी होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने एक जेसीबी उपलब्ध करुन दिला होता. हे सारे काम सुरु असताना संघटीत कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक राजेंद्र वाघमारे, कृषी विभागाचे अधिकारी शशिकांत महामुनी, संतोष चौधरी यांचे सहकार्य लाभले. गावातून कामासाठी लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात झाली. अक्षरशः घरातील कार्य असल्यागत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या जोडीलाच अंकुश चव्हाण, दत्ता आसबे, दादासाहेब कांबळे, सुभाष ढाळे, धिरज जाधव, कैलास खबाले, संतोष खडतरे, जयवंत नागणे, गोविंद नागणे, बाळासाहेब बाजारे आदींनी लोकवर्गणी जमा करण्यात पुढाकार घेतला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, गावच्या जत्रेसाठी दोन लाखभर वर्गणी जमा होणे मुश्कील असलेल्या याच गावात दहा लाखांची लोकवर्गणी जमा झाली.  

प्राथमिक-माध्यमिक विद्यार्थी, शिक्षक, कृषी निविष्ठा विक्रेेते, औषध दुकानदार, सराफ असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक, गावातील पण इतर गावात नोकरीसाठी असलेले अशा सार्‍यांनी लोकवर्गणी देण्यात आपला सहभाग नोंदवला. पावसाळ्याच्या तोंडावर काम पूर्ण व्हावे म्हणून पोकलॅन ओढ्यात उतरवण्यात आलेत. शेतीसाठी उपयुक्त नसलेली माती ओढ्याच्या दोन्ही काठांवर बांधाच्या स्वरुपात रचण्यास सुरवात झाली. त्यासाठी ओढ्याची हद्द निश्‍चित केली गेली. मुळातच, विकासाच्या कुठल्याही कामात त्याच्याशी निगडीत असलेल्या लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे ओढ्यात अतिक्रमण केलेल्या शेतकर्‍यांचे अतिक्रमण काढण्यासाठी विरोध होईल, अशी शाशंकता यंत्रणांमध्ये होती. घडले मात्र निराळेच.

डॉ. राजेंद्रसिंह राणा वृक्षारोपणावेळी

डॉ. राजेंद्रसिंह राणा वृक्षारोपणावेळी

जमिनीच्या तुकड्यापेक्षाही शाश्‍वत पाणी लाखमोलाचे आहे असे म्हणत, ओढ्याच्या काठावरील शेतकर्‍यांनी अतिक्रमण काढण्यास स्वतःहून परवानगी दिली. नव्हे, तर पोकलॅनद्वारे गाळ उपसत असताना अतिक्रमण काढले जात असताना विरोधासाठी एकाही शेतकर्‍याने प्रतिकार केला नाही. लोकसहभागाला लाभलेली ही सोनेरी किनार गावाच्या वैभवात भर टाकणारी ठरलीय. 35 लाखांमध्ये 5 किलोमीटर लांब, 40 मीटर रुंद, दीड ते दोन मीटर खोल इतके मोठे काम पूर्ण झाले.      

सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार डॉ. गणपतराव देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेच्या तत्कालिन अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार दत्तात्रेय सावंत, माजी आमदार दीपक साळुंखे, तत्कालिन उपजिल्हाधिकारी दिनेश भालेराव अशा अनेकांनी ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. हे ओढ्याचे नव्हे, तर नदीचे पुनरुज्जीवन झालं आहे अशा शब्दांमध्ये अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया नोंदवली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यात ग्रामस्थांनी भेट घेतल्यावर लोकसहभागाचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते कामाचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी आणखी एकदा गावाला भेट देत फलोत्पादन कामांची सुरवात केली. पाण्याच्या उपश्याऐवजी संचयाला शास्त्रीयदृष्ट्या ग्रामस्थांनी दिलेल्या महत्वाबद्दल डॉ. सिंह यांनी ग्रामस्थांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

टाटा ट्रस्टचे मोठे योगदान

महूदकरांनी आपले काम चोख बजावले. पण कासाळ ओढ्याच्या उगमस्थानापासून ते चंद्रभागा नदीमध्ये मिसळणार्‍या शेळवे गावापर्यंत पुनर्जीवनाचे काम व्हायला हवे, असे डॉ. राजेंद्र सिंह यांनी लोकार्पण सोहळ्यात बजावले होते. लोकसहभागाच्या महूद पॅटर्न चे यश पाहून पहिल्यांदा कासाळ ओढ्याच्या उगमस्थानावरील कटफळ (ता, सांगोला) येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकसहभागातून पुनर्जीवनाचे काम सुरु केले. मग महूद गावाशेजारील कोळेगावच्या (ता. माळशिरस) ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुनर्जीवनाचा श्रीगणेशा केला. ही सारी कामे उभी राहत असतानाच देशातील पाण्यावर काम करणार्‍या कार्यकर्त्यांना डॉ. राजेंद्र सिंह यांनी देशाची राजधानी दिल्लीत एकत्रित आणले होते. या कार्यक्रमात सहभागी होत असताना महूदकरांनी कासाळ ओढ्याच्या सांगोला, माळशिरस, पंढरपूर या तीन तालुक्यातील 42 किलोमीटरच्या कामासाठी सहकार्य मिळण्याविषयीचे साकडे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घालण्यात आले. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. राजेंद्र सिंह यांनी महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्पाला सहकार्य करण्याविषयीचे पत्र लिहिले होते.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आणि टाटा ट्रस्टने कासाळ ओढ्याच्या 23 गावातील 42 किलोमीटरच्या पुनर्जीवनासाठी सहा कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून आतापर्यंत जवळपास 27 किलोमीटर पुनर्जीवनाचे काम पूर्ण झाले असून यंदाच्या दुष्काळात उरलेले सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन टाटा ट्रस्टने कासाळ ओढा पुनर्जीवन संसदेच्या माध्यमातून केले आहे. म्हणजेच काय, तर लोकसहभागातून विकासाचे महूद गावात लावलेल्या ओढा पुनर्जीवन कामाच्या विस्तारात टाटा ट्रस्टने मोठे योगदान दिल्याचे आपणाला दिसून येईल.

