सध्या देशात बेरोजगारी दर हा सर्व्यांसाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे. कोरोना आल्यापासून तर यात अजून वाढच होत आहे, वाढती बेरोजगारी लक्षात घेता व्यवसाय करणे ही आता गरज बनत चालली आहे. अनेक युवक व्यवसाय करू इच्छितात मात्र व्यवसायाची माहिती नसल्याने अनेक नवयुवक इच्छा असताना देखील व्यवसाय करू शकत नाही. तसेच, अनेक लोकांना व्यवसायासाठी मुबलक पैशांची गरज असते असाच समज आहे त्यामुळे भांडवल अभावी अनेक लोक व्यवसाय करण्यापासून वंचित राहतात. याच गोष्टीला हेरून आज आम्ही कमी इन्वेस्टमेंट मध्ये करता येणाऱ्या व्यवसायाविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण उसाच्या रसाचा व्यवसाय म्हणजे शुगरकेन ज्युस बिजनेस प्लान या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यात उसाचा रस पिणे सर्वांनाच अधिक पसंत असते. उसाचा रस स्वादिष्ट असतो तसेच यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच उन्हामुळे जाणवणारा थकवा देखील कमी केला जाऊ शकतो त्यामुळे अनेकजण उसाचा रस पिणे पसंत करतात. उसामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे अनेक आहार तज्ञ उसाचा रस सेवन करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे उन्हाळ्यात हा हंगामी व्यवसाय करून आपण चांगला बक्कळ नफा कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास थोडेसे ज्ञान आवश्यक आहे, या व्यवसायासाठी लागणारे शुगरकेन क्रसिंग मशीन ऑपरेट करता येणे जरुरी आहे. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, आपण आपल्या गावात अथवा महामार्गालगत छोट्याशा जागेत केवळ एका मशिनद्वारे हा व्यवसाय प्रारंभ करू शकतात. आपणास यासाठी एक मशीन खरेदी करावे लागेल तसेच उसाचा रस बनवण्यासाठी लागणारे ऊस आणि अन्य काही वस्तूंच्या खरेदीसाठी आधी थोडीशी गुंतवणूक करावी लागणार आहे.
उसाचा रस बनवण्यासाठी आवश्यक सामग्री
ऊस, काळे मीठ, पांढरे मीठ, बर्फ, लिंबू, आले, मिंट, ग्लास, रस ठेवण्यासाठी भांडे/रसपात्र
उसाचा रस बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते उसाची खरेदी करणे. आपण आपल्या जवळच्या मार्केटमध्ये जाऊन उसाची खरेदी करू शकता किंवा आपल्या जवळ कोणी ऊस उत्पादक शेतकरी असेल तर त्याच्याकडून आपण ऊस खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, लागणारे मीठ, बर्फ, लिंबु व इतर सामग्री खरेदी करण्यासाठी कुठल्याही बाजारात जाऊन खरेदी करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास उसाचा रस तयार करण्यासाठी आवश्यक मशीन खरेदी करावे लागणार आहे, तसेच आपण हा व्यवसाय जर बाजारपेठेत, बस स्थानकावरती, रेल्वे स्टेशन वरती सुरु करु इच्छित असाल तर आपणास थोडीशी रक्कम तेथे भाडे म्हणून द्यावी लागेल. एकंदरीत हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपणास एक लाख रुपये गुंतवणुकीची आवश्यकता भासणार आहे.
आपण हा व्यवसाय एक लाख रुपये गुंतवणूक करून सुरू केला तर आपणास पुढच्या हंगाम मध्ये मशीन खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे पुढील हंगामात एवढा खर्च करावा लागणार नाही. आता एक लाख रुपये गुंतवणूक करून आपण चार महिन्यात दोन लाख रुपयांच्या आसपास कमाई करू शकता. जर आपला व्यवसाय अपेक्षेपेक्षा अधिक चालला तर हा आकडा वाढू देखील शकतो किंवा कमी चालला तर घटू देखील शकतो.
Share your comments