हुमणी किड व्यवस्थापन

Saturday, 14 July 2018 11:05 AM


सध्या मराठवाडयामधील सर्व जिल्हयात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी हुमणीचे सुप्त अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहेत. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडांवर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडांवर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. अंडयातून निघालेल्या अळया पिकांना नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्या अगोदरच झाल्यामुळे अंळी पासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते, त्‍याकरिता पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

हुमणीचा प्रौढ भुंगा

हुमणीचा प्रौढ भुंगा


प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन :

झाडाच्या फांद्या हलवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा चांगला पाऊस पडताच सूर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी. झाडावर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेले भुंगेरे संध्या. ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या हालवून खाली पडावेत आणि ते हाताने गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा, हा उपाय प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.

  • प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुन देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहिरी जवळ किंवा झाडावर लावावेत. सापळ्यात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी ७.३० ते ८.३० या कालावधीत लावावेत.

  • किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुलिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांद्यावरील पाने खाल्यामुळे मरून जातील.

  • जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुलिंब इत्यादी. झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडांची पाने खाल्लेली आढळल्यास क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी, फवारणीनंतर १५ दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ देऊ नयेत.  

अळीचे व्यवस्थापन :

ज्या क्षेत्रामध्ये मागील २ वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, अशा क्षेत्रात पेरणी करताना जमिनीतून जैविक परोपजीवी बुरशी मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा प्रती हेक्टर १० किलो या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावे.

वरीलप्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेरे व अळयांचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन कृषी किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व क्रॉपसॅप प्रकल्पाचे डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजर व डॉ. कृष्णा अंभुरे यांनी केले आहे.

white grub हुमणी Cropsap Project क्रॉपसॅप वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani pest किडी

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.