1. इतर बातम्या

मातीचे आरोग्य आणि शेती

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच भारतीय समाज जीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्य साधारण महत्व आहे. भारतात कृषी संस्कृती ही पारंपारिक असली तरी स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरितक्रांतीमुळे भारतात आधुनिक शेतीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Soil

Soil

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच भारतीय समाज जीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्य साधारण महत्व आहे. भारतात कृषी संस्कृती ही पारंपारिक असली तरी स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरितक्रांतीमुळे भारतात आधुनिक शेतीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.

आज जगात भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे या लोक संख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याबाबत भारत स्वंयपूर्ण आहे.यावरून भारतीय संस्कृतीत शेतीचे महत्व विषद होते.परंतु असे असले तरीही दुसरीकडे मात्र पिकाच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी भारतीय शेतीचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे चित्र सामोरे येत आहे. सधन कृषी पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे तसेच तदनुषंगिक कारणामुळे जमिनीचा(soil) कस कमी होत आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे.

जमिनीचे आरोग्य अबाधित राखून किफायतशीर पीक उत्पादन:

या अनुषंगाने मातीच्या निरोगी आरोग्याचे गांभीर्य ओळखून केद्र शासनाने देशभरात मृद आरोग्यपात्रिका अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत जिरायती व बागायती जमिनीचा म्हणजेच मातीचा सामू व क्षारता, मातीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश, सूक्ष्म मूलद्रव्ये, जसे जस्त, तांबे, लोह, मंगल आदी घटक तपासून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य संवर्धनासाठी योग्य त्या उपाय योजनांचे मार्गदर्शन केले जात आहे.

शाश्वत शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीचे आरोग्य अबाधित राखून किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते. दर वर्षी पीक घेतल्यामुळे पिकांच्या शोषणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत असतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीची सुपिकता आजमाविण्यासाठी भैातिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते.

माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमिन. कालांतरापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचण्याचे प्रमाण जास्त होते. साहजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआपच मदत होत असे. अन्नधान्याची गरज जसजशी वाढू लागली तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल वाढत गेला. त्यासाठी प्रगत व उच्च तंत्रज्ञानावर आधरित शेतीसाठी अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने याठिकाणी माती व पाणी परिक्षणाचे महत्व अनन्य साधारण झालेले आहे.

हेही वाचा :जर मातीतील पीएचचे प्रमाण जास्त झाले तर काय करावे

महाराष्ट्रातील मातीच्या आरोग्याबाबत सद्य स्थिती:

  • सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी (सर्व जिल्हे)
  • नत्राचे प्रमाण कमी (10 जिल्हे)
  • स्फुरदाचे प्रमाण कमी (23 जिल्हे)
  • पालाशचे प्रमाण अधिक (सर्व जिल्हे)
  • लोहाचे प्रमाण कमी (23 जिल्हे)
  • जस्ताचे प्रमाण सर्वात कमी (28 जिल्हे)

माती परिक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच परंतु जमिनीचे स्वास्थ टिकवण्यासाठी सुध्दा मदत होते. जमिनीच्या स्वास्थ्याविषयक समस्यांचे निदान व त्यावरील उपाययोजना याबाबतचे नियोजन हे या माती व पाणी परिक्षणावरच आधरित असते. जमिनीच्या नियोजनासाठी माती परिक्षणाबरोबर, मृद सर्वेक्षणामुळे जमिनीची उत्पत्ती, तिचे गुणधर्म काय आहे हे समजते. मृद सर्वेक्षणामुळे जमिनीच्या समस्या व प्रमाण याची माहिती मिळते अशा समस्या दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याचे नियोजन व व्यवस्थापन मृद सर्वेक्षणाच्या आधारे करता येते.

सुपिक जमिन ही निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती एक चिरकाल ठेव आहे. पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीची पिकांच्या मुळांना अन्नद्रव्ये पुरविण्याची क्षमता चांगली असावी लागते. सुपिक जमिनीत जीवाणूमध्ये ऊर्जाशक्ती निर्माण होते. उष्णता व प्रकाश यांचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते. हीच उर्जा जमिनीला परत मिळून जीवांची उपजीविका होते. जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जरी कमी पडली तरी उत्पादनात घट येते. जमिनीची सुपिकता तिचे महत्व, आणि ती वाढविणे किंवा टिकविणे याबाबतच्या उपाययोजना करणे खूप महत्वाचे आहे.

जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि जमिन उत्पादनक्षम बनते. पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी मातीच्या परीक्षणावर आधरित खतांचा संतुलित वापर करणे फायद्याचे आहे. जमिन ही राष्ट्राची महत्वाची संपत्ती आहे या संपत्तीचे उत्तम प्रकारे जतन केले पाहिजे. लोकांचे जीवन हे सर्वस्वी जमिनीवरच अवलंबून असते. अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या आवश्यक गरजा जमिनीच्या माध्यमातूनच पुरविल्या जातात. वनस्पतींची वाढ, अन्नधान्याची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पन्न करण्यासाठी मातीचा पर्यायाने जमिनीचा फारच उपयोग होतो.

