फायदेशीर रायझोबिअम जिवाणू खत

05 July 2019 08:14 AM


सध्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. या खतांच्या अति वापरामुळे त्यांचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे. त्यात सजीवांची हानी त्याच बरोबर पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्याच प्रमाणे या रासायनिक खतांचा दर दिवसेंदिवस वाढतच जात आहे व ऐनवेळेला पडणारा यांचा तुटवडा व यामुळे शेतकर्‍यांची होणारी घुसमट होताने दिसून येत आहे.या गोष्टींना पर्याय म्हणून रायझोबिअम जिवाणू या जैविक घटकाचा वापर येथे शेतकर्‍यांच्या हिताचा ठरेल. जमिनीमधे नायट्रोजनच्या स्थिरीकरण होण्यामध्ये या जीवाणूचा महत्त्वाचा वाटा आहे. हे जिवाणू वनस्पतीच्या मुळावरील गाठींमधे हवेतील नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात.

वनस्पती शिवाय एकट्याने या जिवाणूंना नत्र स्थिर करण्यास मदत होत नाही. यामुळेच त्यांना सहजीवी जिवाणू असे संबोधले जाते. साधारणतः हे रायझोबिअम चे जिवाणू कडधान्य वर्गातील पिकांच्या बियाणांवर चोळतात. जेव्हा आपण हे बी जमिनीमध्ये पेरतो तेव्हा ते उगवल्यावर बियाण्यावरील लावलेले जिवाणू खुप मोठ्या प्रमाणात बियाभोवती तयार होऊन, रोपांवर मुळे तयार झाल्यावर मुळ्यांच्या लहान उपमुळांद्वारे आत प्रवेश घेतात व मुळांवर गाठी तयार करतात. या तयार झालेल्या गाठीमधे जिवाणू हे असंख्य प्रमाणात वाढत जातात व त्याचबरोबर नायट्रोजन या विकाराच्या मदतीने हवे मधील मुक्त नत्र स्थिर करण्याचे काम करतात.

या जिवाणूमुळे मुळावरच्या गाठी मोठ्या आकाराच्या व लेगहेमोग्लोबीनमुळे गुलाबी दिसतात. या गाठीमधे नत्र स्थिर करण्याची क्षमता ही जास्त प्रमाणात राहते. जसे जसे पिक फुलोर्‍यामधे येते, तसे तसे या गाठीमधे वाढ होत जाते व त्यांचा आकारही वाढतो. धैंचा, ताग, गवार त्याचप्रमाणे कडधान्य वर्गातील हिरवळीच्या खतामध्ये हेच तत्व वापरले जातात. म्हणुनच ही पिके फुलोर्‍या अवस्थेत आल्यावर तशीच जमिनीमध्ये पुरून टाकतात. त्यामुळे अधिक प्रमाणात हिरवळीच्या खतापासुन नत्र मिळण्यास मदत होते. या जिवाणू मधील खास गोष्ट अशी आहे कि यामधे वापराच्या दृष्टीने सात गट तयार केलेले आहेत.

एका गटातील जिवाणू दुसर्‍या गटाच्या पिकांना उपयोगी पडत नाहीत. एका खास गटातील जिवाणू दुसर्‍या खास गटाच्या पिकांना वापरल्यास फायदा होतो त्यामुळे रायझोबिअम जिवाणू वापरात घेत असता ते कोणत्या गटात मोडतात याची शहानिशा (खात्री) करून घेणे गरजेचे आहे.

रायझोबिअम जिवाणूचे सात गट व त्या गटात मोडणारी पिके:

 • चवळी गट पिके- भुईमूग, ताग, धैंचा, उडीद, तुर, मुग, मटकी, वाल व चवळी
 • घेवडा- घेवडा गट
 • वाटाणा- वाटाणा गट
 • सोयाबीन- सोयाबीन गट
 • मेथी, लसूण व घास- अल्फाल्फा गट
 • हरभरा- हरभरा गट
 • बरसीम घास- बरसीम गट

वर दिलेल्या रायझोबिअम व त्यांच्या गटानुसार जर जिवाणू खतांची 250 ग्रॅम मात्रा प्रती दहा किलो बियाला 1 तास पेरणीपूर्वी लाऊन पेरणी केल्यास कडधान्य वर्गातील पिकामध्ये कार्यक्षम पद्धतीने नत्रांचे स्थिरीकरण होऊन पिकाला उपयुक्त नत्र खताच्या प्रमाणात 25 टक्के मात्रा कमी होते. विविध पिकांमधे या रायझोबिअम जिवाणूंची नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता ही विविध प्रकारची असते.

