पिक उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये जमिनीचा पोत टिकविणे, पर्यावरण संतुलन व नैसर्गिक समतोल राखणे या बाबींकडे अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यातूनच आज शेतकर्यांमध्ये सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती अशा संकल्पनांकडे कल वाढत आहे. सेंद्रीय निविष्ठांचे अपुरे उत्पादन, कमी उपलब्धता व माहीतीची कमतरता यामुळे सेंद्रीय शेती मोहीमेची गती कमी होतांना दिसते. आपल्या जमिनीचा कस व उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी त्यामध्ये गावोगावी सेंद्रीय खत, गांडूळ खत निर्मितीचे कार्य मोठया प्रमाणावर हाती घेणे आवश्यक आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या गांडूळांचा नियंत्रीत परिस्थितित उपयोग करून गांडूळखत निर्मितीच्या मदतीने कमी वेळात दर्जेदार सेंद्रीय खताची उपलब्धता वाढविता येईल.
गांडूळखत म्हणजे गांडूळाच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करून सेंद्रीय पदार्थापासून तयार झालेले नैसर्गिक खत होय. गांडूळांची विष्ठा म्हणजे गांडूळाने भक्षण केलेल्या पदार्थावर त्याच्या पचन संस्थेत प्रक्रिया होवून मृदगंधयुक्त उत्सर्जित क्षाालेली विष्ठा होय. गांडूळ खत तयार करण्यासाठी आयसेनिया फिटिडा किंवा युड्रिलस युजेनी या प्रजातीची गांडूळे वापरावीत.
गांडूळ खत बनविण्याच्या विविध पद्धती:
1. गांडूळखत तयार करण्याची झोपडी पध्दत:
- झोपडीची जागा थोडी उंचावर व पाण्याच्या स्त्रोताजवळ निवडावी.
- निवडलेल्या जागेवर उपलब्ध साहीत्यापासून छपराची झोपडी तयार करावी. झोपडी मध्यभागी आठ फुट व दोन्ही बाजूस 5 फुट उंची अशा उताराच्या छपराची असावी. झोपडीच्या तीन बाजू तूरट्या/पर्हाटीच्या कुडाने झाकून घ्याव्यात. उरलेल्या बाजूस गोणपाटाचे झापोटे लावावे. झोपडीचे कुड लावतांना वरील अर्धा ते एक फूट भाग मोकळा सोडावा जेणे करून झोपडीत हवा खेळती राहील व प्रकाश सुध्दा येईल.
- झोपडीतील जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर एक मीटर रूंद व जागा उपलब्धतेनुसार लांबीचे गादीवाफे आखून घ्यावेत. दोन गादीवाफ्यामध्ये किमान 1 फुट अंतर ठेवावे. त्यामुळे काम करणार्यास अडचण होत नाही.
- आखलेल्या वाफ्यातील माती 6 इंच खोल खोदून बाहेर टाकावी. त्यानंतर तळाशी विटांचे तुकडे टाकून पाणी ओतून धुम्मस करून तळ कठीण करावा. त्यामुळे गांडूळे जमिनीत जाण्याची शक्यता राहणार नाही.
- तयार क्षालेल्या वाफ्यावर उपलब्ध असलेल्या बारीक केलेल्या पीक अवशेषांचा सहा इंच उंचीचा समांतर थर पसरवावा.
- एक आठवडा अगोदर पासून गोळा केलेले शिळे शेण व शेतातील किंवा घरादारातील टाकावू सेंद्रीय पदार्थ 1:1 या प्रमाणात घेवून फावड्याच्या सहाय्याने चांगले मिसळवून घ्यावे. या मिश्रणाचा 6 इंच जाड थर वरील थरावर समांतर पसरवावा.
- त्यानंतर पूर्ण किंवा अर्धवट कुजलेले शेण/कंपोस्ट खत घमेल्यात घेवून वरील थरावर पालथे टाकून एक थर तयार करावा.
- अशा प्रकारे तयार झालेल्या ढिगावर एक आठवडा दररोज पाणी शिंपडून त्यातील उष्णता कमी करावी.
- साधारणतः 100 गांडूळ किंवा एक किलो ताजे गांडूळखत प्रती 5 घमेले या प्रमाणात एकसारखे पसरवून द्यावेत.
- अशाप्रकारे तयार क्षालेल्या गादीवाफ्यावर गांडूळाच्या संरक्षणाकरिता ओले गोणपाट टाकावेत.
- अशा पध्दतीने सुरूवातीला 40 ते 50 दिवसात गांडूळखत तयार होते. मात्र जसजसी गांडूळांची संख्या वाढत जाते तसतसा गांडूळखत तयार होण्यास लागणारा कालावधी कमी होत जातो.
- वाफ्याचे आकारमान, गांडूळांची संख्या, वापरलेले सेंद्रिय पदार्थ इत्यादी बाबींवर गांडूळखताचे उत्पादन व गांडूळ खत तयार होण्यास लागणारा कालावधी अवलंबून असतो.
2. गांडूळखत निर्मितीची सिमेंट टाकी पध्दत:
- उभारणीचे ठिकाण:
गांडूळ खत निमितीसाठी सिमेंट टाकी पध्दती उभारणीसाठी शक्यतो वर थंड, झाडाची सावली व पाण्याचा पुरवठा सहज होवू शकेल असे ठिकाण निवडावे. जर ठिकाण उघडे असेल तर उन व पावसापासून सुरक्षीततेसाठी अॅसबेस्टॉसचे छत उभारावे. - सिमेंट टाकी उभारणी:
सिमेंट टाकीचा आकार तीन फूट रूंद 2.5 फूट उंच व 10 फूट लांब असावा. टाकीची लांबी उपलब्ध जागा, पिकांचे अवशेष व शेणाच्या उपलब्धतेनुसार वाढविता येते. टाकीचा तळ बनवितांना त्याला थोडा उतार ठेवावा जेणे करून टाकीतील जास्तीचे पाणी एका बाजूला जमा होवून टाकीला ठेवलेल्या एका छिद्रातून बाहेर काढता येईल. टाकीतील छिद्राव्दारे झिरपलेले पाणी एका नालीवाटे जमिनीतील टाकीत जमा होईल अशी व्यवस्था करावी. जमा झालेले हे द्रावण शेतात टाकण्यासाठी व पिकावर फवारण्यासाठी वापरता येईल. - आवश्यक सामुग्री:
शेतातील पिकांचे अवशेष, शेणखत, कोंबडी, डुक्कर किंवा शेळी यांची विष्ठा, हिरवा पाला किंवा गवत, भाजी बाजारातील अवशेष, कृषी उद्योगातील उर्वरीत निविष्ठा व स्वच्छ पाणी, जर अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतील तर चांगले. - गांडूळ खत टाकी भरण्याची पध्दत:
टाकी भरतांना सुरवातीला तळाशी विटा पालथ्या टाकाव्यात जेणेकरून सपाट भाग वर येईल आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. त्यानंतर त्यावर 6 इंची उंचीचा पीक अवशेषांचा थर समतल टाकून पाणी शिंपडून ओला करावा. त्यावर अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर 3 इंच पसरवावा. जर हिरवा कचरा उपलब्ध असल्यास तो कोरडया पीक अवशेषात मिसळवावा. अशा पध्दतीने टाकी थरावर थर भरून व पाण्याने भिजवून 1 फूट वरपर्यंत थडगाच्या आकारात भरावी. याव्यतिरिक्त दुसर्या पध्दतीने म्हणजे कोरडा पीक अवशेष ताज्या शेणाच्या स्लरीमध्ये पूर्णपणे मिसळून टाकी भरल्यास अधिक चांगले परिणाम साधता येतील. टाकी भरल्यानंतर त्यावर ओली गोणी किंवा तागाचे जुने पोते पसरवून 7 दिवसपर्यंत पाणी शिंपडून आतील तापमान कमी करावे. टाकीतील ओलावा 60 ते 70 टक्के राखावा. त्यानंतर 7 ते 10 दिवसांनतर प्रती चौ.मी. वर एक किलो गांडूळ (1,000 गांडूळ) पसरवावे. गांडूळे आतमध्ये टाकू नयेत. जर ताजे गांडूळखत उपलब्ध असेल तर 10 किलो प्रती चौ.मी. या प्रमाणात टाकावे. ओलावा कायम राखण्यासाठी वातावरणाप्रमाणे पाणी शिंपडत रहावे. - गांडूळखत काढणी:
वापरलेले पिकांचे अवशेष व शेणखताच्या प्रकारावरून गांडूळ खताची काढणी 30 ते 60 दिवसांपासून करता येते. गांडूळखत काढतांना थर पध्दतीने काढावे. त्या करीता दोन दिवस पाणी शिंपडू नये. तिसर्या दिवशी 6 इंचापर्यंत उखरणी करून चवथ्या दिवशी उकरलेला थर गोळा करून ठेवावा. म्हणजे गांडूळ खालच्या थरात निघून जातात व नूकसान कमी होते. गांडूळखत स्वयंचलीत वा हाताच्या चाळणी यंत्राने गाळून घ्यावे. त्यातील उरलेले घटक व गांडूळ पून्हा खत निर्मितीसाठी वापरावे. गाळलेले खत व्यवस्थीत साठवून ठेवून विक्रीसाठी पॅकींग करावे. ओलावा कायम राहील याची काळजी घ्यावी.
3. रेडीमेड पॉलीथीन वर्मी बेडमध्ये गांडूळखत तयार करणे:
- सर्वसाधारणपणे थोडी उंचावरील सावलीची जागा निवडून रेडीमेड पॉलीथीन वर्मीबेड फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे प्रत्येक बाजूस असलेल्या खाचांमध्ये खुंटया बसवून स्थापित करावेत.
- या वर्मी बेडच्या तळाशी पालापाचोळा, पीक अवशेष व इतर टाकावू सेंद्रिय पदार्थाचा 6 इंच जाडीचा थर समांतर टाकावा. त्यावर पाणी शिंपडून तो पूर्णपणे ओला करून घ्यावा.
- सेंद्रिय पदार्थाच्या थरावर 7 ते 10 दिवसांपूर्वी गोळा केलेल्या शिळ्या शेणाचा 3 इंच जाडीचा थर एकसारखा पसरवावा.
- वरील शेणाच्या थरावर जवळच्या शेतातील गाळलेल्या मातीचा 1 इंच जाडीचा थर पसरवावा. त्यावर आवश्यक तेवढे पाणी शिंपडून थर पूर्ण ओला करून घ्यावा.
- वरील प्रमाणे एक थर तयार झाल्यानंतर असे तीन थर टाकले असता वर्मी बेड पूर्णपणे भरल्या जातो.
- अशा प्रकारे भरलेल्या बेडवर 400 ते 500 गांडूळ सोडावेत.
- त्यावर ओले केलेले गोणपाट झाकावे. त्यामुळे गांडूळांचे सरंक्षण तर होतेच व ओलावा टिकविण्यास सुध्दा मदत होते.
- आवश्यकतेनूसार पाणी शिंपडावे जेणे करून बेडमध्ये साधारणतः 60 टक्के आर्द्रता टिकून राहील ह्याची काळजी घ्यावी.
- अशा प्रकारे साधारणतः 25 ते 30 दिवसात वरचा 3 ते 5 इंच जाडीचा थर गांडूळ खतात रूपांतरीत होतो.
- वरचा तयार झालेला थर वेगळा करण्यासाठी त्याला दोन ते तीन दिवस पाणी देवू नये. त्यामुळे तयार झालेले गांडूळ खत मोकळे होइल व त्यातील गांडूळ खालच्या थरामध्ये जातील.
- तयार झालेला गांडूळ खताचा थर चाळणीने चाळून घ्यावा. चाळणीवर उरलेले सेंद्रिय पदार्थ व गांडूळे पुन्हा वर्मी बेडमध्ये एक सारखे पसरवून त्यावर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. अशा प्रकारे संपूर्ण बेडचे गांडूळ खतामध्ये रूपांतर होण्यास साधारणतः 50 ते 60 दिवस लागतात.
4. घरच्याघरी गांडूळखत तयार करण्याची पध्दतः
- आपल्या घरी गांडूळ खत तयार करण्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेल्या टाकावू साहित्याचा वापर करावा. त्यामध्ये फुटका माठ/फुटकी कुंडी/प्लास्टीक टाकी/बादली किंवा परस बागेमध्ये छोटया खड्ड्याचा वापर केला जावू शकतो.
- कुंडी/प्लास्टीक टाकी यांच्या तळाशी बारीक छिद्र पाडावे. तळाशी विटांचे तुकडे पसरवून त्यावर खडेदार रेती पसरवावी. त्यावर बारीक स्वच्छ रेती टाकून जाळीदार कपडयाचा तुकडा अंथरावा. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
- परस बागेमध्ये 2 फुट रूंद व 6 इंच खोल खड्डा खोदून तळ धुम्मस करून घ्यावा.
- उरलेले शिळे अन्न, भाजीपाल्याचे उरलेले अवशेष व पालापाचोळा आणि शिळे शेण 1:1 प्रमाणात घेवून मिश्रण तयार करावे. त्या मिश्रणाचा कुंडी/प्लास्टिक टाकी/खड्डा यांच्या तळाशी 6 इंच जाडीचा थर टाकावा.
- या थरावर गाळलेल्या मातीचा अथवा उपलब्ध असल्यास सेंद्रिय खताचा बारीक थर टाकावा. त्यावर पाणी शिंपडून ओले करावे.
- अशाप्रकारे थरावर थर टाकून कूंडी/प्लास्टिक टाकीच्या कडेपर्यंत थर भरावेत. परसबागेतील खड्डा जमिनीच्या वर 1.5 फुटा पर्यंत थर भरावा.
- 1,000 गांडूळ प्रति चौरस मीटर या प्रमाणात आवश्यक तेवढे गांडूळ सोडावेत.
- आर्द्रता टिकविण्यासाठी गोणपाट किंवा जाड सुती कापड ओले करून टाकावे.
- आवश्ययकतेनुसार पाणी शिंपडत जावे.
- साधारणतः 30 ते 40 दिवसांमध्ये चांगले गांडूळखत तयार होते.
लेखक:
डॉ. विनोद अ. खडसे व श्री. सागर छ. पाटील
(सहाय्यक प्राध्यापक, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषीविद्या विभाग)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Share your comments