माती ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. शेतीतील माती ही झिजलेल्या खडकांचा निव्वळ चुरा नसून सजिव आणि क्रियाशील आहे. त्यामुळेच जमिनीवर वनस्पती  वाढू शकतात. अन्नधान्य आणि चारा निर्मिती करतात. म्हणून शेतीमध्ये जमिनीस अनन्यसाधारण महत्व आहे. कृषी विद्यापीठाच्या विशेष प्रयत्नामुळे सुधारीत, संकरित बियाणे, खते व किटकनाशकांच्या वापरात वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीने आता आपण सर्वानी शाश्वत शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यास जमिनीचे महत्व व अधिक उत्पादनासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत जागृत करण्याची आवश्यकता आहे. जमिन ही चिरंतर उत्पादकाभिमुख ठेवण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना जाणीव करून देणे गरजेचे झालेले आहे.

जमिनीची आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून:

  • राज्यातील 1 कोटी 37 लाख शेतकरी खातेदाराना मिळणार जमिनीची आरोग्यपत्रिका
  • जमिनीची आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून- जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती कळते
  • प्रमुख अन्नद्रव्याची पातळी (नत्र, स्फुरद, पालाश)
  • दुय्यम अन्नद्रव्याची पातळी (गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम)
  • सुक्ष्म अन्नद्रव्याची पातळी (लोह, जास्त, तांबे, मंगल, बोराॅन)
  • अहवालानुसार खतमात्रा

गेल्या 50 वर्षात रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर झाला. त्यामुळे लाखो हेक्टर जमिन नापीक झाली. रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठा फायदा होतो असे प्रारंभी दिसले खरे, परंतु लहान मुलांची प्रकृती लक्षात न घेता खाद्य पदार्थाचा आणि विटामिन्सचा मारा केला तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाते तसाच काहीसा प्रकार शेतजमिनीच्या बाबतीत झाला. जमीन सुधारण्याऐवजी, जादा उत्पादन मिळण्याऐवजी पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे जमिन बिघडली. उत्पादन कमी येऊ लागले, त्याचबरोबर खरोखरच आवश्यक असलेल्या सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झाले.पाटाचे पाणी परत केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे, मिळाले कि पिकाला आवशक नसतानांही जड पाणी दिल्याने क्षाराचे प्रमाण वाढत गेले. त्या जमिनीत पिक येईनासे झाले. जमीन नापीक झाली, क्षारपड झाली. खते आणि पाणी यांच्या अधिकाधिक वापराने अधिकाधिक उत्पादन घेण्याची हाव नडली अतिरेक अंगलट आला. हरितक्रांतीच्या यशाच्या नादात शेतजमिनीचे आजारपण फार उशिरा लक्षात आले. दोहन ऐवजी जमिनीचे शोषण झाले. अशा निसत्व केलेल्या जमिनीतून येणारे पीकही सत्वहीन झाले. त्यावर जगणारे आपणही सत्वहीन झालो तर नवल कसले?

हेही वाचा :वनामकृवित जागतिक मृदा दिन साजरा

देशाच्या लोकसंख्येत होणारी झपाट्याने वाढ या वाढत्या लोकसंख्येचा शेती क्षेत्रावर पडणारा भार, वाढते शहरीकरण, उद्योग-व्यवसायाकरिता शेत जमिनीचा वापर यामुळे लागवड योग्य क्षेत्रात घट होत आहे.जागतिक हवामान बदलात होणारी गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार यामुळे मातीवर परिणाम होत आहे. अमर्याद सिंचन, रासायनिक खते, किडनाशकाच्या अमर्याद वापराने माती प्रदुषित होत आहे. जमिनीची धूप होऊन सुपीक मातीचा थर वाहून जातोय.

सद्य परिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने जमिनीच्या सुपिकतेवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी हेक्टरी 16 टन माती वाहून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी (0.03 टक्क्यापर्यंत) झाले आहे. यामुळे मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. याचा विपरीत परिणाम मानवांच्या, जनावरांच्या आणि सुक्ष्मजीवांच्या आरोग्यावर होत आहे. जागतिक स्तरावर या बाबींची प्रकर्षाने नोंद घेतली गेली आहे. अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोहोमध्ये संतुलन साधण्याकरिता मातीचे आरोग्य जपावेच लागेल. माती जिवंत असेल तर शेती जिवंत राहील, याकरिता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थाचा वापर करावयास हवा. पीक उत्पादनाकरीता जमिनीची उत्पादन क्षमतेनुसार, काटेकोर आणि कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. यासाठी माती आणि पाणी परिक्षण करून त्यानुसार रासायनिक खतांचा वापर व्हायला हवा. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेत जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून घेणे आवश्यक आहे.