 • रायझोबिअम जिवाणू बियाण्याला चोळल्यानंतर आपण ते बी जमिनीत लावतो. जर जमीन ओलसर असेल तर हे जिवाणू बियाणांच्या सभोवताली थोड्या दिवसांसाठी वनस्पतीच्या कुजलेल्या खतांवर जिवंत राहतात.
 • बियांपासून त्याचे रोपात रुपांतर होते तेव्हा हे जीवाणू त्या मुळांच्याभोवती एकत्र होतात, कारण या रोपांची मुळे काही प्रमाणात साखर, जीवनसत्वे, सेंद्रिय आम्ले व वाढवर्धक पदार्थ जमिनीमधे सोडतात.
 • पिकांच्या मुळाने जमिनीत सोडलेल्या वेगवेगळ्या पदार्थावर रायझोबिअम हे जिवाणू खुप योग्य प्रकारे वाढतात त्यामुळे हे जिवाणू मुळाजवळच्या मातीमध्ये जास्त प्रमाणात एकत्र येउन वाढतात.
 • पिकांची मुळे वरील द्रव्याप्रमाणेच ट्रिप्टोफॅन नावाचा द्रव्य बाहेर सोडतात, तो द्रव कालांतराने इंन्डोल अ‍ॅसिडमधे बदलतो. त्या द्रवामुळे मुळांवरती विकृती निर्माण होते व मुळे वाकतात तर काही वेळा गोळा होतात.
 • जिवाणू पेशी सुद्धा पाण्यात विरघळणारे विशिष्ट पॉलीशर्कराइड मुळांजवळ सोडतात. मुळांच्या पेशीमधुन नंतर ते गाभ्यापर्यंत पोहोचतात व त्यामुळे काही (पॉलीगॅलॅक्टोनेज) विकार तेथे तयार होतात.
 • वरीलपैकी संप्रेरके व वाढवर्धक पदार्थांच्या उत्सर्जनामुळे मुळाशी त्वच्या मलुल पडते व दोन पेशी मधला भाग विद्राव्य होतो व वापरलेल्या रायझोबिअम जिवाणूंच्या पेशी मुळामधे प्रवेश करतात. हा प्रवेश एखाद्या धाग्याप्रमाणे एकलगट असतो. एकापेक्षा अनेक प्रवेशिका एकाच मुळावर असल्यामुळे त्यावर अनेक गाठी निर्माण होतात.
 • मुळामधे गेलेला रायझोबिअम जिवाणुंच्या दोरीप्रमाणे हा धागा तुटतो व त्यामधून असंख्य रायझोबिअम पेशी बाहेर पडतात. यामुळे मुळाच्या आतील पेशी वाढतात व मुळावर गाठी येतात.
 • रायझोबिअमच्या या पेशी हवेतील नत्रवायू अमोनिया स्वरूपात स्थिर करतात व तो अमोनिया रोपातील सेंद्रिय पदार्थाबरोबर एकरूप होउन अमिनो आम्ले बनवतात व ही आम्ले कालंतराने पिकांच्या बियामधे प्रथिनांच्या स्वरूपात साठवण करून ठेवतात.
 • जर जमिनीमधे सुत्रकृमिंचे प्रमाण जास्त असेल तर सुत्रकृमीमुळेपण कडधान्य/ डाळवर्गीय पिकांच्या मुळाभोवती गाठी तयार होतात. पण बघायला गेल तर त्या गाठी रायझोबिअमच्या गाठींच्या प्रमाणात वेगळ्या दिसतात.

त्याचबरोबर आपण वापरलेले रायझोबिअम जिवाणू कार्यक्षम ठरले की नाही हे आपणास बघायचे असल्यास खालील गोष्टीची पडताळणी करावी.

 1. बियांणांची उगवण क्षमता चांगली असते.
 2. एकवीस दिवस झाल्यावर त्यावर रायझोबिअमच्या गाठी दिसु लागतात.
 3. प्रकिया केल्यामुळे यामधे मुळावर गाठींची संख्या जास्त बघायला मिळते.
 4. त्याचप्रमाणे त्यांचा आकारही मोठा दिसतो.
 5. जेव्हा पिक फुलोर्‍याच्या स्थितित असते त्यावेळेला गाठी या गुलाबी रंगाच्या बनतात.
 6. मुळांची वाढ ही भरपूर प्रमाणात व निरोगी होते, यामुळेच पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात होते व त्याचबरोबर पिकापासून निघणार्‍या धान्यात व भुसा यामध्ये वाढ होते.
 7. जमिन सुपीक बनून तिचा पोत सुधारतो व दुसडिच्या पिकांची उत्पादन क्षमता वाढते.


सुत्रकृमींच्या गाठी:

सुत्रकृमींच्या गाठी ओळखण्यासाठी विस्तृत माहिती पाहुया. ज्यामुळे आपल्याला वेळीच सुत्रकृमींचे नियंत्रण करता येईल.

