जमिनीच्या बाबतीत अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. यामध्ये शेताच्या रस्त्याचा वाद किंवा बांधाचा वाद एवढेच नाही तर बांधावरील झाडे तोडण्यावर देखील दोन शेतकऱ्यांमध्ये वाद उद्भवू शकतात. परंतु आपण शेत जमिनीच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला माहित आहेच कि सातबारा उतारा हा आपल्या जमिनीचा आरसा असतो.
सातबारा उतारा मध्ये आपल्या जमिनीला चारही बाजूने असलेले शेतकरी, आपले एकूण क्षेत्र वगैरे बऱ्याचशा शेतजमिनीच्या आवश्यक नोंदी सातबारा उताऱ्यावर असतात. त्यामुळे सातबारा उतारा शेतकरी बंधूंसाठी खूप महत्वाचे कागदपत्र आहे.
परंतु बऱ्याचदा खोटा सातबारा याविषयी देखील अनेक प्रकरणे समोर येतात. कधी कधी तर खोट्या सातबार्यावर जमिनीचे व्यवहार देखील घडवून आणली गेली आहेत.
यामुळे शेतकरी बंधूंची यामध्ये फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सातबारा नेमका खरा आणि खोटा कोणता आहे हे ओळखणे खूप गरजेचे असून त्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आपल्या लेखात घेऊ.
सातबारा उताऱ्यावरील या तीन महत्त्वाच्या गोष्टी पाहणे गरजेचे
1- सातबारा उताऱ्यावरील क्यूआर कोड- आता क्यूआर कोड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता डिजीटल युग अवतरले असून सगळ्याच प्रकारचे काम आहे आता ऑनलाईन पद्धतीने होऊ लागल्यामुळे याला सातबारा उतारा देखील अपवाद नाही.
आता सातबारा उतारा देखील ऑनलाइन मिळतो हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड असणे गरजेचे आहे.
जर उताऱ्यावर हा कोड नसेल तर तो सातबारा बोगस असल्याचे समजावे. सातबारा उताऱ्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला तर आपल्याला ओरिजनल सातबारा पाहण्यास मदत होते.
नक्की वाचा:Cotton Price: कापूस उत्पादकांची यंदाची दिवाळी गोड! कापसाला 11 हजार रुपये क्विंटल भाव
2- उताऱ्यावरील ई-महाभूमीचा लोगो आणि एलजीडी कोड- शासनाने आता सातबारा उतारा च्या संबंधित जे काही बदल केले आहेत त्यानुसार आता उताऱ्यावर गावाचा युनिकोड देखील नमूद करण्यात येतो.
त्यामुळे सात बारा हा खरा असेल तर त्याच्यावर हा युनिकोड असणे गरजेचे आहे आणि जर नसेल तर तो सातबारा खोटा समजावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 मार्च 2022 रोजी राज्य शासनाने सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा तसेच ई-महाभूमीचा लोगो टाकण्यास मान्यता दिली आहे.
सातबारा उताऱ्यावर जर इ महाभुमीचा लोगो नसेल तर तो उतारा बनावट समजावा.
3- तलाठ्याची स्वाक्षरी महत्त्वाची- आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची स्वाक्षरी असते.जर उताऱ्यावर तलाठ्याची स्वाक्षरी नसेल तर तो सातबारा बनावट समजावा.आता सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची डिजिटल सही येते व ही डिजिटल सही आता वैध आहे.
Share your comments