राज्यातील जमिनी नापीकी होण्याची प्रमुख कारणे:

  • रासायनिक खतांचा असंतुलित वापर
  • पाण्याचा अतिरिक्त वापर
  • सेंद्रिय खतांचा अभाव
  • पिकांची फेरपालट न करणे
  • जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर

वाढत्या लोकख्येसाठी पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. अन्नधान्य हि सकस असले पाहिजे. याबाबतीत स्वावलंबी होणे ही जरुरी आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत आहेत. शासनही सतर्क झाले आहे. जमिनीत काय कमी आहे हे आजमावत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा मारा करण्यापूर्वी झालेली चूक परत होऊ नये म्हणून जमिनीची तपासणी करून सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तपासणीमुळे जमिनीत काय कमी आहे आणि किती कमी आहे हे आजमावता येते आणि ते व तेवढेच देण्याच्या प्रयत्न करता येतो.

शेती व्यवसायामध्ये सुपिक जमिनीस अत्यंत महत्व आहे. म्हणून शेतकऱ्याने आपल्या जमिनी विषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. आपली जमिन कशी आहे, पाणी कसे आहे त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे. त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केंव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे. जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत. भरपाई कोणत्या खतामधून भागविता येईल याचा विचार करतांना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादनक्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची आरोग्यापत्रिका तयार करून घेतली पाहिजे. आपले आरोग्य दीर्घकाळ, निरोगी राहण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे सर्व चाचण्या करून त्याप्रमाणे शरीर सुदृढ ठेवतो, तसेच नियमित माती पाणी परिक्षण ही नियोजनबद्ध, किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली आहे.

आधुनिक शेतीमध्ये अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्व अन्यन्य साधारण झालेले आहे. माती परिक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच त्याचबरोबर प्रमाणशीर खतांची मात्रा देता येते. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते. तसेच जमिनीचे आरोग्य चिरकाल टिकविण्यासाठी सुध्दा मदत होते. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचे संवर्धन करावे लागते. शाश्वत शेतीमध्ये पिकांचे फायदेशीर उत्पादन घेऊन सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपिकता टिकविली जाते. ही जमिनीची सुपिकता आजमिविण्यासाठी मातीची तपासणी करणे आवश्यक आहे.

खत व्यवस्थापनामध्ये माती परिक्षणास अनन्य साधारण महत्व आहे.पिकाच्या संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी नत्र,स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांसोबत सुक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. परंतु गरज असल्यास माती परिक्षणानुसार त्यांचा पुरवठा करता येतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खत मात्रा देखील कमी जास्त करता येते त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घेता येते. त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घेता येते.तसेच अति रासायनिक खते वापरण्यामुळे  होणारा शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा टाळता येतो व जमिनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवता येते.

माती परीक्षणामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचा अंदाज येतो.जमिनीच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, विद्राव्य क्षार, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण इत्यादी माहिती मिळते. जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण व सामू द्वारे जमिन क्षारयुक्त किंवा चोपण झाली आहे का? याची ढोबळमानाने कल्पना करता येते. जमिन क्षार व चोपणयुक्त झाली असल्यास सेंद्रिय खतांचा व भूसुधारकाचा वापर करणे सोयीचे ठरते. जमिनीच्या भौतिक गुणधर्माद्वारे जमिनीचा पोत,चिकण मातीचे प्रमाण,पाणी धरून ठेवण्याची क्षमता, घनता, पाणी मुरण्याचा वेग, निचऱ्याची क्षमता इत्यादी बाबींची माहिती मिळते. तर जैविक गुणधर्मामुळे उपयुक्त तसेच रोगकारक जीवाणूंची चाचणी करता येते.

माती परिक्षणावर प्रमुख घटकांमध्ये मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे.माती नमुन्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण करणे. माती परिक्षणावर अहवाल तयार करणे. पिकांसाठी खतांच्या शिफारशी ठरविणे. क्षार व चोपणयुक्त जमिनी सुधारण्यांचे उपाय सुचविणे इत्यादींचा समावेश होतो. राज्यातील कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा विभागातर्फे मागील वर्षी घेण्यात आलेल्या माती तपासणीनुसार राज्यातील 10 जिल्ह्यात नत्राचे प्रमाण कमी, 24 जिल्ह्यात स्फुरदाचे प्रमाण कमी, सर्व जिल्ह्यात पालाशचे प्रमाण अधिक तर 23 जिल्ह्यात लोहाचे प्रमाण कमी तर 28 जिल्ह्यात जस्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यात कृषी विभागाने माती परीक्षणाची सोय सर्व जिल्ह्यांची मुख्यालयी केलेल आहे.याशिवाय कृषि विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, साखर कारखाने रासायनिक खत उत्पादन संस्था व खाजगी संस्थांद्वारे माती परिक्षण प्रयोगशाळा राज्यात सर्वत्र उपलब्ध आहे. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने राज्यातील शेतकरयांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप होत आहे. शेतकरी बंधुनो या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो की हंगामापूर्वी तसेच नवीन फळबागा पिकांचे नियोजन करताना माती परिक्षण करूनच खतांचे व्यवस्थापन करावे व आपली लाख मोलाची जमिन चिरकाल, चिरंजीवी व शाश्वत ठेवावी. अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोघांमध्ये संतुलन साधण्यासाठी मातीचे आरोग्य जपावे.

डॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
9404032389

English Summary: Soil Health and Agriculture Published on: 01 December 2018, 12:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters