देशातील शेतकरी बांधव काळाच्या ओघात शेतीमध्ये रोजाना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यामुळे त्यांना विशेष फायदा देखील होत आहे. शेती क्षेत्रात नवनवीन बदल आत्मसात करण्यासाठी आता शेतकरी राजा देखील पुढे सरसावला आहे, यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. शेती क्षेत्रात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानपैकीच एक आहे पॉलिहाऊस शेती.
देशात आता हळूहळू का होईना पॉलिहाऊस शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघितले जात आहे. पॉली हाउस पद्धतीने शेती केल्यास शेतकरी बांधवांना दुप्पट नफा देखील मिळत असल्याचे सांगितले जात आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मौजे मुखइ अजय साहेबराव येवले यांनी देखील शेती क्षेत्रात बदल स्वीकारला आहे. या शेतकऱ्याने 2007 साली पॉलिहाऊस पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला या शेतकऱ्याने पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने केवळ दहा गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. त्या वेळी दहा गुंठे क्षेत्रात अजय यांनी गुलाबाची शेती करण्यास सुरवात केली होती. पॉलिहाऊस पद्धतीने शेती केल्यामुळे अजय यांच्या उत्पन्नात भर पडली, म्हणून पॉलिहाऊस शेती हळूहळू त्यांनी वाढवली आणि आजच्या घडीला अजय तब्बल 91 गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस पद्धतीने शेती करीत आहेत.
अजय फार पूर्वीपासून ऊस या नगदी पिकाची लागवड करत. मात्र या पिकातून अजय यांना अपेक्षित असा लाभ मिळत नसल्याने शेतीमध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे असे त्यांना वाटत. यामुळे त्यांनी शेती क्षेत्रात आधुनिकतेची कास धरण्याचा निश्चय केला या अनुषंगाने त्यांनी पॉली हाउस पद्धतीच्या शेतीविषयी सखोल अभ्यास केला. आपल्या चौकस बुद्धीने अजय यांनी पॉलिहाऊस शेतीबिषयी संपूर्ण ज्ञान मिळवले आणि पॉलिहाऊस पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला अजय यांच्याकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांनी दहा गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस उभारण्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली. बँकेकडून कर्ज प्राप्त करून अजय यांनी दहा गुंठे पॉलिहाऊस शेतात गुलाबाची यशस्वी शेती करून दाखवली. त्यावेळी शिरूर तालुक्यात पॉलिहाऊस पद्धतीने शेती करणारे अजय एकमेव शेतकरी होते असा त्यांचा दावा आहे.
अजय यांनी पॉलीहाऊस मध्ये यशस्वीरित्या गुलाबाचे उत्पादन घेतल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी देखील अजय यांच्या प्रेरणेतून पॉलिहाऊस शेती करीत गुलाब आणि जेरबरा उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे.
अजय यांचे सुरुवातीला दहा गुंठे क्षेत्रात असलेले पॉलिहाऊस सध्या 91 गुंठे क्षेत्रात आहे. मध्यंतरी नोट बंदीच्या काळात अजय यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यावेळी त्यांच्याकडे बँकेचे कर्ज फेडण्यासाठी देखील पैसे उपलब्ध नव्हते. मात्र त्यानंतर पॉलिहाऊस शेतीमध्ये त्यांना चांगला नफा मिळाला मग त्यांनी वन टाइम सेटलमेंट करत बँकेचे कर्ज फेडले. दोन वर्षापुर्वी देखील कोरोणाच्या काळात त्यांना पॉलिहाऊस शेती मध्ये तोटा सहन करावा लागला.
मात्र सद्यस्थितीत पॉलिहाऊस शेती अजय यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. कोरोना काळातच या यांना उत्पादन खर्चात निम्म्याने कपात करावी लागली होती. सद्यस्थितीत अजय यांनी आपल्या पॉलिहाऊस शेती साठी 14 कुटुंबांना रोजगार दिला आहे. पॉलिहाऊस सांभाळण्यासाठी त्यांना महिन्याला एक ते दीड लाख रुपये खर्च लागतो. एवढा मोठा खर्च वजा जाता त्यांना महिन्याकाठी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. अजय यांनी उत्पादित केलेले गुलाबाची फुले पुण्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात.
पॉलीहाउस शेतीमध्ये शेतमालाचा दर्जा चांगला असल्याने अजयच्या गुलाबाच्या फुलाला चांगला बाजारभाव मिळतो. ज्यावेळी गुलाबाच्या फुलाला मागणी कमी असते त्यावेळी अजय गुलाबाचे फुल कोल्डस्टोरेज मध्ये स्टोअर करतात आणि जेव्हा बाजार भाव चांगला असतो त्या वेळी त्याची विक्री करतात. एकंदरीत पॉलिहाऊस शेती अजय यांना फायदेशीर ठरत आहे. उसाच्या शेतीपेक्षा देखील अधिक नफा पॉलीहाऊस गुलाब शेतीमधून प्राप्त होत आहे. पॉलिहाऊस शेती साठी महाराष्ट्र शासन तब्बल 50 टक्के अनुदान देखील देत असते.
Share your comments