 • गाठी सुत्रकृमींचा मुळात प्रवेश झाल्यामुळे बनतात.
 • गाठी पिकाला खुप हानिकारक असतात. या गाठी भाजीपाला पिकात कमी तर कडधान्य वर्गीय पिकात जास्त प्रमाणात येतात.
 • या सुत्रकृमी निर्मित गाठीमधे हिमोग्लोबिन नसते.
 • या गाठी मधे नत्र स्थिरीकरण होत नाही.
 • सुत्रकृमींचे जिवाणू स्वतः च छिद्र बनवून पिकांच्या मुळात प्रवेश घेतात.
 • हे सुत्रकृमी प्रवेश करून रोपातील अन्नद्रव्ये शोषून घेतल्यामुळे रोपामधील अन्नद्रव्ये नाहीसे होऊन रोपांची वाढ खुंटुन त्याच्या उत्पादनात घट येते.

रायझोबिअम जिवाणूंच्या गाठी:

 • या गाठी रायझोबिअम जिवाणूने पिकांच्या मुळात प्रवेश झाल्यामुळे तयार होतात.
 • या गाठी पिकास खुप फायद्याच्या ठरतात व फक्त कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळावरच या गाठी येतात.
 • या गाठीमधे गुलाबी रंगाचा हिमोग्लोबिन द्राव्य असतो.
 • रायझोबिअम जिवाणुंच्या सहाय्यतेमूळे या गाठीत नत्राचे स्थिरीकरण होते व त्यामुळे रोपामधील नत्रांचे प्रमाण वाढून त्यांची वाढ जोमाने व चांगल्या प्रतीची होऊन उत्पादन भर 20-25 टक्के पडते.

रायझोबिअम खत नियंत्रण गुणवत्ता मानक:

 • स्वरूप: द्रवरुप (लिक्विड).
 • जीवित कवक संख्या: 1-8 (10) कवक/ मिली.
 • संक्रमक पातळी: 105 प्रविकरणास संक्रमक नाही.
 • सामु (पी एच): 6.5 ते 7.5 इतका.

रायझोबिअम जिवाणू खताची मात्रा: 300-400 मि.ली. रायझोबिअम द्रवरूपात/ प्रती एकरी.

पेरणीपूर्वी: 300-400 मि.लि. रायझोबिअम द्रवरुपात घेउन 50-100 किलो कंपोस्ट खताबरोबर मिसळून एकरी समप्रमाणात मातीमधे संध्याकाळचे ढगाळ वातावरण दिसता फेकावे.

पेरणीच्यावेळी: (बीजप्रक्रिया पद्धतीने) 250 ग्रॅम प्रती 10 किलो (एका एकर साठी) घेउन हे द्रावण 15-20 मिनिटे नियोजित बियाण्यासोबत मिसळावे. ही प्रक्रिया झाल्यावर त्यास अर्धा तास सावलीमध्ये सुकायला ठेवावे व नंतर हे लवकरात लवकर पेरणीस वापरावे.

रायझोबिअम जिवाणू वापराच्या वेळी घ्यावी लागणारी काळजी:

 • तीव्र प्रकाशामुळे/उन्हामुळे द्रावणातील जिवाणू मरण्याची शक्यता असल्याकारणाने त्या द्रावणाचे सुर्यप्रकाशापासुन संरक्षण करावे.
 • द्रावण जास्त काळ टिकवुन ठेवण्यासाठी ते थंड ठिकाणी ठेवावे.
 • पाळीव प्राणी तसेच घरातील लहान मुलांपासुन सुरक्षित दुर ठेवावे.
 • जिवाणू खत वापरा पश्‍चात साबणाने हात स्वच्छ धुवून घ्यावे.
 • या जिवाणू खताची किटकनाशक किंवा अजून कुठल्याही रासायनिक खतासोबत मिसळून फवारणी घेवू नये.

रायझोबिअमचे फायदे: 

 1. उत्पादन खर्चात बचत होते व आर्थिक उत्पन्न वाढते.
 2. उगवण क्षमतेत वाढ होते.
 3. नत्रांचे स्थिरीकरण होण्यास मदत होते.
 4. सजीवांची हानी होत नाही व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.

रायझोबिअम मिळण्याची विविध ठिकाणे:

वेबसाईट वरून ऑनलाईन खरेदी करता येणारी संकेतस्थळे: इंडिया मार्ट, अमॅझोन
कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी सेवा केंद्र इ.

लेखक:
डॉ. आर. ए. चव्हाण

(सहयोगी प्राध्यापक, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, उस्मानाबाद)
8975883084
श्री. पी. बी. खैरे
(आचार्य पदवीधारक, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

rhizobium bacterial fertilizer रायझोबिअम जिवाणू खत रायझोबिअम rhizobium सुत्रकृमी nematodes biofertilizers जिवाणू खते
English Summary: beneficial rhizobium biofertilizer

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.