मुंबईत टाटा ट्रस्ट समवेत झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या करारावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महूदच्या सरपंच आणि उपसरपंचांना निमंत्रित केले. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनाही यावेळी ग्रामस्थांनी लोकसहभागातील कामाची माहिती दिली. कासाळ ओढा पुनर्जीवनाचे काम होत असलेल्या 3 तालुक्यातील 23 गावांमधील लोकसंख्या आहे, 76 हजार 296. त्याचे भौगोलिक क्षेत्र 36 हजार 274 हेक्टर इतके असून 1 हजार 353 हेक्टर वनक्षेत्र आहे. 11 हजार 77 हेक्टर कोरडवाहू क्षेत्र आहे. एकुण 28 लाख 38 हजार 679 घनमीटर गाळ उपसला जाणार असून गाळामुळे नव्याने 473 हेक्टरहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. त्यावरुन गावांच्या अर्थकारणाला शेतीच्या माध्यमातून कशी चालना मिळणार आहे याचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही. पंढरपूरचे आताचे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे हे निरनिराळ्या योजना या भागामध्ये पोचवण्यासाठी विशेष सहभाग देतात. 

राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित

मॉडेल व्हिलेजच्या दिशेने वाटचाल

लोकसहभागातून विकासाची एकामागून एक कामे होताहेत म्हटल्यावर आता पुढे काय, असा प्रश्‍न स्वाभाविकपणे तयार होतो. याच अनुषंगाने आनंदभावाने सांगायला हवे ते म्हणजे, महूदकरांनी मॉडेल व्हिलेजच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावात सार्वजनिक कामाची चळवळ उभी राहूच शकत नाही या पारंपारिक गैरसमजाला महूदकरांनी छेद दिला आहे. गावच्या पिण्याच्या पाण्याचा संकट टाळण्यात यश मिळाले.

भूजल पातळीत वाढ झाल्याने डाळिंबाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शाश्‍वत पाणी उपलब्ध होऊ लागल्याने पीक पद्धतीत बदल दिसू लागले आहेत. विहीर, बोअर पुनर्भरणापासून ते छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यापर्यंतच्या विविध प्रयत्नांना चालना मिळू लागली आहे. त्यामुळे चार पैसे मिळवून देणार्‍या भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. भविष्यात एरिआ ट्रीटमेंट, ओढ्याच्या दोन्ही काठांवर वृक्षारोपण करत टुरिझम स्पॉटची निर्मिती करणे अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे, फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शीतसाखळी उभी करत थेट डाळिंब दिल्लीच्या बाजारपेठेत नेण्याबरोबर प्रक्रिया उद्योग उभारणीचे काम शेतकर्‍यांनी हाती घेतले आहे.

कृषी संचालक प्रल्हाद पोकळे, पुण्याचे कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी यासंबंधाने नेमके काय करता येईल यासाठी गावात येऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही ग्रामस्थांना प्रोत्साहित केले आहे. मुळातच, जीवन म्हणजे जल इतके महत्वाचे स्थान असलेल्या पाण्याच्या संरक्षणात योगदान दिल्याबद्दल केंद्र सरकारतर्फे देशातील एक क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणून महूद गावाचा नॅशनल वॉटर अ‍ॅवॉर्डने दिल्लीत सन्मान करण्यात आला.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सन्मान ग्रामस्थांनी स्विकारला. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या निधीतून एवढं मोठं काम उभारल्याची ग्रामस्थांनी देताच, श्री. गडकरी यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

सामाजिक एकोप्याचे दर्शन

जलसंचयासाठी भलं मोठं नैसर्गिक भांडं तयार झालं. वरुणराजा हुलकावण्या देत राहिला. त्यामुळे पाण्याचे काय होणार अशी चिंता सार्‍यांना लागली. पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी याच ओढ्यात सामुहिक नमाजपठण करत पावसासाठी अल्लाला साकडे घातले. सामाजिक एकोप्याचे कोंदण त्यातून लोकसहभागातील चळवळीला मिळाले.

लेखक: 
श्री. दिपक धोकटे
(महूद, सोलापूर)

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters