शेती विकायची नसते तर शेती राखायची असते कदाचित आपणही हा मुळशी पिक्चरचा डायलॉग ऐकला असेल. अगदी पिक्चर मधल्या ह्याच डायलॉग प्रमाणे बिहारमधल्या एका शेतकऱ्याने शेतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अलीकडे अनेक नवयुवकांचा शेती संबंधी दृष्टिकोन बदलत चालला असून शेती हा केवळ तोट्यातला व्यवसाय आहे असा गैरसमज वाढत चालला आहे.
यामुळे अनेक नवयुवक शेती करण्याऐवजी नोकरी करण्यास विशेष प्राधान्य देतात. मात्र, बिहार मधला एक अवलिया शेतकरी आपली विदेशातली नोकरी सोडून आपल्या गावी परतला असून आपल्या वडिलोपार्जित शेतीत पपई पिकाची शेती करून वार्षिक तब्बल दहा लाख रुपये उत्पन्न काढत आहे. आज आपण याच अवलिया विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया.
बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यात हतुआ तहसीलच्या लाईन बाजार या ठिकाणी वास्तव्यास असलेले अश्रफ अली यांनी पपईच्या 500 झाडातून तब्बल दहा लाख रुपये कमाई करण्याची किमया साधली आहे. अली यांच्या या शेती क्षेत्रातल्या वाखाण्याजोगे यशामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांच्याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. मित्रांनो असरफ अली पपईच्या शेतीतून वार्षिक दहा लाख रुपये उत्पन्न कमवीत आहेत.
अली यांचे हे यश बघता आता त्यांच्या गावातील अनेक शेतकरी बांधव पपई शेतीकडे वळले असून आपले नसीब आजमावून बघत आहेत. नोकरीनिमित्त आश्रफ सौदी अरेबिया मध्ये वास्तव्यास होते. मात्र माय भूमी सोडून कर्मभूमीत अश्रफ यांचे मन काही रमेना त्यामुळे त्यांनी आपल्या मायदेशी परतण्याचे ठरवले आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वदेश गाठला. भारतात आपल्या गावी परतल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न अश्रफ यांच्या मनात घोंगावत होता.
असं असतानाच त्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळण्याचे ठरवले आणि त्या हेतूने त्यांनी पपईची शेती करण्याचा निर्धार केला. त्यांनी पपईचे पाचशे झाडे लावली. या 500 झाडातून त्यांना सुमारे साडेचारशे क्विंटल पपईचे उत्पादन झाले.
सौदी मध्ये सुपरवायजर म्हणुन काम- असरफ विवाह बंधनात अडकल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच वयाच्या 25व्या वर्षी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सौदी अरेबियाला नोकरी करण्यासाठी गेले. 1992 सौदी मध्ये त्यांना एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी देखील मिळाली. सौदीमध्ये त्यांना सुमारे 80 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र त्यांचे मन आपल्या मायभूमीत अटकलेले असल्याने त्यांना कर्मभुमीत करमत नव्हते आणि आपल्या गावाकडे जाऊन काहीतरी नवीन करावे अशी इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती.
करार पद्धतीने जमीन घेतली आणि शेतीची पायाभरणी केली- सौदीमध्ये तीस वर्षे राहिल्यानंतर 2017 मध्ये शेवटी त्यांनी सौदीला टाटा बाय-बाय म्हणत भारत गाठला. घरी परतल्यानंतर त्यांना त्यांच्या एका मित्राने पपईची शेती करण्याचा सल्ला दिला. यामुळे अश्रफ यांनी 8500 रुपये वार्षिक देऊन अर्धा एकर जमीन भाडे तत्वावर घेतली. सुरुवातीला अश्रफ यांनी नासिक मधुन पपईचे बियाणे मागवले. मात्र, हे बियाणे काही कारणास्तव उगलेच नाही.
मग त्यांनी त्यांच्या राज्यातील कृषी विभागाकडे याबाबत माहिती मागितली. कृषी विभागाने त्यांना अनमोल सहकार्य दिले आणि पपईचे पाचशे रोपे देखील दिलीत. अश्रफ यांनी ही 500 झाडे लावलीत. अश्रफ यांच्या शेती करण्याच्या निर्णयामुळे अनेक लोक त्यांना चिडवत असत. अनेक लोक त्यांचा शेती करण्याचा प्रयोग फसणार असल्याचे बोलत असतं. मात्र अश्रफ यांनी लोकांचे बोलणे मनावर न घेता अहोरात्र काबाडकष्ट करून पपईची शेती यशस्वी करून दाखवली.
असरफ अली म्हणतात की, 'मी बराच काळ परदेशात काम केले असले तरी पण आज जी प्रसन्नता मिळत आहे, ती 80-90 हजारांच्या पगारात विदेशात राहून मिळत नव्हती. आज मी गावाकडे आपल्या स्वदेशात राहून 10 लाख कमवत आहे आणि विशेष म्हणजे माझ्या कुटुंबासोबत राहत आहे. गावाकडे शेती करून मी दोन मुल आणि एका मुलीचा विवाह थाटात संपन्न केला. मुलांसाठीही दुकाने उघडण्यात दिली, जेणेकरून प्रत्येकाला रोजगार मिळेल. मी हे सर्व माझ्या मातीत माझ्या कुटुंबासोबत राहून केले'.
संबंधित बातम्या:-
शेतकरी पुत्राची कमाल! कसा एका शेतकऱ्याचा पोरगा अरबपती होतो? वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा
शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग! ड्रॅगन फ्रुटचे घेतले यशस्वी उत्पादन; लाखो रुपये उत्पन्नाची आशा
Share your comments